Next
अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे म्हसरुंडी गावात आयोजन
BOI
Tuesday, September 10, 2019 | 07:01 PM
15 0 0
Share this article:



कल्याण :
ठाण्याच्या कल्याण तालुक्यातील म्हसरुंडी गावात नागरिकांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. युवा संस्कार बहुउद्देशीय संस्थेने अंधश्रद्धा निर्मूलन शहापूर शाखेतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला होता.

‘टीम परिवर्तन’चे सहकारी वेळोवेळी गावात जाऊन कपडेवाटप, शैक्षणिक साहित्याचे वाटप करत असतात. गावामधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठीही कार्यक्रम राबविले जातात. ‘ग्रामीण भागातील नागरिक आजही आजारी पडले की भगत, बुवा, बाबा यांच्याकडे जातात. हे थांबण्यासाठी मनातील भूत काढणे महत्त्वाचे आहे,’ असे स्वप्नील शाहू यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले. ‘विवेकाचा आवाज बुलंद करू या,’ असे आवाहन त्यांनी केले.



अंधश्रद्धेचा फायदा घेऊन लोकांचे आर्थिक व शारीरिक शोषण होत असते. ही फसवणूक व शोषण फार मोठे आहे. म्हणून अशा अंधश्रद्धा दूर करण्यासाठी व्याख्याते व प्रबोधनकार शाहीर स्वप्नील शाहू यांनी व्याख्यानातून मार्गदर्शन केले. करणी, भूत-प्रेत अंगात येणे, मांजर आडवे जाणे, रात्री केस न कापणे, लिंबू-मिरची अशा अनेक अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विविध प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधन केले. आपली नोकरी सांभाळून शाहीर स्वप्नील शाळा महाविद्यालयांत व खेडोपाड्यात जाऊन असे प्रबोधनात्मक कार्यक्रम करून जनजागृती करत असतात.

युवा संस्कार बहुउद्देशीय संस्थेचे सोमनाथ राऊत यांनी हा कार्यक्रम खूप गरजेचा होता असे सांगून इतरही आदिवासी पाड्यांवर असे कार्यक्रम आयोजित करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाला लहान मुलांसोबत त्यांचे पालकही उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search