Next
पं. बिरजू महाराज यांना ‘लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार’ प्रदान
BOI
Monday, May 20, 2019 | 12:17 PM
15 0 0
Share this article:

 आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने कथकसम्राट पं. बिरजू महाराज यांना ‘लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार’ प्रदान करताना गुरुदेव शंकर अभ्यंकर, पं. मनीषा साठे, पं. शाश्वती सेन, अपर्णा अभ्यंकर.

पुणे : पुण्यातील आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने कथकसम्राट पं. बिरजू महाराज यांना ‘लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. गुरुदेव शंकर अभ्यंकर यांनी पं. बिरजू महाराज यांना पुरस्कार प्रदान केला. या वेळी महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पं. मनीषा साठे, पं. शाश्वती सेन, आदित्य प्रतिष्ठानच्या विश्वस्त अपर्णा अभ्यंकर उपस्थित होत्या.

सन्मानपत्र, सरस्वती चिन्ह, सव्वा लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान कथकसम्राट पं. बिरजू महाराज यांनी भावमुद्रा सादर केल्या. आपल्या हृदयापासून दैनंदिन आयुष्यामधील कार्यातील ताल कसा असतो, याची त्यांनी प्रचिती दिली. श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित भावमुद्रांच्या सादरीकरणामुळे उपस्थितांना अद्वैताचा अनुभव मिळाला. 

आदित्य प्रतिष्ठानचा यंदा ३६ वा वर्धापनदिन आहे. दर वर्षी प्रतिष्ठानच्यावतीने संस्कृतीची अष्टांगे समृद्ध करणाऱ्या व्यक्तींचा ‘लक्ष्मी-वासुदेव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते.  

या वेळी बोलताना पंडीत बिरजू महाराज म्हणाले, ‘व्यक्तींच्या गुणांची पुजा होत असते, व्यक्तींची नाही. त्या गुणांचा अभ्यास, त्याविषयी प्रेम, आत्मीयता आणि विश्वास नसता, तर मी केवळ बिरजू राहिलो असतो, महाराज झालो नसतो. जीवनात मला सर्व वडीलधाऱ्यांचा नेहमीच आशीर्वाद मिळत राहिला आहे. माझ्या आयुष्यात बंगाल माझी माता, तर महाराष्ट्र माझा पिता आहे. महाराष्ट्रात संगीतावर आणि कलेवर प्रेम करणारे रसिक भरपूर आहेत. पुणेकरांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले. आपल्यासारखे कलाप्रेमी रसिक सदैव कलेच्या पाठीशी राहू द्या. आपल्यासारख्या रसिकांमुळेच परंपरेची जपणूक होत आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत घुंगरांना आणि घुंगरू नादाला कधीही विसरणार नाही.’ 

बाबासाहेब पुरंदरे म्हणाले, ‘मला आयुष्यात अनेक कलावंतांचा सहवास लाभला. त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी आजही ताज्या आहेत. अशा शास्त्रीय नृत्य कलाकारांचा सत्कार करायला मिळणे म्हणजे भाग्य आहे. 

विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर म्हणाले, ‘बिरजू महाराज जेंव्हा रंगमंचावर येतात, तेंव्हा ते श्रीकृष्णाशी एकरूप होतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे नृत्य, संगीत आणि नाट्याचा त्रिवेणी संगम आहे. भारतीय परंपरेत नृत्याला मोठे स्थान आहे. रस, भाव आणि व्यंजकांमुळे नृत्य साध्य होते. कथ्थकमधून सर्व रस प्रकट होतात. प्रत्येक कला ही आकाशाएवढी महान असून, तिला सीमा नाही.’ 

पुरस्कार समारंभानंतर पं. मनीषाताई साठे व त्यांच्या शिष्या आणि ‘शांभवीज् इंटरनॅशनल स्कूल ऑफ कथक’च्या विद्यार्थिनींनी ‘कथक नृत्यसंध्या’ हा विशेष कार्यक्रम सादर केला.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते योगाचार्य बाबासाहेब कोल्हटकर लिखित ‘पातंजल योगदर्शन’ या ग्रंथाचे प्रकाशन, तर पं. बिरजू महाराज यांच्या हस्ते पं. संजीव अभ्यंकर यांनी गायनाच्या सीडीचे प्रकाशन करण्यात आले.

आदित्य प्रतिष्ठानचे कार्य वाढावे यासाठी असंख्य कार्यकर्ते अखंडपणे कार्यरत असतात. दोन वर्षातून एकदा अशा कार्यकर्त्यांपैकी एकाला श्रध्दाश्री पुरस्काराने गौरविण्यात येते. या वेळी श्रध्दाश्री पुरस्कार दादर केंद्राचे कार्यकर्ते श्रीराम मत्ते यांना प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर विशाखा व निरंजन बिळगी दांपत्य, कामधेनू सेवा प्रतिष्ठानचे समीर देवधर, सनदी लेखापाल किशोर करंदीकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

भारतीय संतांचे विचार आणि अध्यात्म समाजापर्यंत योग्य स्वरूपात पोहोचवण्याचं महत्त्वाचं आणि सात्विक कार्य ‘आदित्य प्रतिष्ठान’ ही संस्था गेली ३५ वर्षे करीत आहे. ‘आदित्य प्रतिष्ठान’तर्फे लोणावळ्याजवळ तेहतीस एकर जागेत जगातील पहिले संत विद्यापीठ साकारले जात आहे. देशातील प्रत्येक प्रांतातील संत साहित्याचे येथे जतन केले जाणार आहे.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search