पुणे : ‘डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी देशाच्या विकासाला दिशा दिली. सर्व समाजाला एकसंध ठेवत समतेची वागणूक देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. आजच्या घडीलाही बाबासाहेबांचे विचार देशाच्या प्रगतीला पूरक आहेत’, असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६२ व्या स्मृतिदिनानिमित्त (महापरिनिर्वाण दिन) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील आंबडेकर पुतळा येथे आयोजित अभिवादन सभेत बाळासाहेब जानराव बोलत होते.
या वेळी पश्चिम महाराष्ट्र आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, राष्ट्रीय निमंत्रक अॅड. मंदार जोशी, कामगार आघाडीचे महेश शिंदे, पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, शहर संपर्क प्रमुख अशोक शिरोळे, नीलेश आल्हाट, विठ्ठल गायकवाड, शाम गायकवाड, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे, शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे, दादा वारभुवन, चित्रा जानुगडे, प्रियदर्शिनी निकाळजे, शिल्पा भोसले, किरण भालेराव, गुणवंत लोखंडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
बाळासाहेब जानराव म्हणाले, ‘बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा, लेखणीचा उपयोग समाज आणि देशाच्या हितासाठी केला. त्यांनी केलेले कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. समाजातील भेदभाव विसरुन त्यांनी दिलेल्या विचारांवर आपण सर्वानी चालणे हेच त्यांना अभिवादन असेल.’
परशुराम वाडेकर म्हणाले, ‘बाबासाहेब आपल्यातून लवकर गेल्याने देशाची प्रगती मंदावली. आणखी काही वर्षे बाबासाहेब जगले असते, तर कदाचित आजची परिस्थिती वेगळी असली असती.’
महेश शिंदे, अॅड. मंदार जोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.