Next
संगीत नाटक आणि नाट्यसंगीत
BOI
Tuesday, March 12, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


संगीत नाटक आणि नाट्यसंगीत हा एकूणच संगीत रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि मराठी रंगभूमीचं एकमेवाद्वितीय असं वैशिष्ट्य. या नाट्यसंगीतात अशी काय जादू आहे, जिच्यामुळे शंभर वर्षांनंतरही त्याची मोहिनी कायम आहे, याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न... ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत संगीत नाटक आणि नाट्यसंगीताबद्दल...
...............
या लेखातून संगीत नाटकाचा इतिहास सांगण्याचा माझा उद्देश मुळीच नाही. तो तुम्ही अनेक वेळा वाचला असेल, ऐकला असेल. आत्ता ऐंशीच्या घरात असलेल्या ज्येष्ठ रसिकांनी याचा मनसोक्त आस्वाद घेतला. चाळीस-पन्नाशीत असलेल्या रसिकांनी, अगदी संगीत नाटकं नाही, पण नाट्यसंगीत मनसोक्त ऐकलेलं आहे, तरुण पिढीला मात्र ते जास्त अनुभवता आलं नाही. असं असलं, तरी गेल्या पाच एक वर्षांत राहुल देशपांडे, महेश काळे यांच्या ‘कट्यार काळजात घुसली’मुळे (नाटक व सिनेमा दोन्हीं) आणि सुबोध भावेच्या ‘बालगंधर्व’ सिनेमामुळे, शालेय विद्यार्थी, कॉलेजकुमार आणि ‘आयटी’वाली तरुण पिढी यांच्यात संगीत नाटक आणि नाट्यसंगीत यांबद्दल नक्कीच कुतूहल निर्माण झालं आहे. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे असं वाटतं. 

राहुल देशपांडे‘नाट्यसंगीत’ या शब्दातच त्याचं वैशिष्ट्य लपलेलं आहे. नाटकातलं संगीत हा त्याचा साधा अर्थ. नाटकात संगीत वापरावं असं का बरं वाटलं असेल? याचा विचार केला, तर त्याचं उत्तर त्या वेळच्या समाजजीवनात आणि सांस्कृतिक वातावरणात दडलेलं दिसून येतं, असं मला वाटतं. भारतात संगीत हे तर पुरातन काळापासून होतं. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस, जेव्हा संगीत नाटकाचा जन्म झाला, तेव्हा संगीताला राजाश्रय होता. प्रचलित असलेलं ‘ख्याल संगीत’ हे फक्त मर्यादित लोकांसाठी होतं. निरनिराळ्या संस्थानांतील महाराजांच्या पदरी असलेले दरबार गायक त्यांची कला फक्त दरबारात सादर करत. सर्वसामान्य रसिकांना तिथे प्रवेश नव्हता. कोठीवर गाणाऱ्या कलावंतिणीकडे उच्च दर्जाचं उपशास्त्रीय संगीत होतं; पण तिथेही सर्वांना जाणं शिष्टसंमत नव्हतं. मंदिरातून होणाऱ्या उत्सवांमधून भजन-कीर्तनांचा आस्वाद रसिक घेत होते. आकाशवाणी (रेडिओ) नव्हती. टीव्ही, कॅसेट्स, सीडी वगैरे करमणुकीच्या साधनांचा तर पत्ताच नव्हता. अशा वेळी आद्य नाटककार विष्णुदास भावे यांच्या मनात हा विचार आला असेल. 

तसंही संगीत हे मानवी मनाला आकर्षित करणारं, मनातील भावना व्यक्त करणारं, मनाला रिझवणारं होतं.. आहे.. आणि पुढेही राहील यात शंकाच नाही. त्यामुळे नाटकात संगीत वापरण्याचा प्रयोग करून पाहण्यात आला असावा. तो यशस्वीही झाला. त्यानंतर विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या तीस-पस्तीस वर्षांत, या नाट्यसंगीतानं सुवर्णकाळ घडवला. संगीत नाटक आणि नाट्यसंगीत लोकप्रिय होण्याचं मुख्य कारण हे या परिस्थितीत आहे, हे लक्षात आलंच असेल. 

या संगीत नाटकांतील गाणी... त्यांना ‘नाट्यपदं’ किंवा ‘नाट्यगीतं’ असं म्हटलं जातं... ती त्या प्रसंगाला शोभतील अशी होती. त्यामुळे नाटकाच्या कथाप्रवासात अडथळा न येता, तो प्रसंग अधिक परिणामकारक करणारी होती. रंजकता हा त्यांचा मोठा गुण होता. रसिकांची संगीतश्रवणाची भूक या नाट्यसंगीतानं भागवली. असं काय खास होतं या नाट्यपदांमध्ये? ही सर्व गाणी शास्त्रीय संगीतातील विविध रागांवर आधारित होती; पण त्यातील शास्त्राला भावभावनांची जोड होती. शब्द, चाल, भावना, नाट्यप्रसंग या सर्वांचा मेळ साधला होता. ‘संगीत सौभद्र’मधील कृष्ण-रुक्मिणीच्या प्रवेशातील पद याचा उत्तम नमुना होता. रुक्मिणीच्या महाली जाण्यापूर्वी कृष्ण म्हणतो... 

म्हणूनी धरुनी बैसेल रुष्टतेला। 
करीन जेव्हा मी बहुत आर्जवाला। 
पात्र होईन मग मधुर सुहास्याला।।

प्रत्यक्ष महालात गेल्यावर रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी कृष्ण म्हणतो...
मजवरी धरी अनुकंपा।
रागाने तव तनू ही पावत कशी कंपा।
नच सुंदरी करू कोपा।
नारी मज बहु असती। 
परि प्रीती तुजवरती। 
जाणसि हे तूं चित्ती। 
मग का ही अशी रीती।
प्रेमा तो मजवरीचा नेऊ नको लोपा। 
नच सुंदरी करू कोपा। 
यानंतर ‘तू मला कशी गोड शिक्षा देऊ शकतेस’, याचंही खट्याळ वर्णन या गीतात आहे. सगळे समज-गैरसमज दूर झाल्यावर, तुझ्याशी बोलताना रात्र कशी सरली कळलंच नाही, असं म्हणून येतं ते लोकप्रिय पद... प्रिये पाहा.. रात्रीचा समय सरुनी येत उष:काल हा। प्रभात समयाचं अतिशय सुंदर वर्णन या नाट्यगीतात आहे. आमच्या नंतरच्या पिढीला ‘एक दूजे के लिये’मधील, नाही तर ‘टायटॅनिक’मधील नायक-नायिकेची पोज आवडते; मात्र या गाण्याच्या वेळची, कृष्ण-रुक्मिणीची पोज आम्हाला अजूनही आठवते. शृंगार रसाचं संयमित दर्शन, पत्नीचा लटका रुसवा, पतीने केलेली तिची मनधरणी, हे सगळं नाट्यपदांतून आणि अभिनयातून घडवणारा हा ‘सौभद्र’मधला प्रसंग अजूनही रसिक प्रेक्षकांची दाद मिळवतो.

‘संगीत मानापमान’मधला ‘धैर्यधर’ म्हणजे जातिवंत शौर्याचं प्रतीक. त्यांच्या भूमिकेला साजेशी एकाहून एक तडफदार पदं, तर नायिका ‘भामिनी’ची, श्रीमंतीचा तोरा दाखवण्यापासून, ते लक्ष्मीपेक्षा शौर्याचं महत्त्व पटल्यावर धैर्यधरावर भाळलेली नायिका दाखवणारी सर्व पदं उत्तम नाट्यगीतांचा आदर्शच होती. ‘धनी मी, पती वरीन कशी अधना’, म्हणणारी भामिनी, ‘मी अधना, न शिवे भीती मना’, म्हणू लागली, अन् धैर्यधराच्या पराक्रमावर भाळल्यावर, खरा तो प्रेमा, ना धरी लोभ मनी, असा साक्षात्कार तिला झाला. स्वप्नातही नायकाचा असभ्यपणा न आवडणारी भामिनी, विनयहीन वदता नाथा, नाही मी बोलत, म्हणत लटका राग व्यक्त करू लागली अन् भडकपणे गुंफलेली कलाबूत लावलेली फुलांची माला पाहून, ‘दूती नसे ही माला, सवतची भासे मला। नच एकांती सोडी नाथा, भेटू न दे ह्रदयाला अशी ती सवत वाटू लागली’, अशी विविधरंगी भावनांनी नटलेली भामिनीची पदं अजरामर झाली. 

अशीच संगीत स्वयंवरातील कृष्णाच्या पराक्रमावर मोहित झालेली रुक्मिणी. आपली मर्यादा न सोडता, कृष्णावरचं प्रेम व्यक्त करणारी, शालीन कुलीन राजकन्या तिच्यामध्ये दिसते. कृष्णाच्या दर्शनानं ‘मम आत्मा गमला’, अशी अवस्था झालेली, तर त्याच्या पराक्रमाने मोहित होऊन, नाथ हा माझा मोही खला, म्हणणारी, त्याच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून कुठेही राहायला तयार असलेली, ‘करीन यदुमनी सदना’, म्हणणारी रुक्मिणी. तिच्या सर्व नाट्यपदांमध्ये तिची ही विविध रूपं प्रकट होतात, तर कृष्णही तितकाच तोलामोलाचा रंगवलाय.

या सर्व नाट्यपदांच्या चाली ऐकाल, तर एकसे बढकर एक अशा सुंदर. भूप, बिहाग, भीमपलास, यमन अशा सुंदर राग रागिण्यांचा भरजरी शेला ल्यालेल्या. त्या त्या रागांचा कशिदा काढून विणलेल्या पैठण्याच जणू! भूमिका करणाऱ्या गायक गायिकांचा कस लागेल अशा कठीण, तर ऐकणाऱ्या रसिकांवर आजन्म मोहिनी घालतील अशा मोहक आणि भारदस्त. या नाट्यपदांमधून अशी सकस घरंदाज रागदारी ऐकून ऐकून, रसिकांची मनं तर तृप्त झालीच, पण मनोरंजनाबरोबरच कळत-नकळत त्यांच्यावर अभिजात शास्त्रीय संगीताचे संस्कार झाले. त्यांची त्या त्या रागांशी ओळख झाली, दोस्तीही झाली. एक एक नाट्यपदावरून त्या त्या रागाची ओळख रसिकांच्या मनात ठसली, कायम झाली आणि म्हणूनच शंभर वर्षं होऊन गेली, तरी या पदांची मोहिनी पिढ्यान्-पिढ्या तशीच कायम राहिली.

त्याचप्रमाणे निरनिराळ्या नाटकांमधून, त्या काळचे सामाजिक विषयही हाताळले गेले. करमणुकीबरोबर सामाजिक हिताचे संदेशही दिले गेले. त्यामुळे रसिकांना ते आपलेसे वाटले. त्यांतील नायक-नायिकांच्या सुख-दु:खाशी ते समरस झाले. अनेक दिग्गज गायक-गायिकांनी संगीत नाटकात भूमिका करून, ही नाट्यपदं लोकप्रिय करण्याचं फार मोठं काम केलं. नंतरच्या काळात (साधारणपणे १९३० ते १९६०) नाट्यमयता बाजूला ठेवून, संगीताचा अतिरेक होऊ लागल्यावर काही काळ संगीत नाटकांचं वेड थोडं कमी झालं खरं; पण नव्या धाटणीच्या संगीताने नटलेली नाटकं आली आणि पुन्हा एकदा संगीत रंगभूमीला संजीवनी मिळाली. आता एकविसाव्या शतकात संगीत नाटकाचं स्वरूप कसं असावं, याबद्दल पुढच्या लेखात पाहू या...

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(डॉ. रवींद्र घांगुर्डे आणि वंदना घांगुर्डे या संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार दाम्पत्याची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search