Next
ऐतिहासिक वारसा सांगणारी बारामोटेची विहीर
BOI
Wednesday, September 27, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:आडगावातली, ऐतिहासिक संदर्भ असलेली, वैशिष्ट्यपूर्ण अशी ठिकाणं निखळ आनंद देणारी असतात. अनेक वर्षं ती दुर्लक्षित राहतात; पण कधीतरी एकदम प्रकाशात येतात आणि तिथे पर्यटकांचा ओघ सुरू होतो. सातारा जिल्ह्यातलं शेरेलिंब गावातलं बारामोटेची विहीर हे ठिकाण असंच अलीकडे जास्त प्रकाशात आलेलं. ‘चला भटकू या’मध्ये आज जाऊ या त्या विहिरीवर...
...........
बारामोटेची विहीर शाहू महाराजांच्या काळात १७१९ ते १७२४ दरम्यान बांधली गेली होती, असं सांगितलं जातं. साताऱ्याच्या गादीवर सत्ता असलेले शाहू महाराज आणि पेशवे यांच्यातील बैठकांचं हे प्रमुख ठिकाण होतं, असंही लोक सांगतात. प्रत्यक्षात ही संपूर्ण दगडी विहीर त्या भागातल्या आंब्याच्या कलमांना पाणी पुरवण्यासाठी बांधण्यात आली होती. या भागात तीनशे एकर परिसरात आंब्याची ३३०० झाडं लावण्यात आली होती. ही भलीमोठी आमराई हा संपूर्ण परिसर थंड, शांत राखण्यात मदत करत होती. तिला पाण्याची गरजही तेवढीच होती. त्यासाठीच ही भलीमोठी विहीर बांधण्यात आली. शेताच्या मध्यभागी असलेली ही विहीर जमिनीपासून सुमारे शंभर फूट खोल आहे. आता पाण्याची पातळीसुद्धा ५० ते ५५ फूट खोल असल्याचं सांगितलं जातं.

विहिरीची रचना खूप आकर्षक आहे. विहिरीचं सगळं बांधकाम जमिनीच्या पातळीच्या खाली आहे. मुख्य विहिरीकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. त्या उतरून गेल्यावर समोर महालासारखी रचना दिसते. इथून दोन्ही बाजूला वर जाण्यासाठी छोट्या दगडी पायऱ्या आहेत. ही वाट आपल्याला विहिरीच्या सगळ्यात वरच्या सज्जात किंवा गॅलरीमध्ये घेऊन जाते. याच ठिकाणी बसून शाहू महाराज, पेशवे यांच्या अऩेक गुप्त बैठका, खलबतं होत असत, असं सांगितलं जातं. आरामाची किंवा गुप्त बैठकांची खोली वाटावी, अशीच इथली रचना आहे. भिंतीच्या दोन्ही बाजूंना पडदे लावले, तर आतली व्यक्ती दिसणार नाही आणि आवाजही ऐकू जाणार नाही, याची खात्री पटते.

विहिरीची रचना आणि बांधकाम एवढं आकर्षक आहे, की जमिनीखालच्या एखाद्या महालात आपण वावरतो आहोत की काय, असाच समज व्हावा. जमिनीच्या खाली एवढं अप्रतिम बांधकाम करण्यासाठी किती कष्ट पडले असतील, याचीही कल्पना इथली शिल्पकला बघताना येते. इथल्या भिंतींवर व्याल आणि शलभ यांची शिल्पे आहेत. व्याल म्हणजे वाघाचं तोंड आणि सिंहाचं शरीर असलेलं शिल्प. ही शिल्पं राज्याची समृद्धी आणि पराक्रमाचं प्रतीक मानली जातात. अनेक गडांवरही ही शिल्पं पाहायला मिळतात.

विहिरीच्या दक्षिण दिशेला चार हत्तींवर आरूढ झालेल्या वाघाचं शिल्प मराठ्यांचं दक्षिणेतलं वर्चस्व प्रदर्शित करतं आणि उत्तरेकडे असलेली झेपावणारी व्याघ्र शिल्पं पुढच्या उत्तरेकडच्या मोहिमेचा संकेत देतात, असं सांगितलं जातं. अष्टकोनी विहिरीच्या प्रत्येक कोनात नागदेवतेची मूर्ती आहे. विहिरीतल्या खासे बैठकीत कमळ, हत्ती, गणपती, मारुती ही शुभचिन्हं चितारली आहेत.

हेमाडपंती रचनेत विहिरीचं काम केलेलं आहे. विहीर बांधताना दगड एकमेकांना जोडण्यासाठी चुना, सिमेंट अशा कोणत्याही गोष्टीचा वापर केलेला नाही. संपूर्ण दगडातून अतिशय कोरीव शिल्प उभं केलं आहे. पूर्वी या विहिरीवर पाणी काढण्यासाठी बारा मोटा होत्या. मोट म्हणजे विहिरीतून पाणी काढण्यासाठी तयार केलेली चामड्याची किंवा रबरी पखाल. या पखालीला जोडलेली दोरी रहाटाच्या माध्यमातून फिरवली जाते. बैल गोल फिरून या मोटा ओढत असत. मोठं चक्र असलेल्या या रहाटातून रबरी थैलीतून किंवा डब्यातून पाणी वर येऊन पाटात पडत असे आणि तिथूनच ते शेतीसाठी वळवलं जात असे. कालांतरानं या मोटा जुन्या होऊन मोडून पडल्या असाव्यात. मोटांचे खांब रोवण्यासाठीची छिद्रं अजूनही या ठिकाणी अस्तित्वात आहेत. मुख्य विहिरीचा आकार अष्टकोनी आहे. वरून पाहिलं असता, विहिरीची रचना शिवलिंगाच्या आकारात केलेली दिसते.

विहिरीचं ऐतिहासिक महत्त्व आणि वैशिष्ट्य लक्षात घेतलं, तरी तिची देखभाल हवी त्या पद्धतीनं केली जात नाही, हेही लक्षात येतंच. अशा पद्धतीच्या वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे त्या स्थितीत जपल्या जाव्यात, अतिउत्साही पर्यटकांना तिथं काही नासधूस करू देऊ नये, एवढी खबरदारी तर घेतली जाणं अत्यावश्यक आहे. दुर्दैवानं इतर ऐतिहासिक ठिकाणांप्रमाणेच इथंही तोच अनुभव येतो. भिंतीच्या खांबांवर कोरलेली नावं, चित्रं यामुळे विहिरीच्या मूळ सौंदर्याला बाधा आणण्याशिवाय दुसरं काही साध्य होत नाही. विहिरीचं सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्व टिकवण्यासाठी हे प्रकार रोखले जायला हवेत.

विहिरीच्या आसपासचा परिसरही तेवढाच रम्य आहे. आजूबाजूला शेत आणि वड, पिंपळ, चिंचेची झाडं असल्यामुळे या भागात कायम गारवा असतो. लिंब गाव मुख्य महामार्गापासून जवळच असलं, तरी गावाची सगळी वैशिष्ट्यं जपून आहे. कृष्णा नदीकाठचं समृद्ध, संपन्न गाव म्हणूनही त्याची ख्याती आहे. कृष्णा नदीकाठी पूर्वी अनेक सरदार, वतनदारांचे वाडे होते. काही वाडे अजूनही आपली अस्तित्व टिकवून आहेत. काहींचे फक्त अवशेष बघायला मिळतात, त्यावरूनही त्या काळची समृद्धी लक्षात येते.

कसं जायचं?
पुण्याहून साताऱ्याला जात असताना खंबाटकी घाट ओलांडला, की डाव्या बाजूला शेरेलिंब गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचा फलक दिसतो. मुख्य रस्त्यापासून आत सुमारे चार किलोमीटर अंतरावर ही विहीर आहे. साताऱ्याहून अंतर सुमारे १९ किलोमीटर.

- अभिजित पेंढारकर
ई-मेल : abhi.pendharkar@gmail.com

(लेखक चित्रपट, दूरचित्रवाणी, कला आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.)

(‘चला, भटकू या’ हे सदर दर बुधवारी प्रसिद्ध होते.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
shailaja Deshpande About
A real heritage structure indeed. We just hope that itt will be preserved not only as a heritage structure but also as an important resource for water. Protection of the peripheral areas from where the recharging is happening also must be protected.
0
0

Select Language
Share Link
 
Search