Next
गदगमध्ये फेरफटका
BOI
Wednesday, January 16, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

लक्कुंडी येथील काशीविश्वेश्वर मंदिरातील कीर्तिमुख‘करू या देशाटन’ या सदरात कर्नाटक राज्यातील पर्यटनस्थळांची माहिती आपण सध्या घेत आहोत. आजच्या भागात माहिती घेऊ या गदग जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची...
............. 
कर्नाटकातील धारवाड जिल्ह्यातून गदग जिल्हा १९९७मध्ये वेगळा करण्यात आला. फार पूर्वी यापैकी बहुतांश भाग चालुक्य राजवटीत होता. त्यामुळे चालुक्य, कल्याणी राजवटीतील अनेक जैन व हिंदू मंदिरे या जिल्ह्यात आहेत. आसपासच्या परिसरात सातवाहन काळातील बौद्ध मंदिरांचे अवशेष आढळले आहेत. मौर्य, सातवाहन, होयसळ, चालुक्य, राष्ट्रकूट, मराठे, टिपू आणि अखेर इंग्रज अशा राजवटी या प्रदेशाने पाहिल्या. महाराष्ट्राचेही या भागाशी अतूट नाते आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी हा भाग आपल्या ताब्यात घेतला होता. येथे महाराजांनी काही किल्लेही बांधले आहेत. हा प्रदेश सध्या पवन ऊर्जा निर्मितीसाठी ओळखला जातो. अनेक मोठ्या कंपन्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जानिर्मिती सुरू केली आहे. गदग जिल्ह्यात शेतीमालावर आधारित उद्योग आहेत. तसेच हातमागही आहेत. या भागात कापूस मोठ्या प्रमाणावर पिकविला जातो. प्रसिद्ध गायक दिवंगत पंडित भीमसेन जोशी, तसेच माजी खासदार दिवंगत जगन्नाथराव जोशी, क्रिकेटपटू सुनील जोशी यांचे जन्मठिकाण याच जिल्ह्यात आहे. 

गदग शहर : येथे जिल्हा मुख्यालय आहे. गदग आणि बेटागिरी ही जुळी शहरे असून, दोन्ही मिळून एक नगरपालिका तयार करण्यात आली आहे. हे चालुक्यकालीन गाव असून, चालुक्य शैलीतील मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. 

त्रिकुटेश्वर मंदिर

त्रिकुटेश्वर मंदिरसमूह :
यात एक शिवमंदिर व सरस्वती मंदिर असून, साधारण इ. स. १०५० ते १२०० या कालावधीत याचे बांधकाम झाले असावे. बदामीचे महान वास्तुकार अमारा शिल्पी जकनाचारी यांनी या मंदिराची रचना केली. बदामी चालुक्य हे दख्खनच्या आरंभीच्या वास्तुशास्त्रीय यशाचे मानकरी होते. ऐहोळे, बदामी आणि पट्टदकल हे त्यांचे कला केंद्र होते. 

सरस्वती मंदिर

सरस्वती मंदिराचे सभागृह आणि स्तंभ

त्रिकुटेश्वर मंदिर परिसरातील विहीरमंदिरामध्ये गुंतागुंतीच्या शिल्पकलेसह अलंकृत खांब आहेत. त्रिकुटेश्वर मंदिर परिसरात सरस्वतीचे एक उत्कृष्ट मंदिर आहे. उत्तम दगडी स्तंभ येथे पाहायला मिळतात. व्हरांड्याचे स्लॅब आलंकारिक पॅनेल्सने सजवलेले असून, पूर्वेकडील गर्भागृहात ब्रह्मा, महेश आणि विष्णू यांचे प्रतिनिधित्व करणारी तीन लिंगे आहेत. दक्षिणेस एक देऊळ देवी सरस्वतीला समर्पित आहे. येथे पायऱ्यांची एक विहीरही आहे. 

वीरनारायण मंदिर : हे होयसळ शैलीतील मंदिर असून, राजा विष्णुवर्धन याने इ. स. १११७मध्ये याचे बांधकाम केले. इतिहासानुसार, विष्णुवर्धन जैन होते. ते रामानुजाचार्यांच्या प्रभावाने वैष्णव झाले. राजाची मुलगी आजारी होती. ती स्वामींमुळे बरी झाल्याने ते रामानुजचार्यांचे अनुयायी झाले. राजाने भगवान विष्णूसाठी पाच मंदिरे बांधली. गदगमधील वीरानारायण मंदिर, तोडानूरमधील नंबिनारायण मंदिर, बेलूर येथील चन्नकेशव मंदिर, तालाकडमधील कीर्तिनारायण मंदिर आणि मेलकोटे येथील चेलूवणारायण मंदिर ही ती पाच मंदिरे आहेत. पुरातन काळातील ७२ महाजनांचे हे ठिकाण होते, असा पुरावा येथील शिलालेखात सापडतो. 

ब्रह्म जिनालय जैन मंदिर

लक्कुंडी येथील जैन मंदिरातील ब्रह्माची चतुर्मुख मूर्तीगदगच्या आसपास
लक्कुंडी : हे ठिकाण प्रामुख्याने ब्रह्म जिनालय जैन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. इतरही अनेक मंदिरे येथे आहेत. पट्टदकल येथील बदामी चालुक्यांनी बांधलेल्या मंदिराच्या तुलनेत येथील मंदिरांची एकूण उंची कमी आहे. लक्कुंडीच्या आसपास ५० पुरातन मंदिरे व १००हून अधिक पायऱ्यांच्या विहिरी, पुष्करिणी आहेत. मध्ययुगीन काळात लोककीगुंडी म्हणून ओळखले जाणारे हे शहर ११-१२व्या शतकात, कल्याणी चालुक्य काळात महत्त्वपूर्ण होते. लक्कुंडी गावामध्ये मल्लिकार्जुन, वीरभद्रा, माणिकेश्वर, नन्नेश्वर, लक्ष्मीनारायण, सोमेश्वर, नीलकांतेश्वर अशी मंदिरे असून, काही मंदिरे क्षतिग्रस्त आहेत. 

ब्रह्म जिनालय जैन मंदिर : लक्कुंडीमधील हे मंदिर पुरातत्त्व खात्याने संरक्षित ठिकाण म्हणून घोषित केले आहे. हे चालुक्य राजवटीत बांधले गेले असावे. मंदिरात सिंहासनाधिष्ठित, पॉलिश केलेली, भागवान महावीरांची चार फूट उंचीची काळ्या पाषाणातील एक मूर्ती आहे. हे मंदिर मृदू खडकांच्या साह्याने (Soapstone) बांधकाम केलेले असून, ते लक्कुंडीतील जैन मंदिरांतील सर्वांत मोठे मंदिर आहे. ब्रह्म जिनालय मंदिरातील भगवान ब्रह्मदेवाची मूर्ती अतिशय सुंदर आणि मोहक आहे. 

काशीविश्वेश्वर मंदिर

काशीविश्वेश्वर मंदिर :
लक्कुंडी येथील हे मंदिर पूर्वी अस्तित्वात असलेल्या द्रविड (दक्षिण भारतीय) शैलीत असून, पश्चिमी चालुक्य स्थापत्यशास्त्राच्या प्रौढावस्थेचे ठिकाण होते. हेन्री क्यूसन्सच्या मते, हे कर्नाटकातील सर्वांत भव्य मंदिरांपैकी एक आहे. मंदिराच्या सभामंडपातील बीमवर सन १०८७मधील शिलालेख आहेत. चालुक्य प्रदेशावरील चोल आक्रमणानंतर, सन ११७०मधीलही काही शिलालेख आहेत. 

नानेश्वर मंदिर

नानेश्वर मंदिर :
हे लक्कुंडीमधील ११व्या शतकातील, चालुक्य शैलीतील मंदिर असून, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून संरक्षित केले आहे. हेही मंदिर मृदू पाषाणात बांधले आहे. 

नरगुंद किल्ल्याचे भग्नावशेष

नरगुंद :
हे ऐतिहासिक ठिकाण असून, सन १८७१मध्ये येथे म्युनिसिपालिटी स्थापन झाली. येथे बराच व्यापार चालतो. येथील किल्ला शिवाजी महाराजांनी सन १६७७मध्ये बांधला. दक्षिणेवर नियंत्रण मिळण्यासाठी महाराजांनी याची निर्मिती केली होती. किल्ल्याचे क्षेत्रफळ ३८८ एकर आहे. किल्ल्यात चार-पाच कोरडे तलाव, अंबरखाना व दारूखाना वगैरे ठिकाणे आहेत. हा किल्ला मोडकळीस येण्यापूर्वी बराच भक्कम होता. येथे शंकरलिंग व महाबळेश्वर यांची देवळे असून, हनुमंताच्या लहानशा देवळात सन ११४७चा एक शिलालेख आहे. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला औरंगजेबाने घेतला. तो सन १७०७ मध्ये पेशव्यांचे सरदार रामराव भावे याने जिंकला. सन १७७८ ते १७८५ दरम्यान हैदर व टिपू यांचे मांडलिकत्व संस्थानिकांनी घेतले होते. त्यानंतर पुन्हा टिपूने हा भाग तहामध्ये मराठ्यांच्या ताब्यात दिला. तो ब्रिटिशांनी भावे संस्थान खालसा करीपर्यंत त्यांच्याकडे होता. ब्रिटिशांनी भाव्यांचे दत्तकविधान नामंजूर केल्यावर त्यांनी बंड पुकारले व एका ब्रिटिश अधिकाऱ्याचे मुंडके कापून गावाच्या वेशीवर टांगले. त्या वेळी ब्रिटिशांनी जोरदार हल्ला केला व किल्ला नष्ट केला. भावे पळून गेले; पण त्यांना पंढरपुरात यात्रेकरूंच्या वेशात पकडण्यात आले. त्याची चौकशी बेळगाव येथे होऊन, १८ जून रोजी त्यांना फाशी देण्यात आले आणि नरगुंद संस्थान खालसा केले. किल्ला पुन्हा लढविता येऊ नये म्हणून काही तलाव निकामी करण्यात आले व तटबंदी पाडून टाकण्यात आली. 

गजेंद्रगड

गजेंद्रगड :
हा प्रदेश पूर्वी बदामीच्या चालुक्यांच्या वर्चस्वाखाली होता. शिवाजी महाराजांनी येथील किल्ला बांधला. घोरपडे परिवाराचे संस्थापक श्री वालभासिंह चोलारराज घोरपडे आणि नंतर वंशज बहिर्जीराव (हिंदुराव) घोरपडे होते. या ठिकाणी टिपू व मराठा सरदार यांच्यात लढाई झाली होती. निसर्गरम्य परिसरात, टेकडीवर कालेश्वराचे सुंदर मंदिर आहे. सुट्टीच्या दिवशी सहलीसाठी हे प्रसिद्ध ठिकाण आहे. समोरच विंड मिल्स (पवन ऊर्जानिर्मिती केंद्रे) आहेत. या भागात कापूस मोठ्या प्रमाणावर पिकविला जातो. 

हुल्लिगेरे (लक्ष्मेश्वर) येथील सोमेश्वर मंदिर

सोमेश्वर मंदिर सभागृह

हुल्लिगेरे (लक्ष्मेश्वर) येथील सोमेश्वर मंदिर समूह परिसरातील विहीरहुल्लिगेरे (लक्ष्मेश्वर): गदग जिल्ह्यातील हे एक चालुक्यकालीन ऐतिहासिक शहर आहे. हे कृषिप्रधान गाव असून, व्यापाराचे ठिकाण आहे. येथील सोमेश्वर मंदिर प्रसिद्ध असून, गावात आणखी दोन जैन मंदिरे आहेत. 

दम्बल : हे मौर्य आणि सातवाहन यांच्या काळातील कर्नाटक राज्यातील बौद्ध धर्माचे एक प्राचीन केंद्र होते आणि त्या काळी बुद्धांची शिकवण कर्नाटकमध्ये वाढली. येथील चालुक्य शैलीतील दोड्डाबसाप्पा मंदिरही बघण्यासारखे आहे. 

शिरहट्टी : येथील श्री जगद्गुरू फकीरेश्वर मठ हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एक प्रसिद्ध धार्मिक केंद्र आहे. हिंदू आणि मुसलमान या देवतांचे अनुसरण करतात. मुस्लिम संत हजरत सय्यद लाल शाह बझ बुखारी (सईद अंकुश खान वली) यांनी प्रथम स्वामी देसाई यांना फकीर म्हणून आणि नंतर स्वामींना आणि धार्मिक कृत्यांसाठी मटण दान करण्याची परंपरा सुरू केली. ही परंपरा आजपर्यंत चालू आहे. 

कसे जाल?
गदग हे हुबळी-बेल्लारी रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. तसेच हुबळी-बेल्लारी या हमरस्त्यावरही ते आहे. गदग शहरात राहण्या-जेवण्याची चांगली व्यवस्था आहे. जाण्यासाठी उत्तम कालावधी ऑक्टोबर ते फेब्रुवारी. जवळचा विमानतळ बेळगाव - १६० किलोमीटर. 

- माधव विद्वांस
ई-मेल : vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

माणिकेश्वर
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
ब्रिजमोहन हेडा About 213 Days ago
सुंदर लेख. आवडला. माहिती आणि फोटोही सुंदर आहेत. आभार.
0
0

Select Language
Share Link
 
Search