Next
संत एकनाथांच्या भारूड निरूपणात श्रोते तल्लीन
प्रेस रिलीज
Thursday, July 26, 2018 | 05:09 PM
15 0 0
Share this storyपुणे : आषाढी एकादशीनिमित्त येथील आदित्य प्रतिष्ठानतर्फे संत एकनाथांच्या भारूडाचे निरूपण विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी केले. त्यांनी केलेल्या निरूपणामध्ये सर्व श्रोते न्हाऊन निघाले.

महाराष्ट्रात कीर्तनाच्या पाच परंपरा आहेत. पहिली हरिदासी परंपरा म्हणजेच नारदीय कीर्तन, दुसरी वारकरी संप्रदाय, तिसरी रामदासी संप्रदाय, चौथी दासगणू महाराजांची आणि पाचवी संत गाडगेबाबा यांची कीर्तन परंपरा आहे. वारकरी संप्रदायामधील ‘दादला नको ग बाई’ या संत एकनाथांच्या भारुडाचे निरूपण अभ्यंकर यांनी अतिशय सोप्या भाषेत श्रोत्यांना समजावून सांगितले.

मानवी देह आणि त्याचे स्वभाव व विकार यांचे तत्वज्ञान या भारुडात संत एकनाथांनी कशाप्रकारे सांगितले आहे याचे निरूपण गुरुदेवांनी केले. दादला म्हणजे अहंकार, मोडके घर म्हणजे शरीर, फाटके घर हे चित्त, तुटकी चोळी मनोरूप, अंबाड्याच्या भाजीचे पान हे पंचप्राणांचे प्रतीक, दोरा म्हणजे भगवंताचे अनुसंधान, तेलाची धार ही अनन्य भक्ती अशी भारूडातील अनेक सुंदर रूपके गुरुदेवांनी सोदाहरण उलगडली.गेली २५ वर्षे दर आषाढीला हा कीर्तन सोहळा संपन्न होतो. निरुपणाबरोबर तरुण टाळकऱ्यांचा सहभाग, जितेंद्र आणि आदित्य यांचे अप्रतिम अभंगगायन आणि टाळमृदुंगाच्या घोषात तुडुंब भरलेल्या सभागृहात श्रोत्यांचीही साथ असा हा कार्यक्रम होता. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा कीर्तनाचा सांगीतिक सोहळा पार पडला. या वेळी प्रमुख म्हणून डॉ. गो. बं. देगलूरकर, उगार साखर कारखान्याचे चेअरमन राजाभाऊ शिरगावकर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू नितीन करमळकर उपस्थित होते.

प्रारंभी संस्थेच्या कार्याची माहिती देण्यात आली. टाळकरी आणि विणेकरी यांच्या पंचपदीने कीर्तनाची सुरुवात झाली. त्यानंतर अभ्यंकरांनी सेवेचे भारूड सादर केले. कीर्तनाचा शेवट ‘भैरवी’ गाऊन केला. कार्यक्रमाची सांगता ज्ञानोबांची आरती आणि विठ्ठलाच्या गजराने झाली. गेली २५ वर्षे ही कीर्तनसेवा अखंड चालू आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link