Next
‘माझी मेट्रो देशातील सर्वाधिक ‘ग्रीन मेट्रो’ ठरेल’
नागपूरच्या मेट्रोचे नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन
प्रेस रिलीज
Monday, March 11, 2019 | 12:50 PM
15 0 0
Share this storyनागपूर : ‘मेट्रो रेल्वेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून, वाहनांचा वापर कमी झाल्याने प्रदूषण कमी होणार आहे. अधिकाधिक सौरऊर्जा प्राप्त करून देशातील अनेक मेट्रो रेल्वेंच्या तुलनेत नागपूर मेट्रो ही अधिक ‘ग्रीन मेट्रो’ अर्थात पर्यावरणपूरक मेट्रो ठरेल,’ असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

वर्धा रोड येथील एअरपोर्ट साउथ मेट्रो रेल्वे स्टेशन येथे नागपूरच्या माझी मेट्रोच्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले. मोदी यांनी व्हिडिओलिंकद्वारे कळ दाबून माझी मेट्रोचे उद्घाटन केले; तसेच खापरी ते सिताबर्डी या प्रवासासाठी हिरवी झेंडी दाखविली. या प्रसंगी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भाषण करून मेट्रोच्या उद्घाटनानिमित्त नागपूरकरांना भरभरून शुभेच्छा दिल्या.  या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, महापौर नंदा जिचकार, खासदार कृपाल तुमाने, डॉ. विकास महात्मे, आमदार प्रा. अनिल सोले, सुधाकर देशमुख, सुधाकर कोहळे, समीर मेघे, डॉ. मिलिंद माने, प्रा. जोगेंद्र कवाडे, केंद्रीय नगरविकास विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्र, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते. या प्रसंगी माझी मेट्रोच्या उभारणी संदर्भातील कॉफी टेबल बुकचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी ‘माझी मेट्रो, ट्रान्सफॉर्मिंग नागपूर– ए ड्रीम कमिंग ट्रू’ या प्रदर्शनीचे उद्घाटनही झाले.  मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करून सर्वांची मने जिंकली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलताना ते म्हणाले, ‘नागपूर हे जगातील वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये समाविष्ट झाले आहे. माझी मेट्रोच्या रूपाने नागपूरकरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. देशातील मेट्रो असलेल्या शहरांमध्ये आता नागपूरचाही समावेश होत आहे. माझी मेट्रोचे काम अतिशय वेगात व दर्जेदारपणे पूर्ण झाले आहे. मेट्रो रेल्वेसंदर्भात निश्चित धोरण ठरविण्यात आले असून, मेट्रोचे नेटवर्क मागील चार वर्षांत ६५० किमीने वाढले आहे. देशाच्या इतर भागात ८०० किमी मेट्रो रेल्वेची कामे सुरू आहेत. माझी मेट्रोच्या रूपाने मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीस चालना मिळाली असून, यापुढेही जसजसा मेट्रोचा विस्तार होत जाईल तसतशी येथील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.’

‘मेट्रोच्या विस्तारामुळे शहराचा चेहरा-मोहराच बदलणार आहे. याबरोबरच आता ‘वन नेशन वन कार्ड’ ही संकल्पना साकारण्यात येत असून, या एका कार्ड अंतर्गत विविध परिवहन व्यवस्थेचा प्रवाशांना लाभ घेता येणार आहे. डिजिटल भारत अशी देशाची नवी ओळख तयार होत असून, देशातील युवक विविध क्षेत्रांत नाविन्यपूर्ण प्रयोग करून पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहेत,’ असे मोदी यांनी सांगितले.फडणवीस म्हणाले, ‘माझी मेट्रोचे उद्घाटन हा नागपूकरांसाठी ऐतिहासिक व आनंदाचा क्षण आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक विकसित व बळकट झाल्यास शहराच्या विकासाला हातभार लागतो. माझी मेट्रोमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार असून, वाहनांची संख्या कमी झाल्यामुळे प्रदूषणाला आळा बसणार आहे. चांगल्या आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे माझी मेट्रो हे प्रतिक ठरणार आहे. पर्यावरणपूरक असणाऱ्या या मेट्रोमुळे ऊर्जेची बचत होईलच याबरोबरच कार्बन उत्सर्जनाला आळा बसणार आहे. माझी मेट्रोसाठी ६५ टक्के ऊर्जा ही सौरऊर्जेतून प्राप्त होणार आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे.’‘परिवहनपूरक विकास ही संकल्पना आता महत्त्वाची ठरणार आहे. माझी मेट्रो ही अन्य परिवहन व्यवस्थेला जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांचा प्रवासामध्ये खर्च होणारा वेळ व शक्ती वाचणार आहे. मेट्रोच्या परिसरात विविध विकासात्मक कामेही हाती घेण्यात येणार आहेत. माझी मेट्रोची स्टेशन्स ही परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरणार आहे. यातून सेवाक्षेत्राद्वारे मोठ्या रोजगार संधी निर्माण होणार आहेत. माझी मेट्रो हा नागपूरचा नवा चेहरा, नवी ओळख ठरणार आहे. नागपूर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे कामही लवकरच सुरू होत आहे,’ असे फडणवीस यांनी सांगितले.  गडकरी म्हणाले, ‘अतिशय कमी वेळेत व दर्जेदार स्वरूपाचे काम माझी मेट्रोच्या रूपाने नागपूरकरांच्या समोर येत आहे. माझी मेट्रो ही अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. माझी मेट्रो सौरऊर्जा संपन्न तसेच स्टेशन्सची वैशिष्ट्यपूर्ण उभारणी यांमुळे आगळी-वेगळी ठरणार आहे. शहरातील विविध बाजार परिसरांचा, तसेच अन्य ठिकाणांचाही मेट्रोद्वारे विकास करण्यात येणार असल्याने शहराच्या विकासासाठी हे लाभदायकच ठरणार आहे. ब्रॉडगेज मेट्रोच्या रूपाने मेट्रोचा विस्तार करण्यात येणार असून, ग्रामीण भागापर्यंत मेट्रो यापुढील काळात पोहोचेल. माझी मेट्रोमुळे नागपूरच्या पर्यटन विकासाला तसेच रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे. इलेक्ट्रिक, इथेनॉल व ‘सीएनजी’वर चालणाऱ्या बसेस यांसारख्या माध्यमातूनही शहरी परिवहनाच्या संकल्पना बदलत आहेत.’

नगरविकास विभागाचे सचिव मिश्र म्हणाले, ‘नागपूरच्या माझी मेट्रोच्या रूपाने देशातील १८वी मेट्रो साकारली जात आहे. या मेट्रो व्यवस्थेमुळे शहरातील परिवहन व्यवस्थेला गती मिळणार असून माझी मेट्रो सर्वांना परवडणारी ठरेल. माझी मेट्रो ही नागपूरची नवी ओळख ठरणार आहे.’

माझी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक दीक्षित म्हणाले, ‘माझी मेट्रोच्या रूपाने नागपूरकरांचे स्वप्न पूर्ण होत असून, अनेक अर्थांनी ही मेट्रो वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. सौर ऊर्जेने परिपूर्ण असलेल्या या मेट्रोमुळे शहरी परिवहनाच्या संकल्पना बदलणार आहेत.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link