Next
वैभवशाली साताऱ्याची सफर – भाग चार
BOI
Wednesday, April 17, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

काशीविश्वेश्वर मंदिर, संगम माहुली

‘करू या देशाटन’
या सदरात आपण सध्या वैभवशाली साताऱ्याची सफर करत आहोत. आजच्या भागात माहिती घेऊ या साताऱ्याच्या पूर्व व दक्षिण भागातील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणांची. 
..............
सातारा म्हणजे गडकोटांचा जिल्हा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हा जिल्हा पावन झाला आहे. त्याशिवाय अनेक तीर्थक्षेत्रे येथे असून, अनेक विचारवंत, राजकीय नेते या भूमीने दिले. हा जिल्हा कृषी, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. 

काशीविश्वेश्वर मंदिर, संगम माहुली

संगम माहुली :
सातारा शहरातील पोवई नाक्यापासून साधारण चार किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. या ठिकाणी मध्याश्म युगातील म्हणजे साधारण इसवी सन पूर्व २५०० ते ८००० या कालखंडातील प्राण्यांची शिकार करण्यासाठी वापरली जाणारी प्राथमिक अवस्थेतील अणकुचीदार पाषाणशस्त्रे सापडली आहेत. जावळी येथे सर्वांत जास्त म्हणजे ३५० अणकुचीदार शस्त्रे सापडली आहेत. येथे कृष्णा व वेण्णा या नद्यांचा संगम झाला आहे. त्यामुळे संगम माहुली हे नाव रूढ झाले. नदीच्या पलीकडे पूर्वेस क्षेत्र माहुली आहे. पूर्वी पूल नव्हता, त्या वेळी नदी पार करण्यासाठी नाव किंवा मोठ्या काहिली वापरल्या जात. नावेला बांधण्यासाठी वापरात असलेला चबुतरा साखळीसह अद्यापही अस्तित्वात आहे.

शाहू महाराज समाधी

दीपमाळ, काशीविश्वेश्वर मंदिर, संगम माहुलीया बाजूला सातारा शहराची स्मशानभूमी आहे. संगमाजवळ श्रीमंत शाहू महाराज, तसेच महाराणी ताराबाई यांची समाधी आहे. तसेच विरुबाईसाहेबांचे वृंदावन आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सती गेल्या. त्याचे स्मरण म्हणून नदीशेजारील वाळवंटात दोन शिवलिंगे स्थापन करण्यात आलेली आहेत. संगमावर असलेले हेमाडपंती मंदिर अतिशय सुंदर आहे. दोन बाजूला यात्रेकरूंसाठी ओवऱ्या बांधण्यात आल्या आहेत. तसेच समोर उंच दीपमाळा आहेत. नदीपर्यंत घाटही आहे. मंदिरात सभागृह, अंतराळ आणि गर्भागृह अशी रचना असून, गर्भागृहाच्या आतील शिल्पे अतिशय सुंदर आणि अतिशय सुरेख आहेत. श्री गणेश आणि देवी पार्वती यांच्या मूर्ती आहेत. 

क्षेत्र माहुली : कृष्णा नदीच्या पूर्व किनाऱ्यावर क्षेत्र माहुली हे गाव वसले आहे. ‘रामशास्त्री बाण्याचे’ म्हणून प्रसिद्ध झालेले इतिहासातील न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांचे हे गाव. त्यांचा जन्म येथीलच. हे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले गाव आहे. येथेही नदीला सुंदर घाट बांधला आहे. थोरले बाजीराव जेव्हा साताऱ्याला छत्रपतींची गाठ घेण्यासाठी येत असत, त्या वेळी त्यांचा मुक्काम येथे असे. नदीकाठावर एक जागा गावकरी दाखवतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे येथे मस्तानी राहत असावी. शेवटचे मराठा व इंग्रज यांच्यात शेवटची लढाई होण्यापूर्वी दुसरा बाजीराव व जॉन माल्कम यांची भेट येथे झाली होती. येथे श्रीरामेश्वराचे सुंदर मंदिर असून, घाट बघण्यासारखा आहे. 

रामेश्वर मंदिर व घाट, क्षेत्र माहुली

देवळाच्या उजव्या बाजूला कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम दिसतो. पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर संगमाचे दृश्य खूपच सुंदर दिसते. संगम माहुलीच्या काशीविश्वेश्वर मंदिरासमोर हे मंदिर आहे. येथे कृष्णाबाई उत्सवाची ३०० वर्षांची परंपरा आहे. हेलसिंकी येथे कुस्तीमध्ये भाग घेतलेले श्रीरंग पैलवान या गावचेच. प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे हे याच गावाचे. त्याचे चिरंजीव चारुदत्त आफळेही त्यांचा वारसा चालवीत आहेत. नखचित्रकार, शिल्पकार, माजी आमदार, डॉ. आंबेडकरांचे सहकारी खंडेराव सावंत हेही माहुली गावचेच. 

श्री रामेश्वर घाट, क्षेत्र माहुली

काशीविश्वेश्वर मंदिर यात्री निवास, संगम माहुली

सोनगाव संमत निंब :
क्षेत्र माहुली गावाच्या पुढे सोनगाव म्हणून एक गाव आहे. येथे कृष्णा नदी झेड आकारात ३० अंशांमध्ये तीव्र वळणे घेते. सोनगावाजवळ वाकेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराच्या तीन बाजूंना कृष्णा दिसते. कृष्णा उत्तरेकडून दक्षिणेला येते व लगेच ३० अंशांमध्ये वळण घेऊन परत उत्तरकडे वळते. थोडे अंतर उत्तरेला गेल्यावर परत पश्चिमेस वळते व परत लगेचच दक्षिणेस माहुलीकडे मार्गस्थ होते. आपण बऱ्याच ठिकाणी इंग्रजी एस आकारात नागमोडी वळणे घेतलेल्या नद्या पाहतो; पण असे वळण क्वचितच पाहायला मिळते. 

कृष्णा नदीची वळणे

महागाव :
माहुलीच्या दक्षिणेस महागाव आहे. हे गाव भटजी पैलवान दिवंगत दामोदर बळवंत भिडे गुरुजी यांचे गाव. योगीराज अरविंद त्यांच्याकडे योगसाधनेबाबत चर्चा करण्यासाठी येत असत. ते स्वतः कुस्तीगीर होते व व्यायाम शिक्षक होते. 

कृष्णधाम : संगम माहुलीच्या दक्षिण बाजूला साताऱ्याला पाणीपुरवठा करण्यासाठी उपसा केंद्र आहे. त्याच्या खाली थोड्या अंतरावर कोडोली हद्दीमध्ये कृष्णा नदीवरच कृष्णधाम हे सुंदर, निसर्गरम्य सहलीचे ठिकाण आहे. रहिमतपूर रस्त्यावरून कोडोली गावाच्या पुढे डावीकडे कृष्णधामाकडे जाण्यासाठी गाडीरस्ता आहे. 

अंगापूर

अंगापूर :
सातारा रहिमतपूर रस्त्यावरून थोडे पुढे गेल्यावर जिहे गावाच्या जवळ उजवीकडे अंगापूरला रस्ता जातो. येथे २५० वर्षांपूर्वीचे गणपती मंदिर असून, संपूर्ण परिसराला तटबंदी आहे. गणपतीची मूर्ती अतिशय सुंदर आहे. मंदिराचे प्रांगण फरसबंद आहे. 

धावडशी

धावडशी :
हे सातारा जिल्ह्यातील एक धार्मिक ठिकाण आहे. साताऱ्याच्या वायव्येला सुमारे १० किलोमीटरवरील मेरुलिंग डोंगरांच्या पायथ्याशी वनश्रीने नटलेले हे एक खेडेगाव आहे. येथे ब्रह्मेंद्रस्वामी उर्फ भार्गवराम यांची समाधी आणि मठ आहे. श्री ब्रह्मेंद्रस्वामी यांचा जन्म सन १६४९मध्ये विदर्भातील राजूरजवळ असलेल्या दुधेवाडी येथे झाला. काशीचे श्री ज्ञानेंद्र सरस्वती नायक यांनी त्यांना परमहंस दीक्षा दिली. तेव्हापासून ते ब्रह्मेंद्रस्वामी म्हणून ओळखले जाऊ लागले. स्वामी वाई तालुक्यातील वीरमाडे येथे समाधिस्त झाले होते; (पुण्याहून येताना आनेवाडी टोल नाक्याच्या डावीकडे वीरमाडे आहे.) परंतु आपली समाधी धावडशी येथे असावी, अशी इच्छा त्यांनी पूर्वीच दर्शविलेली असल्याने धावडशी येथे त्यांची समाधी बांधून तेथे देऊळ बांधण्यात आले. या स्वामींचा व त्या वेळच्या (पूर्व पेशवाईतील) प्रमुख मराठी मुत्सद्यांचा गुरु-शिष्यसंबंध असे. छत्रपती शाहू महाराज आणि पहिले तीन पेशवे हे या स्वामींचे शिष्य होते. या ठिकाणी असलेले स्वामींचे देऊळ व संगमरवरी पुतळा, गुहा आणि दोन तलाव, तसेच मंदिराच्या महाद्वाराच्या वर एक शिलालेख असून, श्री ब्रह्मेंद्रस्वामींचे गुणगान गाणारा १७ ओळींचा शिलालेख आहे. समाधीजवळ उंच अशा पितळेच्या दोन घाटदार समया आहेत. मंदिराच्या पुढील बाजूस भव्य सभामंडप असून, त्याचे बांधकाम लाकडी कलाकुसरीचे आहे. शंभर वर्षांपूर्वी मंडपाचे बांधकाम झाले असून, ते उत्तम स्थितीत आहे. लाकडी गलथे आणि महिरपी यांनी सभामंडपास शोभा आलेली आहे. संपूर्ण मंडपास कडीपाट आहे. सभामंडपात हंड्या व झुंबरे लावलेली आहेत. श्री ब्रह्मेंद्रस्वामींचा मोठा फोटो आहे. शेजारी छत्रपती शाहू महाराज व राणी लक्ष्मीबाई यांची मनोवेधक सुंदर चित्रे आहेत. या ठिकाणी जवळपास तीनशे वर्षांतील जुनी ऐतिहासिक कागदपत्रे जतन करून ठेवण्यात आली आहेत. झाशीच्या राणीच्या पूर्वजांच्या वाड्याचे अवशेष आजही येथे दिसून येतात. धावडशीला साताऱ्याकडून किंवा पुण्याकडून आल्यास वर्ये गावातून गाडीरस्ता आहे. 

मेरुलिंग : धावडशीच्या वरच्या बाजूला डोंगरावर असलेले मेरुलिंग येथील शिवमंदिर विशेष उल्लेखनीय आहे. मेरुलिंग येथे जाण्यासाठी आनेवाडी टोल नाका, तसेच कण्हेर धरणाच्या वरच्या बाजूला भणंग गावाजवळून रस्ता आहे. मेरुलिंग हे निसर्गरम्य ठिकाण असून, डोंगरावर साधारण २५०० फूट उंचीवर आहे. येथे मोर पाहायला मिळतात. 

बारामोटेची विहीर

बारामोटेची विहीरबारामोटेची विहीर : सातारा शहराच्या उत्तरेस सातारा-पुणे रस्त्यावर लिंब खिंड ओलांडली, की उजवीकडे लिंब गावाकडे रस्ता गेला आहे. या गावाच्या अगोदरच उजवीकडे शेरी म्हणून गाव आहे. या गावात ही प्रसिद्ध विहीर असून, एकाच वेळी १२ मोटांनी पाणी ओढता येईल, अशी व्यवस्था केलेली आहे. स्थापत्यकलेचा १८व्या शतकातील हा एक सुंदर नमुना आहे. श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम सन १७२१ ते १७२४ (शके १६४१ ते १६४६) या कालावधीत पूर्ण केले. ५० फूट व्यासाची आणि साधारण ११० फूट खोल अशी विहीर आहे. मोडी लिपीतील एक शिलालेखही येथे आहे. आतील बाजूस दोन मजली दगडी बांधकाम आहे. एका बाजूने पाण्यापर्यंत पायऱ्यांचे बांधकाम केलेले आहे, तर विहिरीच्या कडेवर एक छोटा महाल असून त्यातून भुयारी मार्गाने खाली जाता येते. महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर केलेली आहे. आतील बाजूस शरभाची दगडी मूर्ती आहे. महालात विविध चित्रे कोरलेली आहेत. गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे तर दिसतातच; मात्र त्यांसोबत विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्पदेखील या खांबावर कोरलेले दिसते. पुण्याहून येताना आनेवाडी टोलनाक्यापासूनच सर्व्हिस रोडने पुढे यावे. डाव्या बाजूला लिंब गावाची स्वागतकमान आहे. तेथून या ठिकाणी जाता येते. (या विहिरीविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नागेवाडी : बनशंकरी देवीचे सुंदर निसर्गरम्य मंदिर येथे आहे. हायवेलगत साताऱ्याच्या लिंब खिंडीजवळ हे मंदिर आहे. 

मर्ढे : मराठी नवकाव्याचे प्रवर्तक बा. सी. मर्ढेकर यांचे हे मूळ गाव. येथे मर्ढेकरांच्या मूळ गोसावी घराण्याचा एक मठ असून, श्रीरामाचे मंदिरही आहे. स्वत : मर्ढेकर या गावात फारसे राहिले नसले, तरीही आकाशवाणीच्या नोकरीतील निवृत्तीनंतर मर्ढे येथे येऊन शेती करावी, असे स्वप्न मर्ढेकरांनी उराशी बाळगले होते; मात्र ते पूर्णत्वास गेले नाही. ‘कितीतरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो’ ही कविता मर्ढेकरांनी येथेच कृष्णा नदीकाठी लिहिली असल्याचे सांगणारे गावकरी आजही गावात आहेत. या गावात सन १७०९मध्ये छत्रपती शाहू महाराजांची छावणी होती. कृष्णा नदीच्या काठावरच सिद्धामृत मठाची गढीवजा भव्य दगडी वास्तू उभी आहे. समर्थ रामदास स्वामींनी या मठाची स्थापना केली आहे. मठाचे तिसरे मठपती अमृतेश्वर यांनी पीयूष रामायण कविताबद्ध, तसेच तत्त्वझाडा हा प्राकृत ग्रंथ लिहिला. पूर्वी या मठात सिद्धामृत विद्यापीठ होते. 

वडाचे म्हसवे

वडाचे म्हसवे :
येथील वटवृक्ष तब्बल अडीच एकर परिसरात विस्तारला असून, तो विस्ताराने आशिया खंडात दुसऱ्या क्रमांकाचा आहे. पाचवड-कुडाळ रस्त्यावर पाचवडपासून पाच किलोमीटर अंतरावर म्हसवे गावानजीक हे वडाचे झाड आहे. या वटवृक्षामुळेच गावाला ‘वडाचे म्हसवे’ या नावाने ओळखले जाते. या वटवृक्षाची ब्रिटिशकालीन ‘फ्लोरा ऑफ बॉम्बे प्रेसिडेन्सी’मध्ये प्रथम क्रमांकाचा वटवृक्ष म्हणून नोंद आहे. १८८२मध्ये ली वॉर्नर या ब्रिटिश अधिकाऱ्याने सातारा जिल्ह्यातील या वडाच्या झाडाचा उल्लेख केला आहे. १९०३मध्ये पुण्याच्या सायन्स कॉलेजचे प्राचार्य असलेल्या कुक थिओडोर या ब्रिटिश नागरिकाने पश्चिम घाटातील वृक्षांची नोंद असलेले पुस्तक लिहिले आहे. त्यातही या वृक्षाची नोंद आहे. या वटवृक्षावर पशुपक्ष्यांचे मोठ्या संख्येने वास्तव्य असते. वटवाघूळ, बुलबुल, सातभाई, भारद्वाज आदी २८ प्रजातींचे वास्तव्य आढळते. झाडाच्या सुमारे शंभर पारंब्यांचे खोडात रूपांतर झाले आहे. त्यामुळेच सुमारे दोनशे वर्षांहून अधिक काळाचे हे झाड अद्याप टिकून आहे. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील वाईजवळील पाचवड येथून मेढा रस्त्याजवळच हे झाड आहे. 

पाटेश्वर

पाटेश्वर :
पाटेश्वर हे स्थळ साताऱ्यापासून ११ किलोमीटर अंतरावर आग्नेय दिशेला एका टेकडीवर आहे. पाटेश्वरचे वैशिष्ट्य म्हणजे लेण्यांमध्ये आणि मंदिरामध्ये विविध आकारात, प्रकारात, कोरलेल्या अगणित शिवपिंडी. येथे बोटाच्या पेराएवढ्या लहान आकारापासून ते अंदाजे चार फूट उंचीपर्यंतच्या पिंडी पाहायला मिळतात. अशीच पिंड्यांच्या कोरीव कामातही विविधता आढळते. पाटेश्वर हे ठिकाण मुख्यतः महादेवाच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. मठ, मंदिरे, गुहा व मूर्ती हे पर्यटकांचे आकर्षण आहे. हे मंदिर पेशवेकालीन सावकार परशुराम नारायण अनगळ यांनी छत्रपती शाहूंच्या कारकिर्दीत बांधले; मात्र हे मंदिर बांधण्यापूर्वी लेणी अस्तित्वात होती. प्रामुख्याने गणपतीची प्राचीन स्त्रीवेषधारी मूर्ती, विश्वेश्वर पुष्करिणी, शंकराची दुर्मीळ ‘अज एकपाद’ मूर्ती येथे पाहायला मिळते. मुख्य मंदिराशिवाय काही लेणीसमूह आहेत. पहिल्या लेण्यास मरगळ (म्हशीचे लेणे) म्हणतात. येथे सहा शिवलिंगे कोरलेली आहेत. तसेच पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचे प्रतिनिधित्व करणारी पाच शिवलिंगे आहेत. पुष्करिणीपासून पुढे मंदिराकडे जाताना दोन शिवलिंगे आहेत. यातील एका पिंडीवर मध्यभागी मुख्य शिवलिंग व बाजूने ६८ शिवलिंगे कोरलेली आहेत. दुसऱ्या शिवलिंगावर मध्यभागी मुख्य शिवलिंगावर दाढी, मिशा असलेले शंकराचे शिल्प दिसून येते. याच्या बाजूने ७१ दंडगोलाकार शिवलिंगे आहेत. पुढे पाच लेण्यांचा बळिभद्र मंदिर लेणेसमूह आहे. यात एका ठिकाणी शिवपिंडीच्या बाजूने दहा दिशारक्षकांच्या प्रतिमा दिसून येतात. त्यातील आठ आकृत्या आठ दिशा व दोन आकृत्या सूर्य व चंद्र यांची प्रतीके आहेत. याशिवाय या लेण्यात दशावतार, अष्टमातृका, माहेश्वरी, नवग्रह, शेषशायी विष्णू, महिषासुरमर्दिनी, कार्तिकेय, चामुंडा यांची शिल्पे दिसून येतात. यानंतर आणखी तीन लेण्यांचा समूह आहे. येथे ९७२ शिवलिंगे आहेत. १०८ शक्तिपीठांची नऊ वेळा पूजा करण्याचा येथे संकेत दिला जातो. दक्षिणेकडील भिंतीवरील शिल्पपटामध्ये विष्णूची मूर्ती व बाजूला एक हजार शिवलिंगे कोरलेली आहेत. तसेच सूर्य व आणखी एक हजार शिवलिंगे दिसून येतात. याच दक्षिणेकडील भिंतीवरील शिल्पपटात सूर्याची मूर्ती व बाजूला पुन्हा एक हजार शिवलिंगे कोरलेली आहेत. याचबरोबर एकमुखी, चतुर्मुखी, सहस्रमुखी अशा अनेक प्रकारांतील शिवलिंगेही पाहायला मिळतात. तसेच अस्पष्ट असा एक शिलालेखही दिसून येतो. बहुधा तो संस्कृतमध्ये असावा. 

कण्हेर धरण : उरमोडी नदीवर कण्हेर या गावाजवळ हे धरण बांधण्यात आले आहे. उरमोडी धरणाचे पाणी बोगदा काढून कृष्णा खोऱ्याकडे वळविण्यात आले आहे. हा सातारा जिल्ह्यातील नदीजोड प्रकल्प आहे. हे पाणी सांगली जिल्हा, तसेच सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाला दिले जाते. धरणाच्या दोन्ही बाजूला हिरवेगार शालू नेसलेल्या उंच पर्वतरांगांचे विलोभनीय दृश्य पाहायला मिळते. 

कुसुंबी : श्री काळूबाईचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे. महाराष्ट्रातून हजारो भाविक येथे येत असतात. श्री काळूबाईचे हे मूळ ठिकाण मानले जाते. कण्हेर धरणाच्या जलाशयाच्या दक्षिण बाजूला हे मंदिर साधारण १० किलोमीटरवर आहे. 

केळघर धबधबा : कण्हेर धरणाच्या पुढे मेढामार्गे महाबळेश्वर रस्त्यावर केळघर गावाजवळ एक छोटा धबधबा आहे. या भागात पावसाळ्यात डोंगरातून पडणारे अनेक छोटे-मोठे धबधबे दिसतात. 

कोरेगाव : सातारा-पंढरपूर मार्गावरील एक प्रमुख बाजारपेठ असलेले हे तालुक्याचे ठिकाण आहे. या गावातून दिल्ली व पंजाबशी घेवड्याचा कोट्यवधी रुपयांचा व्यापार चालतो. येथील राजमाला नुकतेच ‘कोरेगाव घेवडा’ म्हणून पेटंट मिळाले आहे. असे म्हणतात, की दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना घेवड्याचे पीक घेण्याबद्दल राजमाता जिजाबाई यांनी सुचविले व घेवड्याचे बीदेखील उपलब्ध करून दिले. आज सातारा जिल्ह्यातील पूर्व दुष्काळी भागात घेवडा होतो व तो पंजाबात ‘राजमा’ म्हणून प्रसिद्ध आहे. राजमातेने दिलेला म्हणून ‘राजमा.’ साताऱ्यातील कोरेगावमधून कोट्यवधी रुपयांचा राजमा पंजाबला जातो. 

कोरेगावजवळील भाडळे गावात छोटा गंधर्व यांचा जन्म झाला. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत शंकराव जगताप यांची ही कर्मभूमी. त्यांचा जन्म वाघोली या गावी झाला. कोरेगावजवळ कुमठे नावाचे गाव आहे. काही लोकांच्या मते वामन पंडित यांचे येथे निधन झाले. याबाबत अनेक मतभेद असले, तरी याबद्दल संशोधन होणे गरजेचे आहे. वाईजवळील भोगाव व सांगली जिल्ह्यामधील कोरेगाव भूगाव येथे त्यांची समाधी आहे, असेही मानले जाते. 

रहिमतपूर : आदिशाही राजवटीपासून हे ठिकाण प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे होते. तसेच लष्करीदृष्ट्याही याला महत्त्वाचे स्थान होते. ब्रिटिश राजवटीत हे तालुक्याचे ठिकाण होते. नंतर सर्व कचेऱ्या कोरेगाव येथे हलविण्यात आल्या. रहिमतपूर नगरपालिका सन १८५३मध्ये स्थापन झाली. भारतातील जुन्या नगरपालिकांत या नगरपालिकेचा समावेश होतो. डॉ. राजेंद्र शेंडे हे आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ रहिमतपूरच्याच मातीतले. नाटककार वसंत कानेटकर, कवी गिरीश वगैरे मंडळी याचा मातीतील. प्रतापगडला जाताना अफझलखानाचा रहिमतपूर येथे मुक्काम पडला होता. रहिमतपूर-कोरेगाव रस्त्यावर दोन किलोमीटर अंतरावर एका ओढ्यात अफझलखानाचा निशाणाचा हत्ती चिखलात रुतून मेला. त्यामुळे अपशकुन झाला, अशी भावना सैनिकांमध्ये निर्माण झाली होती, असे म्हणातात. या ओढ्याला ‘खोल गिरा’ असे नाव पडले, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. 

कण्हेर खेड : इतिहासात आणि सध्याही दिल्लीच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले शिंदे (सिंदिया) म्हणजेच ग्वाल्हेरच्या शिदे राजवंशाचे हे मूळ गाव. राणोजीराव हे या घराण्याचे मूळपुरुष. श्रीमंत महादजी शिदे यांचे स्मारक येथे आहे. स्वर्गीय माधवराव शिंदे यांनी १९९८ साली या गावाला भेट दिली. श्रीमंत ज्योत्याजीराजे शिंदे, त्यांच्या आत्याबाई वसुंधराराजे यांनीही येथे भेट दिली आहे. त्यांचा गावाशी संपर्क असतोच. 

जरंडेश्वर : सातारा-कोरेगाव मार्गाच्या मध्यावर जरंडेश्वर पर्वत आहे. येथील मारुतीची स्थापना समर्थांनी केली असून, मारुतीचे मंदिर, मंडप, धर्मशाळा, गोविंदबाबा सिधये नावाच्या हनुमानभक्ताने बांधली आहेत. गोविंदबाबांना हनुमानाचा साक्षात्कार झाला होता, असे सांगितले जाते. दर शनिवारी येथील मारुतीला नियमितपणाने जाणारे लोक आहेत. श्रावणात दर शनिवारी खूपच गर्दी असते. जुन्या सातारा रोडने (स्टेशन बाजूने), तसेच सातारा-कोरेगाव मार्गावरील भिवंडी गावातून सुरभी अॅग्रोमार्गे याच्या पायथ्याशी जाता येते. दोन्ही बाजूंनी ट्रेकिंग करीतच जावे लागते. 

चंदनगड, वंदनगड : हे दोन गड कोरेगाव-वाई तालुक्याच्या सरहद्दीवर आहेत. हे गड जुळे असल्याने त्यांना चंदन-वंदन या नावाने ओळखले जाते. चंदनगडाची उंची २२०० फूट असून, चारही बाजूला उंच शिळा आहेत. गडावर विस्तृत मैदान असून, गैसपाक बाबांचा भव्य दर्गा आहे. हे किल्ले टेहळणीसाठी वापरले जायचे. जुळ्या भावासारखे हे किल्ले पुणे-सातारा हमरस्त्यावरूनही पूर्वेला दिसतात.

कल्याणगड : कोरेगावपासून १३ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. याला नांदगिरीचा किल्ला म्हणून ओळखतात. शिलाहार राजा दुसरा भोज याने १२व्या शतकात हा किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने इ. स. १६७३मध्ये तो जिंकून घेतला. मराठेशाहीत नांदगिरी हे येथील परगण्याचे मुख्य ठाणे होते. कल्याणगड चढताना अर्ध्या वाटेवर पाण्याचे टाके लागते. गडाला उत्तराभिमुख प्रवेशद्वार आहे. मुख्य दरवाजातून एक वाट गडाकडे जाते, तर दुसरी कड्याच्या कडेने एका गुहेत जाते. याच गुहेला पारसनाथ गुहा अथवा दत्त गुहा असे म्हणतात. परंतु जिवंत झऱ्याचे पाणी भरल्यामुळे ही गुंफा जलमय झाली आहे. पुढे सुमारे ३० मीटर लांबीचे एक भुयार लागते. या भुयारात कायम गुडघाभर स्वच्छ असे पाणी असते. आतमध्ये नवव्या शतकात स्थापलेली जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांची मूर्ती आहे. त्याच्याजवळ देवीची मूर्ती आहे. डाव्या बाजूला दत्तात्रयाची मूर्ती आहे. या सर्व मूर्ती सुबक आणि रेखीव आहेत. येथे आता पवनचक्क्या उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे गाडी रस्ता झाला आहे. 

त्रिपुटी : त्रिपुटी हे नाथसिद्ध श्री गोपाळनाथ महाराजांच्या वास्तव्यामुळे पवित्र झालेले गाव आहे. या ठिकाणी गोपाळनाथांची समाधी व मठ आहे. गोपाळनाथांनी ‘वेदान्त शिरोमणी’ हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या हैबती नावाच्या शिष्याने ‘नाथलीला विलास’ हा ग्रंथ लिहून त्यामध्ये गोपाळनाथ यांचे सविस्तर वर्णन केले आहे. येथे एक सुंदर बांधीव तलाव आहे. तो तलाव ब्रह्मेंद्रस्वामींनी बांधला असावा असे सांगितले जाते. 

चिमणगाव : पुसेगावकडे जाताना कोरेगावपासून सहा किलोमीटरवर चिमणगाव आहे. या गावात हेमांडपंती शैलीत बांधलेले महादेवाचे मंदिर आहे. तसेच समर्थांनी स्थापन केलेल्या प्रसिद्ध मारुतीपैकी एक मारुती मंदिर येथे आहे. दर वर्षी श्रावण महिन्यातील शनिवारी येथे यात्रा भरते. येथे आता साखर कारखानाही झाला आहे. 

तळबीड : शिवाजीराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे हे जन्मगाव आहे. या गावात त्यांची समाधी व स्मारक आहे. माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नामुळे स्मारक झाले आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे आजही या गावातील घरटी एक माणूस सैन्यात आहे. हे ठिकाण पुणे- कोल्हापूर रस्त्याच्या पश्चिमेला तीन-चार किलोमीटर अंतरावर आहे. सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी सोयराबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. त्या छत्रपती राजारामांच्या मातोश्री व छत्रपती संभाजी महाराजांच्या सावत्र आई होत्या. छत्रपती राजारामांच्या पत्नी महाराणी ताराबाई या सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या. ताराराणीबाईसाहेबांनी संताजी-धनाजी यांच्या साहाय्याने औरंगजेबाशी जो लढा दिला, त्याला इतिहासात तोड नाही. 

वसंतगड

वसंतगड :
या किल्ल्याची निर्मिती शिलाहार राजा भोज याने ११व्या शतकात केली. इ. स. १६५९मध्ये शिवरायांनी वसंतगड ताब्यात घेतला. किल्ला त्या वेळी मसूरचे आदिलशहाचे पूर्वापार जहागीरदार असलेले महादजी जगदाळे यांच्या ताब्यात होता. याच महादजीला आठ-दहा वर्षांचा मुलगा होता. जिजाऊसाहेबांनी अगदी आजीच्या मायेने या मुलाला आपल्यापाशी सांभाळले होते. पुढे जिंजीहून परत येताना छत्रपती राजाराम महाराज काही दिवस वसंतगडावर मुक्कामास होते. इ. स. १७००मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकला व त्याचे नाव ‘किली-द-फतेह’ असे ठेवले; पण इ. स. १७०८मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकला. गडाचे मुख्य प्रवेशद्वार इंग्रजांच्या तोफांच्या भडिमाराने भग्न झाले आहे. गडावर गणेशाची सुंदर मूर्ती आहे. गडाच्या मध्यभागी चंद्रसेन महाराजांचे मंदिर लागते. गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्रातल्या दुसऱ्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. मंदिर जुन्या बांधणीचे आहे. मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. किल्ल्यावर चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात. कोयना तळे व कृष्णा तळे अशी दोन तळी येथे आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत. गडाच्या चारही बाजूंना चार बुरुज आहेत. पुणे-कोल्हापूर हमरस्त्यावरून हा किल्ला पश्चिमेला दिसतो. किल्ल्याच्या पूर्वेस तळबीड आहे. 

सदाशिवगड

सदाशिवगड : कराड शहराच्या पूर्वेला सहा किलोमीटरवर हा किल्ला आहे. गडावर असलेल्या शिवशंभू महादेवाच्या मंदिरामुळे या गडालासुद्धा सदाशिवगड असे नाव पडले. मंदिराच्या गाभाऱ्यात शंकर व गणेश यांच्या मिश्र धातूंच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला असून, याचे क्षेत्रफळ २३ एकर एवढे आहे. वाट बांधीव पायऱ्यांची असून, सुमारे एक हजार पायऱ्या आहेत. हा किल्ला अफझलखानाच्या वधानंतर (१० नोव्हेंबर १६५९) छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. कराडवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने व कराडहून पलूस-विटाकडे जाणाऱ्या सुर्ली घाटावर नियंत्रण ठेवण्याच्या सोयीसाठी महाराजांनी याचा उपयोग केला. किल्ल्याचे क्षेत्र मोठे असले, तरी आता कोणतेही अवशेष नाहीत. येथे महादेवाचे मंदिर आहे. 

जखीणवाडी

आगाशिव लेणी :
कराडच्या नैर्ऋत्येला असलेल्या डोंगरात ही ६४ बौद्ध लेणी आहेत. त्यांना जखीणवाडीची लेणी असेही म्हणतात. ही लेणी बौद्ध भिक्खूंच्या पावसाळ्यातील मुक्कामासाठी खोदली असावीत. कराडपासून दोन किलोमीटर अंतरावर जखीणवाडी गाव आहे. ही लेणी आगाशिवजवळच्या डोंगरात असल्यामुळे या लेण्यांना ‘आगाशिवची लेणी’ असे म्हटले जाते. या परिसरात एकूण १०१ लेणी असावीत. त्यापैकी ६४ लेणी बघण्यासारखी आहेत. येथे लेण्यांचे तीन समूह आहेत. पहिल्या समूहात २६ लेणी असून, यापैकी लेणी क्रमांक ६, ७, १२ आणि १७ या चार लेण्यांत चैत्यगृहे असून, त्यामध्ये स्तूप आहेत. सहा क्रमांकाच्या लेणीच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला नक्षीकाम असलेले धम्मचक्र, तर उजव्या बाजूला एक सिंहस्तंभ आहे. बाकी २२ लेणी विहार प्रकारातील आहेत. २२व्या क्रमांकाचे लेणे सगळ्यात मोठे असून, विहार प्रकारात आहे. 

डोंगराच्या दोन रांगांमधील दरीत दुसरा लेणीसमूह असून, यास भैरवदरा लेणी (Bhairav Caves) असे संबोधले जाते. येथे १२ लेणी असून, फक्त चारच दिसून येतात. यात तीन विहार व एक चैत्य लेणे दिसून येते. पाण्याचे एक खोदलेले टाकेही दिसून येते. 

डोंगराच्या उत्तरेला तिसरा लेणीसमूह आहे. या लेणीसमूहामध्ये १४ लेण्या असून, त्यामध्ये दोन चैत्यगृहे व १२ विहार आहेत. आहेत. तिसरा लेणीसमूह पाहिल्यावर परत उलटे जाण्यापेक्षा येथूनच पाऊलवाटेने खाली उतरावे. 

प्रीतिसंगम

कराड :
कोयना नदीला ‘कऱ्हा नदी’ असे पूर्वी म्हणत. कऱ्हेच्या काठी असलेले कऱ्हाटक, त्यावरून कऱ्हाट, कऱ्हाड, कराड अशी व्युत्पत्ती झाली. कोल्हापूरप्रमाणे येथे महालक्ष्मीचे मंदिर होते. सुलतानी राजवटीमध्ये ते नष्ट झाले, असे म्हणतात. विठोबाअण्णा दप्तरदार हे संतकवी येथे होऊन गेले. तसेच संत सखुबाई यांचेही येथे घर आहे. यशवंतराव चव्हाण यांची ही कर्मभूमी. त्यांचे घर येथे आहे. राजकारणातील चारित्र्यसंपन्न व्यक्ती अशी त्यांची ओळख होती. कराडच्या प्रीतिसंगमावर त्यांची समाधी आहे. या समाधिस्थानाजवळ एक सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे. उद्यानात सर्वत्र हिरवळ, फुलझाडे, शोभेची झाडे, तसेच अनेक डेरेदार वृक्ष आहेत. त्यामुळे हा परिसर रमणीय दिसतो. या उद्यानात एका बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी घसरगुंडी, झोपाळे, तसेच अनेक नवनवीन खेळ बसविण्यात आले आहेत. या उद्यानात सर्वांना मोफत प्रवेश आहे. या समाधीचे दर्शन घेण्यासाठी स्थानिक जनतेबरोबरच पर्यटक व राजकीय नेतेमंडळींचीही वर्दळ वाढली आहे. रत्नेश्वराचे सर्वांत जुने मंदिर याच घाटावर आहे. या मंदिरावर मुस्लिम शिल्पकलेप्रमाणे चार मनोरे व हिंदू कलेप्रमाणे कळस पाहायला मिळतो. कृष्णामाईच्या देवीची यात्रा चैत्र वद्य प्रतिपदा व शेवटच्या श्रावणी सोमवारी भरते. 

यशवंतराव चव्हाण यांची समाधी

कराडचे दुसरे वैशिष्ट्य मनोरे. मनोरे म्हणजे जुनी दगडी मशीद आहे. छताजवळ बाहेरच्या चारही बाजूंना कोरीव नक्षीकाम आहे. मशिदीच्या आतमध्ये दगडी शिल्लालेखावर उर्दू भाषेत कोरलेला काही मजकूर आहे. विजापूरचा सुलतान अली आदिलशहा पहिला याचा सरदार इब्राहिमखान १५५७ सुमारास काळात याने ही मशीद उभारली. या मशिदीच्या मागे लाकडी महाव्दार असून, त्याच्या डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूंना प्रत्येकी १०६ फूट उंचीचे दोन गोलाकार मनोरे बांधण्यात आले आहेत. मनोऱ्यांच्या शिखरांवर जाण्यासाठी आतून गोलाकार दगडी जिने बांधण्यात आले आहेत. मनोऱ्यांच्या शिखरावरून कराडच्या भोवतालचा लांबवरचा परिसर दिसतो.

कराड हे चिपळूण-पंढरपूर-विजापूर मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे शैक्षणिक संस्था आहेत. वैद्यकीय, अभियांत्रिकी, कॉमर्स, व्यवस्थापन इत्यादी शिक्षणाची सोय आहे. औद्योगिक वसाहतही आहे. तसेच व्यापाराच्या दृष्टीनेही हे महत्त्वाचे ठिकाण आहे. कराड येथेही कृष्णबाईचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. कराडला लागूनच ‘मलकापूर’ नगरपंचायत अस्तित्वात आली आहे. कृष्णा मेडिकल चॅरिटेबल ही संस्था मेडिकल कॉलेज व आधुनिक पद्धतीचे उपचार यांसाठी या भागात प्रसिद्ध आहे. कराड येथे छोटा विमानतळही बांधण्यात आला आहे. तो प्रवासी वाहतुकीला उपलब्ध नाही. 

कराड, कोरेगाव, सातारा, रहिमतपूर ही ठिकाणे रेल्वे व रस्त्याने जोडलेली आहेत. राहण्याची व जेवण्याची उत्तम सोय कराड, सातारा, कोरेगाव येथे होऊ शकते. कराडसाठी जवळचा विमानतळ – कोल्हापूर - ६० किलोमीटर. साताऱ्यासाठी जवळचा विमानतळ - पुणे - १२० किलोमीटर. 

(या लेखासाठी साताऱ्याचे इतिहासप्रेमी, पर्यटनप्रेमी छायाचित्रकार नरेंद्र जाधव आणि सुनील शितोळे सरकार यांनी काही छायाचित्रे व माहिती दिली आहे.)

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 1 Days ago
It would be nice if somebody were to write similar articles about The cities in Marathawada D
0
0
पद्माकर राजोपाध्ये About 1 Days ago
फारच छान आणि उपयुक्त माहिती. पुणे कोल्हापूर रस्त्यावरून इतक्या वेळा जाऊन सुद्धा बरीच ठिकाणं माहीत नव्हती....
0
0
उदय मोहोळे About 1 Days ago
बारा मोटेची विहीर बघितली आहे.बाकी नवीन माहिती ही बरीच मिळाली.जायला हवे.
0
0

Select Language
Share Link
 
Search