मुंबई : एकोणीस अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या, महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडच्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने (एफईएस) मार्च २०१८मधील ट्रॅक्टरविक्रीची आकडेवारी दोन एप्रिलला जाहीर केली.
मार्च २०१८मध्ये देशांतर्गत विक्री २६ हजार ९५८ युनिटची झाली. मार्च २०१७मध्ये ती १७ हजार ९७३ युनिट होती. फेब्रुवारी २०१८मध्ये एकूण ट्रॅक्टरविक्री (देशांतर्गत+निर्यात) २८ हजार २७७ युनिट इतकी झाली. गत वर्षी याच काळात ती १९ हजार ३३७ युनिट होती. फेब्रुवारीमध्ये एक हजार ३१९ युनिटची निर्यात करण्यात आली.
डिसेंबरमधील कामगिरीविषयी बोलताना ‘महिंद्रा’चे फार्म इक्विपमेंट अध्यक्ष राजेश जेजुरीकर म्हणाले, ‘आम्ही २०१८ या संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये तीन लाखांहून अधिक ट्रॅक्टरची विक्री करून नवा मैलाचा टप्पा निर्माण केला. मार्च २०१८ मध्ये २६ हजार ९५८ ट्रॅक्टरची देशांतर्गत विक्री झाली. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ही संख्या ५० टक्के अधिक आहे. चौथ्या तिमाहीमध्ये चांगली गती मिळाली आहे आणि ती नव्या वर्षातही कायम राहील, अशी अपेक्षा आहे. निर्यातीच्या बाबतीत आम्ही महिन्यात एक हजार ३१९ ट्रॅक्टरची विक्री केली.’
‘महिंद्रा’विषयी :कंपनीचा नेहमीच प्रयत्न असतो की, ग्रामीण भागात भरभराट झाली पाहिजे, शहरातील जीवनशैली सुधारली पाहिजे आणि व्यवसायाची कार्यक्षमता वाढली पाहिजे. त्यामुळे लोकांना चालना मिळून त्यांचा विकास होईल. समूह भारतात युटिलिटी व्हेइकल्स, माहिती तंत्रज्ञान, वित्तीय सेवा व व्हेकेशन ओनरशिपमध्ये आघाडीच्या स्थानी आहे व व्हॉल्युमच्याबाबतीत जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपनी आहे.
कृषीव्यवसाय, एअरोस्पेस, कम्पोनंट्स, सल्ला सेवा, संरक्षण, ऊर्जा, औद्योगिक उपकरणे, लॉजिस्टिक्स, रिअल इस्टेट, स्टील, रिटेल, व्यावसायिक वाहने व दुचाकी व्यवसायांतही अग्रेसर आहे. मुंबईत मुख्यालय असलेल्या महिंद्रामध्ये १०० देशांत अंदाजे २४० हजार कर्मचारी आहेत.