Next
पुण्यात आंतरज्योती ब्रेल मासिक वाचक मेळावा
पुणे अंधजन मंडळाचा पुढाकार
प्रेस रिलीज
Thursday, February 21, 2019 | 04:43 PM
15 0 0
Share this story



पुणे : पुणे अंधजन मंडळातर्फे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी आंतरज्योती वाचक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हडपसर येथील मंडळाच्या टेक्निकल ट्रेनिंग सेंटरमध्ये आयोजित या एक दिवसीय मेळाव्यामध्ये दृष्टिबाधितांच्या कल्याणासाठी प्रेरणादायक कार्य करणाऱ्या सन्मानीय व्यक्तींचा गौरव, वाचकांच्या कवितांचे सादरीकरण, ख्यातनाम एकपात्री कलाकार बंडा जोशी यांचा कार्यक्रम होणार आहे.

दृष्टिबाधित व्यक्तींच्या वाचनाची आवड लक्षात घेऊन ५० वर्षांपेक्षा जास्त काळापासून पुणे अंधजन मंडळ या सामाजिक संस्थेतर्फे आंतरज्योती नावाचे ब्रेलमधील मराठी मासिक प्रसिद्ध केले जाते. या मासिकामध्ये कथा, कविता, माहितीपर लेख यांचा समावेश असतो. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी राहणाऱ्या अनेक दृष्टिबाधित व्यक्ती मासिकाच्या सभासद आहेत. संस्थेच्या वतीने गेली अनेक वर्षे आंतरज्योती मासिकाच्या वाचकांचा वार्षिक मेळावा आयोजित केला जातो.

सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट या कार्यक्रमचे अध्यक्ष आहेत. तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, सुप्रसिद्ध कवी उद्धव कानडे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  

मंडळामार्फत दृष्टिबाधित व्यक्ती, विद्यार्थी यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकल्प राबविले जातात. यामध्ये दृष्टिहीन निराधार महिलांसाठी मोफत वृद्धाश्रम, १८ ते ३५ वयोगटातील दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी मोफत टेक्निकल ट्रेनिंग सेंटर, डोळ्यांच्या विविध आजारांवरील उपचारासाठी अद्यावत हॉस्पिटल यांचा समावेश आहे. आतापर्यंत महाराष्ट्र, तसेच भारतामधील अनेक दृष्टिबाधित व्यक्ती संस्थेच्या प्रकल्पाचे लाभार्थी आहेत.  

मेळाव्याविषयी :
दिवस : शनिवार, २३ फेब्रुवारी २०१९
वेळ : सकाळी ९ ते दुपारी ३
स्थळ : पुणे अंधजन मंडळ संचलित कमला अमूल मसंद, टेक्निकल ट्रेनिंग सेंटर, डॉ. हेलेन केलर रोड, रामटेकडी, हडपसर, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link