Next
कर्मण्येवाधिकारस्ते!
BOI
Friday, May 11 | 06:45 AM
15 0 0
Share this story


‘ईशान्य भारतातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी शक्य ती मदत करण्याची माझी इच्छा होती आणि ती मी करत आलो; मात्र कालांतराने त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळणे कमी होऊ लागले. त्यामुळेच, ‘त्यांना मदत करावीशी वाटते, तर करा; पण ते स्वीकारतील याची खात्री नाही,’ हे अविनाश बिनीवाले यांचे वाक्य मला आठवले आणि पटलेही...’ वाचा....‘ईशान्यवाटेचा वारकरी’ या लेखमालेत...
..............
मी सुरुवातीला पुण्यातून चार सौर कंदील घेऊन गेलो होतो. त्यापैकी एक विश्व हिंदू परिषदेच्या ऑफिसमध्ये, एक मुलांच्या छात्रावासात आणि दोन मुलींच्या छात्रावासामध्ये दिले होते. ऑफीसमधला कंदील तेथील कार्यवाह यांनी आपल्या घरी नेला. सहा महिन्यांनी मी जेव्हा परत गेलो, तेव्हा सर्व कंदील तुटलेले होते. त्यांना विचारलं, की असे कसे तुटले हे कंदील? तर उत्तर, ‘मालूम नहीं।’ ते सर्व जोडून ठीक करून दिले. पुन्हा परत आल्यावर पाहिले, तर कंदील तुटलेले. पहिल्या कंदिलाची बॉडी प्लास्टिकची होती. म्हणून कदाचित तुटले असतील. मग पुन्हा पत्र्याच्या बॉडीचे कंदील दिले. काही दिवसांनी ते सगळे हरवलेले होते. ‘कहाँ गए’ म्हणून विचारलं, तर पुन्हा तेच उत्तर ‘मालूम नहीं!’ म्हणजेच फुकट दिलेल्या वस्तूंची जबाबदारी घेण्याची त्यांची तयारी नव्हती. आठवी, नववी, दहावीच्या शैक्षणिक सीडी, तसंच रामायण, महाभारत, श्रीकृष्ण अशा सगळ्या मालिकांच्या सीडीज आणि सीडी प्लेयरही दिला होता. हे सगळे कार्यवाहकांच्या ताब्यात देऊन त्यांना बजावले होते, की पुन्हा आल्यावर सीडीज मला लागतील. सांभाळून ठेवा. पुन्हा आल्यावर कळले, की सगळ्या सीडीज आणि प्लेयर कोणीतरी नेला होता.
आजूबाजूला या घटनेबद्दल शोध घेतला, तेव्हा कळले, की कुंपणानेच शेत खाल्ले आहे. शर्माजींच्या विनंतीवरून छात्रवासमधील मुलांच्या अभ्यासासाठी म्हणून पूजा हॉलमध्ये सौर दिवे द्यायला सांगितले. त्या दिव्यांचे व्यवस्थित पॅकिंग करून तेवढे एलईडी दिवे दिले होते व पुण्याला आलो. पुन्हा गेलो तेव्हा कमी दिवे लावलेले दिसले. बाकीचे दिवे पुन्हा ‘कुंपणा’च्याच घरी असल्याचे कळले. मी माझ्या तेथील वास्तव्यात ऑफिसमध्ये राहत असे. तेथे गॅस असल्यामुळे कधी कधी भाजी व इतर खाद्यपदार्थ करीत असे. त्यासाठी लागणारे समान मी आणत असे; पण चहा, साखर, तेल त्यांना आणायला सांगितले होते. नेमके मला पाहिजे असे, तेव्हा चहा-साखर संपलेली असे किंवा कपाटात बंद असे. नाइलाजाने मला पुन्हा त्याचा वेगळा स्टॉक करून बॅगेत बंद करून ठेवावा लागे. 

आठवी, नववी, दहावीच्या मुलांना गणित शिकवण्यासाठी सकाळी सहा वाजता बोलावले. पहिल्या दिवशी १० मुले आली, दुसऱ्या दिवशी सहा, तिसऱ्या दिवशी चार व चौथ्या दिवशी मी एकटाच. कारणे काय? ‘आज माझी वेगळी ड्युटी आहे, माझी तब्येत बरी नाही, मला दुसरे काम होते.....’ मी वारंवार सांगत असे, की मी आहे तोपर्यंत माझा फायदा घ्या; पण त्याचा परिणाम होत नसे. मग मलाच प्रश्न पडे, की आपण एवढी सगळी मेहनत कोणासाठी करायची? आपण यांना सुधारण्यासाठी काही केले, तरी ते यांना नको आहे. मी एवढ्या शाळांमधून तीन-तीन दिवस विज्ञानाचे प्रयोग करून दाखवत असे. नंतर प्रयोगाचे साहित्यही विनामूल्य त्यांना देत असे; पण एकाही शाळेने अभिनंदनाचे चार ओळींचे पत्रही दिले नाही, याचे आश्चर्य वाटले. त्यांच्यात तशी पद्धत नसेल म्हणून दुर्लक्ष केले. शर्माजींच्या विनंतीवरून नेहमीच विवेकानंद शाळेत नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवायला जात असे. त्यांना संकल्पना समजावून सांगायला मला सलग दोन पीरियड लागायचे. पहिल्या तासात त्यांची पाचवीपासूनची उजळणी करून घ्यावी लागे आणि दुसऱ्या तासात त्यांचा विषय शिकवत असे. कारण पायाभूत गोष्टीच कोणालाच आठवत नसत. म्हणून त्यांची उजळणी केल्याशिवाय पुढचा विषय कसा कळणार? म्हणून मला शिकवायला दोन तास लागायचे. त्यावर इतर शिक्षकांचा आक्षेप असे, की आमचा तास तुम्ही घेतल्यामुळे आमचा बॅकलॉग वाढतो. त्यामुळे माझ्यावर बहिष्कारासारखे वातावरण असायचे. गमतीचा भाग असा असे, की जेव्हा सायन्स एक्झिबिशनमध्ये भाग घेण्यासाठी एखादे मॉडेल तयार करून देई, तेव्हा प्रत्यक्षात प्रदर्शनाच्या वेळी एखादा शिक्षक नेमण्यासाठी सांगत असे. कारण त्या वेळी मी पुण्याला गेलो असे; पण या जबाबदारीसाठी कोणीही शिक्षक तयार होत नसे. कारण काय? तर, ‘मी सायन्स टीचर नाही.’ मी सांगत असे, की तुम्ही जे दहावीत शिकलेले आहात, त्याचाच हा एक भाग आहे; पण ते कोणाच्याच पचनी पडत नसे. माझे परतीचे बुकिंग आधीच झालेले असल्यामुळे मलाही थांबता येत नसे. मग सगळे रामभरोसे ठेवून येत असे. मी तीन-चार वर्षे या शाळेशी निगडित आहे; पण एकदाही शाळेच्या वार्षिक पुस्तकात त्याचा उल्लेख आला नाही, ना शाळेला बक्षिस मिळाल्याचा उल्लेख. याचे वैषम्य वाटले. याची सहज चौकशी केली, तर प्रिन्सिपॉल सर म्हणाले, ‘हम भूल गए।’ माझा सहभाग त्यांच्या दृष्टीने कायम दुर्लक्षित होता. मुलांच्या छात्रवासाचा प्रमुख पाबितो नावाचा मुलगा आहे. तो दिमासा जमातीचा आहे. छात्रवासामध्ये २० मुले आहेत. छात्रवासाची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर आहे. परिषदेची एक मोटारसायकल आहे. त्याची किल्ली कार्यवाह यांच्याकडे असते. पाबितो मोटारसायकल चालवतो. मी तेथे येण्याअगोदर पाबितो व कार्यवाह यांना त्याची आगाऊ सूचना द्यायचो. त्याप्रमाणे मला स्टेशनवर आणायची व जायची सोय करायचे; पण हल्ली कोणीही स्टेशनवर येईनात. पाबितोला विचारले, तर तो म्हणाला, की ‘मैंने कितनी बार उनको चाभी मांग ली, की मामाजी को लाने स्टेशन जाना है। लेकीन उन्होंने चाभी नहीं दी और चूपचाप चले गए।’ तेव्हापासून मला वाटायला लागले, की आपली किंमत कमी होत चालली आहे व आता हाफलांगला न आलेले बरे! 

शाळेच्या प्रगतीसाठी काही सूचना केल्या. ‘आयटीआय’मध्ये वायरमन, प्लंबर, सुतारकाम असे ट्रेनिंग द्या. हे सर्व तीन ते सहा महिन्यांचे कोर्सेस आहेत. कोर्स पूर्ण झाल्यावर मुलांना व्यवसाय करू द्या. त्यांना अट घाला, की छात्रावास किंवा शाळेचे काम त्यांनी दोन वर्षं विनामोबदला, समाजकार्य म्हणून करायचे. म्हणजे एकतर ते आपल्या पायावर उभे राहतील व तुम्हाला आवश्यकता पडली, तर ते लगेच उपलब्ध असतील. येथे पाण्याचे खूप दुर्भिक्ष्य आहे. सध्या ते तलावापासून पाइप लावून पंपाने पाणी शाळेत आणतात; पण ते पिण्यायोग्य नसते. कधी कधी पंप खराब होतो किंवा लाइट नसतात, तेव्हा फार पंचाईत होते. 

किरण राजूरकर जेव्हा येथे आल्या होत्या,तेव्हा आम्ही शाळेत बोअरवेल घेण्याचे सुचविले. त्याचा खर्च आम्ही देणार होतो. त्यांना पैसे हवे होते; पण बोअरवेल नको होती. मी शाळेत जे वैज्ञानिक प्रयोग करून दाखवत असे, ते इतर संघटनांनाही शाळेत दाखवावे असे वाटे. त्याप्रमाणे मी त्या त्या प्रमुखांना भेटून माझा कार्यक्रम त्यांच्या शाळेतून दाखवावा, असे सुचविले. त्यावर ‘तुम्ही अमक्यांना भेटा व प्रोग्राम ठरवा’ असे उत्तर येत असे. मी म्हणत असे, की त्यांनी शाळाप्रमुखांना सांगितले, तर ते लगेच एकतील. मी परिचित असल्यामुळे मला दाद देण्याची शक्यता कमी आहे; पण त्याकडे दुर्लक्ष करून, ‘तुम्हीच संपर्क साधा,’ असे सांगण्यात आले. मी मग तो नाद सोडून दिला. त्यामुळे आपण ईशान्येत येऊन नेमके काय करायचे, हा प्रश्न माझ्यापुढे उभा असे. 

नागा जमातीचा प्रतिसादही निराशाजनक होता. हंग्रूममधील सौर दिवे लावून दोन वर्षे झाली. बॅटऱ्या निकामी झाल्यामुळे बरीच घरे अंधारात गेली. मी हरका असोसिएशनच्या अधिकाऱ्यांना सांगितले, की तुम्ही हंग्रूमला जा. सगळ्या बॅटऱ्या बदलण्याची वेळ आली आहे. प्रत्येकी ७०० रुपये खर्च येईल. ते पैसे गोळा करा. गुवाहाटीतून ठोक भावात बॅटऱ्या विकत घ्या. ई-दुकानदाराला सांगून ठेवले आहे. तो तुम्हाला जुन्या बॅटऱ्यांचे पैसेही देईल. म्हणजे अजून दोन वर्षे तुम्हाला सौर दिवे मिळतील; पण या कामासाठी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडे वेळ नाही. गावकरीही तेवढेच आळशी. जानेवारीमध्ये मी लायसाँगला राणीमाँच्या जन्मशताब्दी प्रारंभाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तेथे हंग्रूम गावकऱ्यांची व हरका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची गाठ घालून दिली. कोणी काय करायचे हे समजावून दिले. पुण्याला आल्यावर मोबाइलवरून चौकशी केली, तर एकमेकांवरील दोषारोप ऐकू आले. गावकरी म्हणतात, कोणी पदाधिकारी येथे येत नाहीत. आम्ही पैसे द्यायला तयार आहोत. आणि पदाधिकारी म्हणतात, की गावकरी पैसे देत नाहीत. 

हंग्रूमला पाण्याचा दुष्काळ आहे. म्हणून त्यांना जमिनीखाली पाणी कोठे लागेल ती जागा दाखवून विहीर खोदायला सांगितले. तेथील खडकही मऊ आहे; पण स्वत: श्रमदान करायची कोणाचीही तयारी नाही. त्यांना प्रगती हवी आहे; पण दुसऱ्यांनी मेहनत करून. स्वत: काही करणार नाहीत. मागे गुवाहाटीला प्रदर्शनात केंद्रीय बांबू संशोधन संस्थेच्या स्टॉलला भेट दिली. चौकशी केल्यावर त्यांनी सर्व माहिती दिली. या संस्थेतर्फे आदिवासींना बांबूच्या कलात्मक वस्तू व पदार्थ तयार करण्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. पुढे त्यांनी आपल्या गावी जाऊन बांबूच्या वास्तू तयार करायच्या. संस्था ते गोळा करून त्याचे मार्केटिंग करतील व त्याचे पैसे त्यांना देतील. आसाममध्ये प्रत्येक ठिकाणी बांबू प्रचंड प्रमाणात असल्यामुळे या आदिवासींना बांबू सहज उपलब्ध आहे. हरका असोसिएशनला सर्व समजावून सांगितले; पण ‘मामा, कहाँ हम लोग गुवाहाटी जाएगा!’ असे म्हणून त्यांनी टाळाटाळ केली. हंग्रूममध्ये एक मुलगी मला म्हणाली ‘मामा, मुझे यहाँ से ले जा, नहीं तो मुझे ये लोग ख्रिश्चन बनाएंगे।’ मी म्हणालो, ‘अपने माईबाबा से इजाजत ले और चल।’ दुसऱ्या दिवशी म्हणाली, ‘वो मना करते है।’ आता मी काय करू?’ 

मला आमच्या दादाचा (अविनाश बिनीवाले) यांचा महाराष्ट्र टाइम्समधला लेख आवडला होता. ते म्हणतात, ‘नॉर्थ इस्टबद्दल आम्हाला जेवढी कणव वाटते, तेवढी त्यांना गरज वाटत नाही. तुमच्या मदतीची त्यांना गरज नाही. त्यांची लाइफस्टाइल ठरलेली आहे व ते त्याप्रमाणेच राहणार. तुम्हाला मदत करावीशी वाटते तर करा; पण ते स्वीकारतील याची खात्री नाही.’ 

गेल्या आठ वर्षांत मला याची चांगलीच प्रचिती आली आहे.
                                                                             (क्रमशः)      
- अरुण सरस्वते, दापोडी, पुणे
मोबाइल : ९४२३० ०२२१५ 

(‘ईशान्यवाटेचा वारकरी’ ही लेखमालिका दर मंगळवारी आणि शुक्रवारी  ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/cej71c या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link