Next
पहिले पाढे पंचावन्न!
BOI
Monday, June 24, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

जोडाक्षरांमुळे मराठी अंकवाचन अवघड होत असल्याचे कारण देऊन पर्याय म्हणून इंग्रजी भाषेच्या धर्तीवर अंकवाचनाची नवी पद्धत दुसरीच्या गणिताच्या पुस्तकात देण्यात आली आहे. त्यावरून बरेच वादविवाद सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर, अन्य भाषांतील काही उदाहरणे देऊन मांडलेले हे विचार...
.........
अर्भकाचे साठी पंते धरली हाती पाटी...
संत तुकाराम महाराजांनी ३००-३५० वर्षांपूर्वी लिहिलेल्या या ओळी. संत हे सामान्य माणसांना ज्ञान देण्यासाठी त्यांच्या पातळीवर उतरतात ही गोष्ट त्यांनी शिक्षकांचा दृष्टांत देऊन सांगितली होती. लहान मुलाला शिकविण्यासाठी गुरुजी हातात पाटी घेतात; मात्र त्यातून त्या गुरुजींनी त्या बाळाला आपल्या पातळीवर आणायचे असते, त्या बाळाला समजत नाही म्हणून त्याच्यासारखे व्हायचे नसते. हे तुकाराम महाराजांनी सांगितले नाही तरी सहज समजण्यासारखे आहे. 

गेले आठवडाभर धुमाकूळ घालत असलेल्या अंकवाचनाच्या वादात ही साधी गोष्ट कोणी लक्षात घेतलेली दिसत नाही. ‘विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो,’ ‘विद्यार्थ्यांना समजत नाही,’ ‘विद्यार्थ्यांना समजणे सोपे व्हावे म्हणून...,’ अशा विविध कारणांद्वारे या बदलाचे समर्थन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे; मात्र विद्यार्थ्यांचा गोंधळ दूर करणे, विद्यार्थ्यांना समजावून सांगणे आणि विद्यार्थ्यांची समजशक्ती वाढवणे ही शिक्षकांची कामे आहेत, हाच खरा मुद्दा आहे. किंबहुना विद्यार्थ्यांनी शाळेत त्यासाठीच जायचे असते. पाठ्यपुस्तकात बदल करून आणि शेकडो वर्षांच्या परंपरेतून तयार झालेल्या भाषेची मोडतोड करून आपण विद्यार्थ्यांना ज्ञान देऊ, असा कोणाचा समज असेल तर तो...अं...तज्ज्ञांच्या नंदनवनात वावरत आहे, असेच म्हणावे लागेल. 

मुळात विद्यार्थ्यांना अभ्यासाची किंवा विषयाची गोडी लागावी यासाठी पाठ्यपुस्तक हे साधनच नाही. जगात आजपर्यंत जेवढे विद्वान, कर्तबगार आणि महान लोक झाले त्यांनी आपल्या कर्तबगारीचे श्रेय स्वतःच्या शिक्षकांना दिले आहे. ‘माझे पाठ्यपुस्तक खूप सुंदर होते, त्यात खूप सुंदर चित्रे होती, प्रत्येक गोष्ट सोपी करून सांगितली होती. म्हणून मला विषयाची गोडी लागली,’ असे एकाही व्यक्तीने म्हटलेले नाही. उलट बर्ट्रांड रसेलसारख्या लेखकाने म्हटले आहे, की सगळेच लोक अज्ञानी म्हणून जन्म घेतात, मूर्ख म्हणून नाही. मूर्ख तर त्यांना शिक्षण बनवते. (Men are born ignorant, not stupid. They are made stupid by education.)

सध्याचे जे बदल आहेत, त्यात मराठीतील शब्द अवघड असल्याचा एक बागुलबुवा उभा करण्यात येत आहे. उच्चारणात अवघड म्हणावे तर रशियन, मल्याळम किंवा जर्मन भाषांच्या तुलनेत मराठी ही अगदीच सोपी भाषा वाटेल. या संदर्भात जर्मन भाषेचा मासला घ्यायला हरकत नाही. कारण तो आपल्याशी फिट्ट बसणारा आहे. 

जर्मन भाषेतील ß हे अक्षर म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण अक्षर. मराठीसहित अनेक भारतीय भाषांतील ‘ळ’सारखे. जर्मन लोकांचा अभिमान. एझत्सेट किंवा शार्फेस एझ या नावाने ते ओळखले जाते. जर्मन भाषेत सोपेपणा आणण्याच्या नावाखाली १९९६ साली तेथील सरकारी भाषा नियामक संस्थेने या अक्षरावर कुऱ्हाड चालवायचे ठरवले. त्याऐवजी ss ही अक्षरे वापरायचे ठरवण्यात आले. त्यावर जर्मन लोकांमध्ये तीन गट पडले. एक, या सुधारणेला विरोध करणारे; दोन, या सुधारणेच्या बाजूने आणि तीन, या सुधारणेतही सुधारणा करू इच्छिणारे. यावर एवढी वादावादी झाली, की काही लोकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. ऑस्ट्रियात तर ही सुधारणा करावी की न करावी, यावर सार्वमत घेण्यात आले. तेथे तब्बल ७० टक्के लोकांनी त्याला विरोध केला. तरीही ३१ जुलै २००५पासून हे नवे अक्षरलेखन लागू झाले आणि सर्व सरकारी प्रकाशनांमध्ये त्याचा वापर सुरू झाला. शाळांमध्ये त्याच पद्धतीने शिकवणेही सुरू झाले. परंतु जनसामान्यांनी ही सुधारणा स्वीकारायला नकार दिला. फ्रँकफुर्टर आल्गेमाईन त्साइटुंग आणि श्पिएगल यांसारख्या वृत्तपत्रांनी जुन्याच धाटणीने जर्मन भाषा लिहिण्याचा निर्णय घेतला. इतकेच काय, तर ज्या संस्थेने ही सुधारणा आणली त्याच संस्थेने काही ठिकाणी शार्फेस एझ वापरण्यास मुभा दिली आहे. आज परिस्थिती अशी आहे, की या दोन्ही लेखनशैली अस्तित्वात आहेत. त्यामुळे बाकी काही नाही, पण भाषेत गोंधळ माजला आहे. 

ज्या इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे आणि आसक्तीमुळे हे सगळे बदल करण्यात येत आहेत, त्या इंग्रजीत काय परिस्थिती आहे? आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्रजीचा वावर वाढल्यामुळे शिकायला व वापरायला सुटसुटीत अशी इंग्रजी भाषा असावी, असे या भाषेच्या धुरिणांना वाटू लागले. त्यासाठी बेसिक इंग्लिश नावाची एक भाषा १९२६-३०च्या दरम्यान घडवण्यात आली. सी. के. ऑग्डेन या ब्रिटिश शैक्षणिक मनोशास्त्रज्ञाने या ‘बेसिक इंग्लिश’ची निर्मिती केली होती. इंग्रजीतील केवळ ८५० शब्दांची शब्दावली घेऊन आणि त्यांना सोपे प्रत्यय लावून ही भाषा तयार करण्यात आली. व्यवस्थित शिकली तर कोणत्याही व्यक्तीला ती ३० ते ५० तासांत ही भाषा शिकता यावी, अशी त्यामागची कल्पना होती. विन्स्टल चर्चिल व फ्रँकलिन रुझवेल्ट यांसारख्या जागतिक नेत्यांनी आणि बर्नार्ड शॉ, एच. जी. वेल्स यांच्यासारख्या विद्वानांनी या भाषेचा पुरस्कार केला होता. तरीही आज ही भाषा जागतिक पातळीवर कुठेही नाही. उलट सकृतदर्शनी कुठलाही तार्किक आधार नसलेली ‘प्रमाण’ इंग्रजीच सर्वत्र भरधाव संचार करत आहे. असे का झाले?

कारण बेसिक इंग्लिशला केवळ तर्काचे अधिष्ठान होते, परंपरेचे नाही. रुडॉल्फ फ्लेश या तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार, या भाषेतील शब्दावली अगदीच तुटपुंजी असल्यामुळे सांगायची गोष्ट जास्तच क्लिष्ट होते आणि संवाद गरजेपेक्षा जास्त कठीण होतो. ही भाषा बेसिकही नाही आणि इंग्रजीही नाही, असे फ्लेश म्हणाले होते. म्हणूनच आपल्या मराठीतील बा. सी. मर्ढेकर यांच्यासारख्या हाडाच्या कवीने ‘बेसिक इंग्लिश’ला विरोध करणारी एक पुस्तिका लिहिली होती.

भाषा सोपी करणे हे शिवधनुष्य आहे, ते सरकारने उचलणे अपेक्षित नाही. कारण शिक्षणाचा मूळ उद्देश हा विद्यार्थ्याला आहे त्या स्थितीतून वर उचलणे, त्याला अधिक शहाणे करून सोडणे. ते काम शिक्षकाचे आहे, सरकारचे नाही. परंपरेने आलेल्या भाषेवर घाव घालून तीत बदल करण्याचे प्रयत्न आजवर एकाही लोकशाही देशात शक्य झालेले नाहीत. आपल्या भाषेत क्रांतिकारी बदल करून तिला नवे वळण देण्याची उदाहरणे केवळ तुर्की, रशिया आणि चीन अशा देशांमध्ये सापडतात. या तिन्ही देशांत हुकूमशाही राजवटी होत्या आणि तरीही, तुर्की वगळता रशिया व चीनला यात आजही संपूर्ण यश आलेले नाही. जर्मनी व ब्रिटनसारख्या आधुनिक देशांमध्ये लोकांना आपल्या जुन्या भाषेची ओढ वाटत असेल, तर ती पुण्याई त्या भाषेने धरलेल्या मुळाची असते. संबंधित समाजाच्या हाडीमाशी खिळलेल्या शब्दांची असते. त्यामुळे कृत्रिमरीत्या तिला बाळबोध करणे अशक्य आहे. ती पुन्हा आपल्या वळणावर येईल. भाषेचे पहिले पाढे पंचावन्नच होतील!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
मोहन About 116 Days ago
खूप छान ! पहिले पाढे पंचावन्नच !
0
0

Select Language
Share Link
 
Search