Next
कानांच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला
प्रेस रिलीज
Tuesday, March 05, 2019 | 04:41 PM
15 0 0
Share this article:

पुणे : वर्ल्ड हिअरिंग डे तीन मार्च रोजी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कानांच्या कोणत्याही समस्यांकडेही दुर्लक्ष न करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी  दिला आहे.

जगात तब्बल ३६० दशलक्ष लोक कानाच्या कुठल्या ना कुठल्या तरी समस्येने ग्रस्त आहेत. म्हणजेच जगात ५.३ टक्के लोकसंख्येला कानाच्या समस्या आहेत. भारतातही या समस्या आढळून येतात. या समस्या टाळणे किंवा यांवर प्रतिबंध करणे शक्य असल्याने कानाच्या समस्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी  व्यक्त केले.

यासंदर्भात बोलताना इनामदार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे कान-नाकघसा तज्ञ डॉ. प्रसून मिश्रा म्हणाले, ‘विकसनशील देशांमध्ये लहान व प्रौढांच्या कानाच्या समस्यांकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. ज्यामुळे आपल्या शरीराचे संतुलन व आपल्या जीवनमानावर प्रभाव पडू शकतो. आपले कान हे नाकाच्या मागील भागास जोडले गेले असतात आणि त्यामुळे कानाला होणार्‍या समस्यांचा प्रभाव नाकावरदेखील पडू शकतो. विविध परिस्थितींचा कानाच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो.’

‘भारतात सर्वसामान्यपणे कानाच्या बाबतीत आढळणारी समस्या म्हणजे ‘ओटीटीस मीडिया’ हा एक प्रकारचा संसर्ग असतो. याची सुरुवात नाक व घशाच्या संसर्गाने होते. यामुळे कानाच्या पडद्यात भोक पडून किंवा खड्डा पडून त्याला निकामी करतात. याच्यावर उपचार केले नाहीत, तर प्राणघातक ठरू शकते; मात्र औषध किंवा गरज भासल्यास शस्त्रक्रियेद्वारे या समस्येवर पूर्णपणे मात करता येते,’ असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.

‘भारतात ‘ओटीटीस मीडिया व्यतिरिक्त सर्वांत जास्त लक्ष द्यायला हवे ते म्हणजे लहान मुलांच्या कानाच्या समस्यांकडे. बर्‍याच वेळा मुले पाच ते सहा वर्षांची होईपर्यंत या समस्या लक्षात येत नाहीत आणि त्यानंतर लक्षात आल्या, तरी मुलांच्या बोलण्यावर परिणाम होऊ शकतो कारण, ऐकण्याचा आणि बोलण्याचा थेट संबंध असतो. व्यवस्थित ऐकू येत असेल, तरच बोलण्याचा विकास होऊ शकतो. बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये आता नवजात शिशुंसाठी हिअरिंग स्क्रीनिंग चाचण्या (ओएई) असतात. त्याद्वारे अगदी बाळ दोन ते तीन दिवसांचे असतानाच ऐकण्याच्या बाबतीत समस्या असेल, तर कळू शकते. पालकांनी आपली मुले आवाजाला कसा प्रतिसाद देतात याकडे नीट लक्ष द्यावे. आवाजानंतर त्या दिशेने पाहतात की नाही याकडे लक्ष द्यावे,’ असे डॉ. मिश्रा म्हणाले.

वयाशी निगडीत ऐकण्याच्या समस्या या पन्नाशीनंतर काही अंशी सुरू होतात. यांवर हिअरिंग एड उपकरणे उपयुक्त ठरतात; मात्र बरीच लोक याचा वापर करत नाहीत आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाशी किंवा स्नेहींशी संवाद साधताना याचा परिणाम होतो. ऐकण्याच्या समस्या या कधीकधी अनुवंशिकदेखील असू शकतात आणि याचे लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार होऊ शकतात.

‘सर्वसामान्यांनी जोखमीच्या घटकांकडे लक्ष द्यावे. गरोदरपणामध्ये होणारा संसर्ग, सतत नाकात-घशात होणारा संसर्ग, कान साफ करण्यासाठी विविध वस्तूंच्या वापराने होणार्‍या जखमा, कानात होणारा संसर्ग, मेंदूला झालेली दुखापत, खोलवर समुद्रात (डीप सी डायव्हिंग) उडी मारल्याने कानातील दाबामध्ये आलेले अचानक बदल, विविध वैद्यकीय स्थिती जसे मधुमेह, व्हायरल इन्फेक्शन, मुत्रपिंडाच्या समस्या, थायरॉइड, टीबी व ध्वनी प्रदूषण हे जोखमीचे घटक आहेत. उपचार पद्धती व शस्त्रक्रियांमध्ये झालेल्या लक्षणीय सुधारणांमुळे अनेक समस्यांवर मात करता येते,’ असे डॉ. मिश्रा यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search