Next
दिव्यांगांसाठीच्या सर्वसमावेशक आराखड्याचे पहिले पुस्तक प्रकाशित
‘बीएनसीए’च्या दहा विद्यार्थिनींसह देशभरातील १४ जणांचा त्यात सहभाग
BOI
Saturday, September 07, 2019 | 04:34 PM
15 0 0
Share this article:

‘डिझाइन अॅज अ इक्विलायझर’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी (डावीकडून) प्राचार्य डॉ. कश्यप, समीर घोष, प्रा. सायली अंधारे, विजय गर्ग, डॉ. संजय जैन, डॉ. शुभदा कमलापूरकर व प्रा. कविता मुरुगकर.

पुणे : केंद्र सरकारच्या सुगम्य भारत संकल्पनेतील दिव्यांगांना वावरण्यासाठी पूरक वास्तू आराखड्यांचा समावेश असलेल्या ‘डिझाइन अॅज अॅन इक्विलायझर’ (सर्वसमावेशक आराखडा) या पहिल्या अभ्यासपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुण्यात झाले. 

महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या ‘डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन’मधील (बीएनसीए) दिव्यांग तज्ज्ञ व युनिव्हर्सल डिझाइन सेंटरच्या प्रा. कविता मुरुगकर यांनी हे पुस्तक संपादित केले असून, या पुस्तकात १३ युवा आर्किटेक्ट विद्यार्थ्यांचे अभ्यासपूर्ण लेख आहेत. 

या वेळी दिव्यांग क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत समीर घोष, काउन्सिल ऑफ आर्किटेक्टसचे अध्यक्ष विजय गर्ग, ‘आयएलएस’ कॉलेजमधील प्राध्यापक डॉ. संजय जैन, ‘बीएनसीए’च्या शैक्षणिक विभागाच्या प्रमुख डॉ. शुभदा कमलापूरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 

‘देशातील केवळ सरकारी इमारती दिव्यांगपूरक न ठेवता प्रत्येक बांधकामच सर्वसमावेशक पद्धतीने उभारले गेले पाहिजे. दिव्यांग हे सर्वसामान्यांमधलेच एक असून त्यासाठी त्यांना सामावून घेणारी मानसिकता समाजातील सर्व क्षेत्रात जोपासली गेली पाहिजे,’ अशी अपेक्षा आर्किटेक्ट विजय गर्ग यांनी व्यक्त केली.
‘आर्किटेक्ट काउन्सिलने याविषयी जनजागृती करण्यास प्राधान्य दिले असून, देशभरातील विविध आर्किटेक्चर महाविद्यालयांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहेत,’ असेही त्यांनी सांगितले. 

दोन्ही हात नसणारे दिव्यांगतज्ज्ञ समीर घोष म्हणाले, ‘जे दिव्यांगांसाठी असते ते सर्वसामान्यांनाही अधिक सुलभपणे वापरता येते. यातून दिव्यांगांना वेगळे काढण्याची मनोवृत्ती नाहीशी होण्यास मदत होईल.’ 

संजय जैन यांनी देशात प्रथमच असे पुस्तक निघत असल्याबद्दल ‘बीएनसीए’चे अभिनंदन केले. 

प्राचार्य डॉ. कश्यप म्हणाले, ‘दिव्यांग ही माणसातील स्वतंत्र विभागणी नसून, ती इतरांप्रमाणेच क्षमता असणारी आहेत. त्यांनाही इतरांप्रमाणे समान पर्याय व संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत.’ 

‘वैश्विक आराखड्यातही (युनिव्हर्सल डिझाइन) आता बदल होणे गरजेचे असून, त्यामध्ये सर्वांना सामावून घेता आले पाहिजे,’ असे मत प्रा. कविता मुरुगकर यांनी व्यक्त केले. 

प्रा. सायली अंधारे यांच्यासह ‘बीएनसीए’च्या मोहिनी भोसेकर, राधिका ढेकणे, अविना भरूका, अमोली सुराना, नेहा ओसवाल, देवकी बांदल, राजवी मेहता, जुई अत्रे, सिंहगड कॉलेजचा राज चरानिया, तसेच चंदीगड कॉलेजच्या शीन पंडिता आणि टाटा संस्थेच्या प्राची महाजन आणि डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या नम्रता गुजराथी यांनी या पुस्तकासाठी अभ्यासपूर्ण लेख लिहिले असून, पुस्तकाच्या निर्मितीत आर्किटेक्ट अभिजित मुरुगकर आणि प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांचे मोलाचे योगदान आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search