Next
धुकाळलेली आंबोली
BOI
Wednesday, June 21, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this story


आंबोलीचा निसर्ग मोहून टाकणारा आहे. पावसाळा किंवा हिवाळ्याच्या दिवसांत इथे जाणं वेड लावणारं असतं. चहूबाजूला फुलून आलेला निसर्ग, हिरव्यागार पायवाटा, हिरवळीची शाल पांघरलेले डोंगर आणि धुक्याच्या दुलईमुळे मन प्रसन्न करणारं वातावरण, हे चित्रच भन्नाट असतं. ‘चला, भटकू या’च्या आजच्या भागात या धुकाळलेल्या आंबोलीची सफर...
.............
इंग्रजांनी केलेल्या चांगल्या कामांपैकी अजूनही आपल्या उपयोगी पडणाऱ्या काही गोष्टी आहेत, त्यापैकी मुख्य म्हणजे हिल स्टेशन्स. कामाच्या व्यापातून विरंगुळ्यासाठी उंचावरच्या थंड हवेच्या ठिकाणी जाऊन राहणं, त्यासाठी तिथला परिसर विकसित करणं आणि राहण्यासाठीच्या सुखसोयी निर्माण करणं, ही संकल्पना इंग्रजांनी खऱ्या अर्थानं रुजवली. त्यांनी विकसित केलेली ठिकाणं त्यांच्या कारकिर्दीनंतरही तशीच राहिली आणि आणखी लोकप्रिय झाली. आंबोली हे महाराष्ट्रातलं असंच एक थंड हवेचं झकास ठिकाण.

कुठल्याही मोसमात जावं आणि निसर्गाचा मनमुराद आस्वाद घ्यावा, अशा ठिकाणांपैकी हे एक. सावंतवाडी ते बेळगाव रस्त्यावर, सावंतवाडीपासून सुमारे ३० किलोमीटरवर असलेलं हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ६९० मीटर उंचीवर वसलेलं आहे. तत्कालीन सावंतवाडी संस्थानाची ही उन्हाळ्यातील राजधानी. या आंबोलीमध्ये अजूनही संस्थानकालीन भव्य इमारती पाहायला मिळतात. कोकण आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या या ठिकाणात कोकणाचं निसर्गसौंदर्य आणि घाटावरचं वातावरण, यांचा संगम दिसून येतो.

सावंतवाडीच्या बाहेर पडून घाटरस्ता सुरू झाला, की निसर्गाचं सौंदर्य डोळे दिपवून टाकतं. पावसाळ्याच्या काळात तर या डोंगरदऱ्या हिरवाईनं ओसंडून वाहत असतात. डोंगराच्या कड्यांवरून खोल दऱ्यांमध्ये भान हरपून स्वतःला झोकून देणारे धबधबे पाहताना डोळे तृप्त होतात. याच घाटरस्त्यात आंबोली गावाच्या अलीकडे उजवीकडे एक मोठा धबधबा लागतो, तोच आंबोलीचा धबधबा म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात इथे पाण्यात खेळण्यासाठी अक्षरशः झुंबड उडालेली असते. खासगी वाहनाने जाताना सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवून धबधब्याचा आनंद घेता येतो किंवा एसटीने प्रवास केल्यास वाटेत उतरूनही धबधब्यापर्यंत पोहोचता येतं; मात्र शक्यतो सुटीचा दिवस टाळून गेलेलं बरं. पावसाळ्यात धबधब्याचा प्रवाह प्रचंड असतो आणि त्याला वेगही असतो, त्यामुळे इथे खेळताना खूप काळजी घ्यावी लागते. रस्त्याच्या कडेलाच हा धबधबा असल्यामुळे उंचीची भीती मात्र नाही. म्हणूनच पर्यटकांची इथे कायम गर्दी असते.

फोटो : एमटीडीसी

आंबोलीचा निसर्ग मोहून टाकणारा आहे. पावसाळा किंवा हिवाळ्याच्या दिवसांत इथे जाणं वेड लावणारं असतं. चहूबाजूला फुलून आलेला निसर्ग, हिरव्यागार पायवाटा, हिरवळीची शाल पांघरलेले डोंगर आणि धुक्याच्या दुलईमुळे मन प्रसन्न करणारं वातावरण, हे चित्रच भन्नाट असतं. आंबोली हे गाव अगदीच छोटं आणि घाटमाथ्यावर असल्यामुळे गावाच्या आसपास अनेक प्रेक्षणीय ठिकाणं आहेत. हिरण्यकेशी नदीचं उगमस्थान असलेलं हिरण्यकेशी हे ठिकाण असंच आवर्जून पाहण्यासारखं. आंबोलीतूनच दाट जंगलाच्या दिशेने जाणारा साधारणतः तीन किलोमीटरचा रस्ता हिरण्यकेशीकडे घेऊन जातो. वाटेत दोन्ही बाजूंना पसरलेली शेतं आणि रस्त्याच्या कडेने वाहणारे छोटे ओहोळ लक्ष वेधून घेतात. रस्ता संपल्यावर एका छोट्या साकवावरून पलीकडं जावं लागतं. तिथून गेलं की हिरण्यकेशी मंदिर समोरच दिसतं. हाच त्या नदीचा उगम.  हिरण्यकेशी देवीमुळे या नदीचा उगम झाला आणि सात गुहांमधून ही नदी पृथ्वीच्या भेटीला येते, अशी आख्यायिका आहे. पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी हा परिसर हटकून धुक्यात बुडालेला असतो. त्यामुळे रस्त्याच्या कडेने आणि ओहोळ ओलांडून जातानाही सावधगिरी बाळगावी लागते. हिरण्यकेशीचा परिसर शांत आणि निसर्गरम्य आहे. देवळासमोर मोठं तळं असून, त्याच्या काठावर बसूनही खूप छान वेळ घालवता येतो. मुख्य रस्त्यापासून आत, वर्दळीपासून अलिप्त असलेलं हे ठिकाण मनाला अनोखी शांतता आणि जगण्यासाठी नवा उत्साह देतं.

आंबोलीत गेल्यानंतर आवर्जून पाहण्यासारखं आणखी एक ठिकाण म्हणजे नांगरतास धबधबा. आंबोलीपासून याचं अंतर साधारण आठ किलोमीटर आहे. उंचावरून खोल घळीत कोसळणारा हा धबधबा सुरक्षित अंतरावरून पाहता येतो. तिथे जाणाऱ्या पर्यटकांसाठी ‘एमटीडीसी’तर्फे गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. तिथून धबधब्याच्या उडणाऱ्या तुषारांचा मनसोक्त आनंदही घेता येतो. अर्थात, पावसाळ्यात इथे जाताना खबरदारी घेऊन जाणं आणि अतिउत्साहात धाडस न करणं नेहमीच हिताचं.

पर्यटकांचं आकर्षण असलेला कावळेशेत पॉइंटही अवश्य पाहण्यासारखा. सह्याद्रीचं रौद्र सौंदर्य म्हणजे काय, याचा अनुभव या ठिकाणी गेल्यावर येतो. वाऱ्याचा जोर मोठा असेल, तर इथे दरीत भिरकावलेली वस्तू खाली न जाता परत येते. अर्थात, म्हणून प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे फेकणं हा निव्वळ वेडेपणाच. इथेही ‘एमटीडीसी’ने भक्कम सुरक्षाकठडे बसवले आहेत. मर्यादेत राहून इथल्या निसर्गाचा आस्वाद घेतला, तर ही सहल अधिक आनंददायी होते. इथे वाऱ्याचा जोर प्रचंड असल्यामुळे, कधीकधी स्वतःचा तोल सावरतानाही त्रेधा उडते. या ठिकाणी दरीतून खाली पडणाऱ्या धबधब्याचे पाणी फवारा मारल्यासारखे उलट वर उसळते. प्रत्यक्ष धबधब्यात न भिजताही हा ओलाचिंब अनुभव घ्यायला मजा येते. धुकं असेल तर मात्र दरीचं दर्शन घडत नाही किंवा धुकं निवळण्याची वाट बघत बसावं लागतं. आंबोलीला महाराष्ट्राचं चेरापुंजी मानलं जातं. पावसाळ्यात इथे तुफान पाऊस पडतो. पावसाची वार्षिक सरासरी ७५० सेंटिमीटर आहे. त्यामुळे पावसाळ्यात भटकण्याच्या उद्देशाने जायचं असेल, तर हवामानाचा अंदाज घेऊन आणि मानसिक तयारी ठेवून गेलेलं उत्तम.

आंबोलीजवळच महादेवगड हा एक छोटा किल्ला आहे, त्याच्या माथ्यावर असलेला महादेवगड पॉइंट हेसुद्धा पर्यटकांचं आकर्षण आहे. सावंतवाडी संस्थानाच्या अण्णासाहेब फोंड सावंतांनी बांधलेल्या या किल्ल्यावर आता कुठलेही अवशेष शिल्लक नाहीत; मात्र एकेकाळी इथे तटबंदी आणि बुरूज होते, असं सांगितलं जातं. पूर्वीच्या काळी कोकणातल्या मालवण, वेंगुर्ला, रेडी इत्यादी बंदरात उतरणारा माल घाटमाथ्यांवरील बाजारपेठांत जात असे. यापैकी पारपोली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी महादेवगड हा किल्ला बांधण्यात आला होता. आंबोली गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. महादेवगड पॉइंटवरून दिसणारा निसर्ग अप्रतिम आहे. इथून सूर्यास्तही पाहता येतो. 

आंबोलीच्या पायथ्याशी वसलेल्या दाणोली येथे शिर्डीच्या साईबाबांचे समकालीन असलेल्या साटम महाराजांची समाधी आहे. आंबोलीत राहण्यासाठी ‘एमटीडीसी’च्या विश्रांतीगृहासह इतर अनेक उत्तम हॉटेल्स आणि गेस्ट हाउस आहेत. 


कसं जायचं?
मुंबईपासून अंतर : ५४९ किलोमीटर
पुण्यापासून आजरामार्गे अंतर : ३९० किलोमीटर
रत्नागिरीहून आंबोली : २१५ किलोमीटर
जवळचं रेल्वेस्थानक : सावंतवाडी (सुमारे ४० किलोमीटर) किंवा बेळगाव (६४ किलोमीटर)

- अभिजित पेंढारकर
ई-मेल : abhi.pendharkar@gmail.com

(लेखक चित्रपट, दूरचित्रवाणी, कला आणि पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link