Next
विजय पाडळकर, मुकुंद टाकसाळे, म. वा. धोंड
BOI
Wednesday, October 04 | 04:00 AM
15 1 0
Share this story

‘मुझे लगता है, हिंदुस्तान की हर जुबान मे, सेनिमापर लिखने के लिए एक विजय पाडलकर की जरूरत है’ असं साक्षात गुलजारजींनी ज्यांच्याविषयी म्हटलं ते विजय पाडळकर, आजच्या घडीचे अत्यंत लोकप्रिय विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे आणि ज्येष्ठ समीक्षक म. वा. धोंड यांचा चार ऑक्टोबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा थोडक्यात परिचय...
..............

विजय पाडळकर 

चार ऑक्टोबर १९४८ रोजी बीडमध्ये जन्मलेले विजय पाडळकर हे चित्रपट आणि साहित्य विषयावर लिहिणारे एक अत्यंत अभ्यासू आणि लोकप्रिय लेखक-समीक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांचं पुस्तकांवर प्रेम आहे, त्यांना साहित्यिकांबद्दल प्रेम आहे आणि मुख्य म्हणजे सिनेमा आणि दिग्दर्शकांबद्दल त्यांना विशेष आत्मीयता आहे आणि ते त्यांच्या लिखाणातून स्पष्ट जाणवतं. 

ज्या वाचकांना सिनेमा या विषयात रस असतो आणि सिनेमा हा ज्यांच्या अभ्यासाचा विषय असतो त्यांना विजय पाडळकरांचं लेखन वाचणं महत्त्वाचं ठरतं, इतका त्यांचा त्याविषयीचा अभ्यास आहे. उदाहरणार्थ, अकिरा कुरासोवा यांच्या ‘राशोमान’ सिनेमावर त्यांनी ‘गर्द रानात भर दुपारी’ हे एक स्वतंत्र पुस्तकच लिहिलं आहे. साक्षात गुलजार यांनी पाडळकरांच्या ‘गंगा आये कहां से’च्या प्रस्तावनेत म्हटलंय, ‘मुझे लगता है, हिंदुस्तान की हर जुबान में, सेनिमापर लिखने के लिए एक विजय पाडलकर की जरुरत है!’ त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार आणि नरहर कुरुंदकर पुरस्कार मिळाले आहेत.

अल्पसंख्य, सिनेमायाचे जादूगार, देखिला अक्षरांचा मेळावा, गगन समुद्री बिंबले, मोरखुणा, मृगजळाची तळी, पाखराची वाट, शेक्सपियर आणि सिनेमा, वाटेवरले सोबती, येरझारा, आंधी, बखर गीतकारांची, चंद्रावेगळं चांदणं, सिनेमाचे दिवस – पुन्हा, देवदास ते भुवनशोम, एक स्वप्न पुन्हा पुन्हा, कवडसे पकडणारा कलावंत, रावीपार, उमराव जान अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. विजय पाडळकर यांची आणि त्यांच्या साहित्याची समग्र माहिती देणारी http://www.vijaypadalkar.com/ ही अधिकृत वेबसाइट अलीकडेच सुरू करण्यात आली आहे. पाडळकर यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी वाचकांना त्याचा नक्की उपयोग होईल.
..................

मुकुंद टाकसाळे

चार ऑक्टोबर १९५१ रोजी जन्मलेले मुकुंद टाकसाळे हे आजच्या घडीचे मराठीतले एक लोकप्रिय विनोदी साहित्यिक म्हणून ओळखले जातात. निर्मळ विनोद हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य. 

समकालीन समाजकारण आणि राजकारणावर चुरचुरीत भाष्य अशा प्रकारचं त्यांचं लेखन चांगलंच वाचकप्रिय आहे. ‘पुलं’वरच्या आत्यंतिक प्रेमापायी त्यांनी संपादित केलेला ‘पु. ल. नावाचे गारुड’ हा ग्रंथ म्हणजे ‘पुलं’विषयी काही वेगळं वाचण्यासाठी अवश्य वाचावा असाच.

महाराष्ट्र राज्याचे मराठी विनोदी साहित्याचे पुरस्कार, मराठी साहित्य परिषदेचा चिं. वि. जोशी पुरस्कार, जयवंत दळवी स्मृती पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 

.....................

मधुकर वासुदेव धोंड

चार ऑक्टोबर १९१४ रोजी जन्मलेले म. वा. धोंड हे मराठीतले ज्येष्ठ समीक्षक म्हणून ओळखले जातात. कोणत्याही विषयाचे विविध पैलू बारकाईने तपासून ते त्याचं विश्लेषण करीत आणि त्यावर त्यांचं अभ्यासपूर्ण लेखन असे. 

मराठी वाङ्मयकोशाच्या संपादनात त्यांचा सहभाग होता. ‘ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी’ या त्यांच्या पुस्तकाला १९९७ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला होता. 

ऐसा विटेवर देव कोठे, काव्याची भाषणे, मऱ्हाटी लावणी, ज्ञानेश्वरी - स्वरूप, तत्त्वज्ञान आणि काव्य, चन्द्र चवथीचा, जाळीतील चंद्र असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

पाच डिसेंबर २००५ रोजी त्यांचं मुंबईमध्ये निधन झालं.
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link