Next
माझा विनोद मनुष्यस्वभावाच्या जवळ जाणारा : द. मा. मिरासदार
BOI
Friday, April 14, 2017 | 07:00 AM
15 9 0
Share this article:

प्रा. द. मा. मिरासदारज्येष्ठ विनोदी साहित्यिक प्रा. दत्ताराम मारुती मिरासदार तथा ‘दमा’ आज, १४ एप्रिल २०१७ रोजी वयाची नव्वदी पूर्ण करत आहेत. या वयातही ते अगदी दिलखुलासपणे वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतात आणि जुन्या आठवणीही सांगतात! त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांची भेट घेतली असता याचा प्रत्यय आला. या भेटीदरम्यान विवेक सबनीस यांनी ‘दमां’शी केलेली ही बातचीत...
...........................


- मिरासदार सर, तुम्ही, शंकर पाटील आणि व्यंकटेश माडगूळकरांच्या कथाकथनांनी महाराष्ट्रात एकेकाळी बहार उडवून दिली होतीत. हजारो प्रेक्षकांपुढे तुमच्या ‘व्यंकूची शिकवणी’ आणि पाटलांच्या ‘धिंड’ या कथांनी हास्याची कारंजी फुलवलीत. आज या साऱ्याकडे पाहताना किंवा एकंदरच कथाकथन या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटते? 
- कथाकथनाच्या त्रयीतला आज मी एकटाच उरलोय. मुळात कथा किंवा गोष्ट ही आबालवृद्धांना आवडणारी असते. ती रंजकपणाने व त्यासाठी लागणाऱ्या कौशल्याने सांगितली तर अधिक खुलते. आमच्या तिघांच्या कथा गाजल्या. कारण त्यात आम्ही नटासारखा अभिनयही करत असू. आमच्या गोष्टी विनोदी होत्या; पण गंभीर गोष्ट सांगण्यासाठीही नटासारखी ताकद लागतेच. 

- आपण कथा सांगावी असे तुम्हाला कधी वाटले? तुमचा पहिला जाहीर कार्यक्रम कधी आणि कुठे झाला होता? 
- शाळेत असताना मला वाचनाची आवड होती, त्यातूनच कथा सांगण्याची कला हळूहळू अवगत झाली. कथाकथनातून दुसऱ्याशी संवाद साधता येतो हे बालवयातच मला उमगले. मी तेव्हा दुसऱ्यांच्या गोष्टी सांगत असे. लेखक म्हणून माझा पहिला जाहीर कार्यक्रम नागपुरात १९६२मध्ये झाला. होळीपौर्णिमेनिमित्त सरकारी सुट्टी असल्याने काही निवडक नागपूरकरांच्या समोर मी ‘माझी पहिली चोरी’ ही कथा ऐकवली. तेव्हा माझ्याबरोबर माडगूळकर आणि पाटीलही होते. त्यानंतर मात्र माझा आत्मविश्वास वाढला! 

- तुमचं मूळ गाव पंढरपूर. अवघ्या महाराष्ट्राचे तीर्थक्षेत्र असणाऱ्या या ठिकाणी सर्व भागांतील लोक येत असतील व त्यांचे कार्यक्रमही होत असतील. त्याचा बालपणी व तरुणपणी तुमचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी कसा परिणाम झाला? 
- पंढरपूरचे माझ्या व्यक्तिमत्त्वावर बरेच संस्कार झालेत, हे खरं. चातुर्मासात तिथे अनेक कथेकरी येत, तिथल्या मठात कार्यक्रम होत, पोथीचे सलग चार महिने वाचन होत असे. ते ऐकायला मी जात असे. त्या काळात एक महाराज धार्मिक गोष्टी खूप रंगवून सांगत. गीतेवरील भाष्यही रंजकपणे सांगत.  पंढरपूरच्या शाळेत शिकत असताना काणे नावाचे शिक्षक वर्गात शिकवताना विनोद व गमतीजमती आणि गोष्टी सांगत. त्यांचे ते शिकवणे रंजक होत असे. कडू गोळी साखरेच्या वेष्टणातून दिल्यासारखे ते वाटे! एरव्ही नुसता उपदेश कोण ऐकून घेणार? हे सारेच माझ्या मनावर ठसले गेले आणि पुढे कथाकथनकार म्हणून मला त्याचा उपयोगही झाला. 

- तुम्हाला कोणाचे कथाकथन आवडते? आजही नवी कथा, नाटक वा कादंबरी लिहावीशी वाटते का? 
- सांगणारे लोक पुष्कळ आहेत; पण गदिमा गंभीर गोष्टही छान सांगत! गोष्ट साभिनय सांगण्याची कला त्यांना अवगत होती. माझ्याबाबत सांगायचे, तर मी कथा जास्त लिहिल्यात, त्या मानाने नाटके व कादंबऱ्या कमी लिहिल्यात. आता इच्छा असून लिहिण्याची ताकद राहिली नाही. आजही डोक्यात नवी कादंबरी वा नाटकाचे विषय घोळत असतात; पण लिहिण्याची उमेद कमी पडते. 

- तुमच्या विनोदाची जातकुळी नेमकी कोणती आहे, असे वाटते? तुम्हाला तुमची कोणती कथा जास्त आवडते?
- मला ते नेमक्या शब्दांत सांगता येणार नाही; पण ‘पुलं’चा विनोद शाब्दिक वा कोटीप्रचुर असेल तर माझा चिं. वि. जोशींच्या विनोदाकडे जाणारा आहे. तो विनोद मनुष्यस्वभावाच्या जवळ जाणारा आहे. ‘चिंवि’चा विनोद मला मुळात फार आवडतो. त्या अर्थाने माझा विनोद हा प्रसंगनिष्ठ आहे. प्रसंगनिष्ठ विनोदाचे इतर भाषांमध्येही भाषांतर करता येऊ शकते. ‘पुलं’चा विनोद शाब्दिक असून कितीही चांगला असला, तरी तो मराठीपुरताच आहे. मला माझ्या सर्वच कथा आवडतात, तरीही ‘व्यंकूची शिकवणी’ ही विनोदी, तर ‘कोणे एके काळी’ ही माझी गंभीर कथाही मला आवडते. इतर लेखकांमध्ये मला पु. भा. भावे, व्यंकटेश माडगूळकर, गंगाधर गाडगीळ आणि दि. बा. मोकाशी यांच्याही कथा आवडतात. 

- सर, तुम्ही आत्मचरित्र लिहिता आहात का? 
- इतर लेखनप्रकारांप्रमाणे याबाबतही वेगळे काही नाही. आत्मचरित्र लिहायला घेतले आणि पहिली २५ ते ५० पाने लिहूनही काढली; पण तेवढ्यापुरतेच! माझ्यात आता पुढे लिहिण्याची ताकद नाही. तसंच लेखनिक ठेवून लिहून घेणारा मी लेखक नाही. त्याची मला सवयही नाही. पंढरपुरातील माझ्या बालपणीच्या काही दिवसांबद्दल मी लिहून ठेवले आहे आणि ते लिखाण तेवढ्यावरच थांबले आहे.  

- मराठी भाषेला चांगले दिवस नाहीत अशी सध्या जी ओरड केली जाते, ती खरी आहे का? तसेच मराठीला अभिजित भाषेचा दर्जा मिळाला, तर त्याचा फायदा होईल असे वाटते का? 
- मराठी भाषेबद्दल मी पूर्ण सकारात्मक आहे. ही भाषा मुमुर्षू किंवा मरणपंथाला लागलेली भाषा नक्कीच नाही. पूर्वी इतिहासाचार्य राजवाडे यांनी मराठीच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली होती; पण मला तसे बिलकूल वाटत नाही. आजची पिढी मराठीकडे दुर्लक्ष करत असली, तरी पुढे तिला मातृभाषेकडे येण्याशिवाय पर्याय नाही. सोशल मीडियावर मराठीचा वापर होतो असे सांगतात; पण मला त्यातले काही कळत नाही. अभिजात भाषेचा केवळ दर्जा न मिळता सरकारने त्यासाठी पुरेसे अनुदान दिले तर त्याचा मराठी भाषावृद्धीसाठी उपयोग करता येईल. शिवाय मराठी ही मुळात एक समृद्ध भाषा आहेच! 

- तुमचा जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाधानी आहे. आज मागे वळून पाहताना तुम्हाला नेमके काय वाटते? 
- समाधानी व तृप्त असणे हा माझा स्थायीभाव आहे खरा; पण आपल्याला जे काही मिळाले त्याबाबत आपली योग्यता होती का हा प्रश्नही माझ्या मनात नेहमी येतो. जगाने माझा मोठेपणा मान्य केला असला तरी मला माझ्या मर्यादांची पूर्ण जाणीव आहे! माझा माझ्या स्वत:बद्दल बिलकुल कोणताही गैरसमज नाही. मी साहित्यात जे काही केलं त्याबद्दल समाधानी आहेच; पण करण्यासारखे असतानाही पुष्कळ राहून गेले आणि ती ताकद वा उमेद असती तर नक्कीच आणखी काही केले असते, असे वाटते.
 
- सर, नव्वदीपूर्तीनिमित्त व पुढील आयुष्य आरोग्संपन्न जाण्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! 
- मी आपला ऋणी आहे.
...........................

अंगतपंगत, खडे आणि ओरखडे, गप्पांगण, गप्पागोष्टी, गंमतगोष्टी, गाणारा मुलुख, गुदगुल्या, गोष्टीच गोष्टी, चकाट्या, चुटक्यांच्या गोष्टी, जावईबापूंच्या गोष्टी, ताजवा, नावेतील तीन प्रवासी, फुकट, बेंडबाजा, भुताचा जन्म, भोकरवाडीच्या गोष्टी, भोकरवाडीतील रसवंतीगृह, माकडमेवा, माझ्या बापाची पेंड, मिरासदारी, मी लाडाची मैना तुमची, सरमिसळ, हसणावळ,  हुबेहूब, स्पर्श, सुट्टी आणि इतर पाच एकांकिका, विरंगुळा
 
15 9 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search