Next
झोपडीत राहणारे प्रतापचंद्र सारंगी झाले केंद्रीय मंत्री
BOI
Friday, May 31, 2019 | 03:29 PM
15 0 0
Share this article:

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारच्या शपथविधीवेळी प्रतापचंद्र सारंगी यांचे नाव पुकारले गेले, तेव्हा टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला. लोकशाहीमुळे काय चमत्कार होऊ शकतो, हेच जणू त्या वेळी दिसून आले. एका झोपडीवजा घरात राहणारे आणि सायकलवरून फिरणारे प्रतापचंद्र सारंगी हे सामाजिक कार्यकर्ते कोट्यधीश प्रतिस्पर्धी उमेदवाराला हरवून खासदार झाले आणि मोदींनी त्यांना मंत्रिपदही दिले. त्यांच्या शपथविधीवेळी अमित शहाही टाळ्या वाजवताना दिसत होते. 

६४ वर्षांचे प्रतापचंद्र सारंगी ‘ओडिशाचे मोदी’ म्हणून ओळखले जातात. त्यांना लोक प्रेमाने नाना असे म्हणतात. ते साध्या राहणीमानासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे घर म्हणजे एक झोपडी आहे आणि ते फिरण्यासाठी सायकलचा वापर करतात. ओडिशातील बालासोर मतदारसंघातून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यांनी बिजू जनता दलाचे उमेदवार आणि आधीचे खासदार उद्योगपती रवींद्रकुमार जेना यांचा १२ हजार ९५६ मतांनी पराभव केला. गेल्या निवडणुकीत सारंगी जेनांकडून हरले होते. प्रतिस्पर्धी उमेदवार आलिशान गाड्यांतून प्रचार करत असताना सारंगी यांनी प्रचारासाठी एक ऑटोरिक्षा भाड्याने घेतली होती. 

अविवाहित असलेल्या सारंगी यांच्याकडे गाडी, ज्वेलरी यांपैकी काहीही नाही, तसेच त्यांच्यावर कोणते कर्जही नाही. त्यांच्या वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेची किंमत १५ लाख, तर जंगम मालमत्तेची किंमत दीड लाख रुपये आहे, असे त्यांनी प्रतिज्ञापत्रात जाहीर केले होते. शेती आणि पेन्शन हे त्यांचे उत्पन्नाचे स्रोत आहेत. त्यांच्या विरोधात उभ्या असलेल्या जेना यांची संपत्ती ७२ कोटी रुपये, तर काँग्रेसचे नवज्योती पटनाईक यांची संपत्ती १०४ कोटी रुपये आहे. 

२००४ आणि २००९मध्ये ते निलगिरी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. बालासोर आणि मयूरभंज जिल्ह्यांमधील आदिवासी गावांत गणशिक्षा मंदिर योजनेअंतर्गत सारंगी यांनी गरिबांच्या मुलांसाठी समर कारा केंद्र या नावाने अनेक शाळा सुरू केल्या. अनेक गावांत त्यांनी एकशिक्षकी शाळाही सुरू केल्या. आमदार म्हणून मिळणाऱ्या पेन्शनचा बहुतांश भाग ते गरीब मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात. ‘राजकारण हे माझ्यासाठी राष्ट्रसेवेचे साधन आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी शपथविधीनंतर दिली. 

लहानपणी त्यांचा ओढा अध्यात्माकडे होता. रामकृष्ण मठात साधू बनण्याची त्यांची इच्छा होती. बेलूर मठात ते अनेक वेळा गेले होते; मात्र त्यांची विधवा आई त्यांच्यावर अवलंबून असल्याने तेथील साधूंनी प्रतापचंद्रांना आईची सेवा करण्यास सांगितले. तिथून ते परतल्यानंतर त्यांनी समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले. त्यांच्या आईचे गेल्या वर्षी निधन झाले.

ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अनेक वर्षे निगडित असून, त्यांनी बजरंग दलाचे ओडिशा राज्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी पाहिली आहे. ओडिशात ते विश्व हिंदू परिषदेचे सहसचिवही होते. ओडिशा भाजपचे उपप्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली असून, ते भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. त्यांच्या समाजकार्याची आणि पक्षकार्याची योग्य दखल घेऊन त्यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग, तसेच पशुधन, डेअरी आणि मत्स्य या ग्रामीण भागाशी संबंधित असलेल्या खात्यांचे राज्यमंत्रिपद त्यांना देण्यात आले आहे. त्यांच्या ग्रामीण भागातील कार्याच्या अनुभवाचा त्यासाठी चांगला उपयोग होऊ शकेल. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
BDGramopadhye About 140 Days ago
If only there were some more like him . Well , a few more .
0
0
RAJAJI S BUDHWANT About 141 Days ago
भारत के प्रधानमंत्री श्री नरेंद्रभाई मोदी, प्रतापचंद्र और उनकी सभी टीम भारत देश मे बदलाव के प्रयास मे लगे है उनको साथ ,साथ नही दे शकतो हो तो कम से कम विरोध मत करो
0
0

Select Language
Share Link
 
Search