Next
पंतप्रधान मोदी झळकणार ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’मध्ये
बेअर ग्रिल्ससोबत मोदी यांची जंगल सफर
BOI
Monday, July 29, 2019 | 05:00 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक वेगळे रूप आता डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ कार्यक्रमाद्वारे पहायला मिळणार आहे. ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या कार्यक्रमाचा सुत्रसंचालक बेअर ग्रिल्स याच्यासोबत ते जंगलात साहसी सफर करताना दिसणार आहेत. १२ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता डिस्कव्हरी वाहिनीवर हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्यात मोदी यांनी बेअर ग्रिल्ससोबत ही धाडसी सफर केली आहे. बेअर ग्रिल्स याने ट्विटवर एक टिझर पोस्ट करुन ही माहिती दिली आहे. 

‘जगभरातील १८० देशांच्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या आधी कधीही न पाहिलेली बाजू पहायला मिळेल. प्राण्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी; तसेच वातावरणातील बदलाकडे लक्ष्य वेधण्यासाठी मोदी भारतामधील जंगलांमधून फिरताना दिसतील. डिस्कव्हरी इंडियावर १२ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे मॅन व्हर्सेस वाइल्ड नक्की पाहा,’ असे बेअर ग्रिल्स याने म्हटले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या प्रभावी नेत्यासमवेत हा कार्यक्रम करायला मिळणे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे,’ असेही ग्रिल्सने म्हटले आहे. 

 

डिस्कव्हरी वाहिनीनेही या कार्यक्रमाची माहिती देणारा एक व्हिडिओ प्रसारित केला असून, यात पंतप्रधान मोदी बेअर ग्रिल्सचे स्वागत करताना दिसत आहेत. नंतर हे दोघे जंगलामधून, बोटीमधून प्रवास करताना दिसत आहेत. एका दृष्यात मोदी यांना थंडी वाजू नये म्हणून बेअर ग्रिल्स कोट देतानाही दिसत आहे. हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने ‘फन राइड’ असेल असेही या व्हिडिओत म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाबाबत बोलताना म्हणाले, ‘मी अनेक वर्षे जंगल, पर्वतांच्या सान्निध्यात राहिलो आहे. त्यांचा माझ्या आयुष्यावर मोठा प्रभाव आहे. त्यामुळे जेव्हा मला राजकीय आयुष्यापेक्षा वेगळ्या अशा या कार्यक्रमात सहभागी होण्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा मी तत्काळ होकार दिला. या कार्यक्रमाद्वारे भारतातील नैसर्गिक संपन्नतेचे दर्शन जगाला घडवता येणार आहे. निसर्ग संवर्धनाचे महत्त्व आणि निसर्गाशी तादात्म्य राखून आयुष्य सुखकर करण्याचा मार्गही यातून दिसेल. दीर्घ कालावधीनंतर बेअर ग्रिल्ससारख्या धाडसी, निसर्गप्रेमी व्यक्तीबरोबर जंगलात वेळ घालवण्याचा मिळालेला हा अनुभव अत्यंत आनंददायी होता.’ 

या कार्यक्रमाचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.- https://twitter.com/i/status/1155714307872579585
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search