Next
टिळक आळीतील लोकोत्तर पुरुष - चिंतूतात्या जोशी
BOI
Wednesday, October 17, 2018 | 05:16 PM
15 0 0
Share this article:

जोशी कक्ष असे नामकरण...

रत्नागिरी येथील दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिराला चिंतूतात्या उर्फ चिंतामण दिनकर जोशी आणि सौ. शोभना चिंतामण जोशी यांनी देणगी दिली. त्यामुळे शाळेतील एका कक्षाचे ‘जोशी कक्ष’ असे नामकरण करण्यात आले. १७ ऑक्टोबर २०१८ रोजी हा कार्यक्रम झाला. सध्या वयाच्या नव्वदीत असलेल्या चिंतूतात्यांचे संपूर्ण जीवनच समाजसेवेचा आदर्श वस्तुपाठ आहे. त्यांच्या जीवनकार्याबद्दलचा हा लेख...
.........
चिंतूतात्या आणि शोभना जोशी‘पुलं’च्या ‘मधल्या आळीतील लोकोत्तर पुरुष’ या संज्ञेत चपखलपणे समाविष्ट होईल असे चिंतूतात्या हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व! जेमतेम शिक्षण, पण अनुभवांची डॉक्टरेट! भिक्षुकी, शेती, अशा व्यवसायांतून कमाईपेक्षा गोरगरिबांना सर्वतोपरी मदत, यातच चिंतूतात्यांचे उभे आयुष्य गेले. संघ, जनसंघ असो, जनता पक्ष असो, की भाजप असो, निष्ठा कायम. पडेल ते काम करायचे. थोडक्यात येथेही ‘पुलं’चा नारायण. हातावर घड्याळ असले, तरी त्याचा उपयोग किती उशीर झाला ते बघण्यासाठीच. कारण समाजकार्यात एकात एक निघणारी कामे आणि वाटोवाट भेटणारे मदतीसाठी हात मागणारे अनेक गरजू! गणपतीच्या पूजेला तुमच्या घरी नक्की पोहोचतील एवढी मात्र यजमानांना खात्री. चिंतूतात्यांची पत्नी सौ. शोभनाकाकू तर शिक्षिका म्हणजे सर्व वेळेवर काम. त्या पूजेच्या यजमानाला इतकंच आश्वासन देत असत.

नियमित वाहन सायकल! पण वाहन परवाना बैलगाडीपासून ते रोडरोलरपर्यंत कोणतेही वाहन लीलया चालविण्याचा. कोणाची तरी अडचण आहे म्हणून चिंतूतात्या कोणाचा तरी ट्रक घेऊन जवळपासच्या कोणत्या तरी खेडेगावात कधीही रवाना होत असे. पायाला सततचे चक्र लागलेले, पण ते बऱ्याचदा परोपकारासाठीच! कोणाची म्हैस अडलीय, कोणाची बैलजोडी आणायचीय, कोणाची पोहोचवायचीय, अशा सार्वजनिक कामाचीच आवड; पण असाही संसार चिंतूतात्या यांनी ती. सौ. शोभनाकाकूच्या भक्कम पाठिंब्यावर यशस्वी केलाय.

सन १९७३च्या नोव्हेंबर-डिसेंबरमधील प्रसंग! रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. नगर परिषदेच्या जुन्या इमारतीसमोरील प्रांगणात तत्कालीन जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. केळकर, जनुभाऊ काळे आणि आमच्यासारखी काही उत्साही तरुण मंडळी हजर होती. उमेदवारी भरण्याची वेळ जवळपास संपत आली होती. कर्ले-आंबेशेत या खाडी किनाऱ्यालगतच्या प्रभागासाठी जनसंघाकडून कोणी उमेदवार मिळाला नव्हता. ज्येष्ठांच्या मनात घालमेल होती. इतक्यात समोरील रस्त्यावरून खाकी हाफ पँट आणि साधारण मळलेला पांढरा शर्ट, डोक्यावर काळी टोपी घातलेली अशी असामी पाहून डॉ. केळकर यांनी त्याला हाक दिली ‘अरे चिंतू’. असामी माझ्याच टिळक आळीतील असल्याने मी चिंतूकाकांना ओळखलेच. त्यानंतर मला काही काळ कळलेच नाही. त्यांना घेऊन डॉ. केळकर, जनुभाऊ ऑफिसमध्ये गेले आणि काही वेळातच बाहेर आले आणि मला कळले कर्ले-आंबेशेत प्रभागासाठी जनसंघाकडून चिंतूकाका यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता. प्रतिस्पर्धी उमेदवार निवृत्त न्यायाधीश नानासाहेब पवार. डॉक्टर केळकर तात्यांना म्हणाले, ‘रात्री मीटिंगला ये, प्रचाराची दिशा ठरवता येईल.’ ‘तुमचे काय ते तुम्हीच ठरवा. मी चाललो. इथूनच प्रचाराला निवखोलातूनच सुरुवात करतो.’ सुपारी कातरून-तंबाखू मळून चिंतूतात्या सायकलवर टांग मारून क्षणार्धात रवाना झाले! त्या प्रभागात फारसे आशादायक चित्र कोणी पाहिलेही नव्हते; पण या प्रभागात भिक्षुकीच्या व्यवसायामुळे चिंतूतात्यांचा घराघरांतून किती संपर्क होता, हे निवडणुकीच्या निकालावरून कळले. ते निवडून आले... तगड्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध!

व्यायामशाळेत जाऊन कमावलेली सुदृढ देहयष्टी, मृदू स्वभाव. जमेल त्या मार्गाने जमेल तसा आणि जमेल तेवढा परोपकार, हे आयुष्याचे सूत्र घेऊन चिंतूतात्या आज नव्वदी पार करून आयुष्य सुखासमाधानाने जगतायत. या विलक्षण माणसाबद्दल खरे तर खूप लिहिता येईल. १९७० साली अटलबिहारी वाजपेयीजी जनसंघाचे अध्यक्ष झाल्यावर रत्नागिरी येथे प्रथमच येणार होते त्या वेळचा प्रसंग! पताका आणि सुरमाडाच्या कमानी उभारणीचे काम आम्ही करीत होतो. चिंतूतात्या यांच्या मातोश्रींचे त्याच वेळी निधन झालेले. त्यांच्याच घरासमोरील टिळक जन्मभूमीसमोरील परिसर सुशोभित करायचा तरी कसा, असा आम्ही विचार करीत होतो. वेळ रात्री तीनची. कदाचित त्यांना जाग आली असावी. ते स्वतः पुढे आले, ‘माझी आई गेली, त्याचे दु:ख आहे; पण आपला लाडका नेता येणार आहे, त्याच्या स्वागतात काही कमी पडता कामा नये,’ असे सांगून चिंतूतात्यांनी स्वत:च्या देखरेखीखाली तेथील स्वागत-सुशोभीकरण आमच्याबरोबर पूर्ण करून घेतले आणि समाजकार्य, त्यातील निष्ठा आणि भावना यातील नेमकेपणही एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून दाखवून दिले.

१९७५ला आणीबाणी जाहीर झाली. ‘मिसा’चा धाक सुरू झाला. चिंतूतात्या यांनी संपर्काचे काम करावयाचे ठरले. हा मानव मलकापूर येथे अनोळखी ठिकाणी राहून काम करीत होता. काय करायचा माहितीय? कुणाची बैलगाडीची वाहतूक कर, कोणाची बैलजोडी बाजारात ने, कोणाचे चाबूक विणून दे... नाना कळा या माणसाजवळ होत्या. हो आणि हे सर्व विनामूल्य बरं, त्या भागामधील त्यांचे चाहते त्यांची आठवण न काढतील तरच नवल!

चिंतूतात्या इतके फिरतात... मग जेवतात कुठे, झोपतात कुठे, असे प्रश्न नेहमीच पडायचे. जनसंघाच्या प्रचारकार्यात त्यांच्याबरोबर फिरताना मला उत्तर सापडले! सुपारी-तंबाखूची चंची आणि तीन-चार तांबे पाणी एवढ्या शिदोरीवर दोन-दोन दिवस राहायची त्यांची तयारी असे. गवताची गंजी हे झोपण्याचे आवडते ठिकाण! झोप झाली, की पुढच्या प्रवासाला लगेच बाहेर, असे त्यांचे जीवन मी पाहिले आहे. फिरस्ती-पान-तंबाखू मळण्याच्या प्रक्रियेतून चिंतूतात्यांनी अफाट जनसमुदाय जमविला आहे. या त्यांच्या परस्पर संवादाच्या यशस्वी माध्यमाला खरोखर मानले पाहिजे. आबालवृद्धांबरोबर त्यांचे मैत्रीचे संबंध होते आणि आजही आहेत. रत्नागिरी शहर सोडाच, पण तालुक्यामध्येही चिंतूतात्यांना ओळखत नाही असा कोणी नसेल.

चिंतूतात्यांच्या स्वभावातील अनेक पैलू सांगता येतील. त्यांना कोणा एका स्कूटरवाल्याने ठोकले. त्याची पूर्ण चौकशी करून त्यांनी त्याला घरपोच केले आणि स्वत: घरी आले तेव्हा त्यांना कळले, की त्यांचा पाय फ्रॅक्चर झालाय. बरे, हा अपघात वयाच्या ७७-७८व्या वर्षी झालेला; पण केवळ कणखर इच्छाशक्तीच्या जोरावरच चिंतूतात्या परत ‘फिट’ झाले. चिंतूतात्यांनी नि:स्वार्थी, निरलस जनसेवा हे उभ्या आयुष्याचे व्रत मानले आणि आपल्या साध्या आणि निगर्वी राहणीच्या स्वभावाने असंख्यांना आपलेसे केले. सौ. शोभनाकाकू त्यांच्या या परोपकारी आयुष्यात खंबीरपणे चिंतूतात्यांच्या मागे उभ्या राहिल्या. वयोमानानुसार ते घरबसल्या जमेल तेवढे, त्याच पद्धतीने आजही जीवन व्यतीत करीत आहेत. अशी माणसेच समाजामधील एकोपा, सामाजिक जाणीव आणि चांगुलपणा यांची जपणूक करीत असतात आणि म्हणूनच समाज चालतोय! याच जाणिवेतून त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात समाजसेवेचे व्रत कायम ठेवून दिलेली शैक्षणिक देणगी म्हणूनच तितकीच महत्त्वपूर्ण.

- अॅड. धनंजय जगन्नाथ भावे, रत्नागिरी
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vilas Kulkarni.Nemke About 184 Days ago
Nemke va rast likhan.
0
0

Select Language
Share Link
 
Search