Next
‘पीएमपी’ला लाभले सक्षम ‘सारथी’
BOI
Thursday, March 30, 2017 | 11:19 AM
15 1 0
Share this article:

तुकाराम मुंढेपुणे : कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या रूपाने पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) अखेर पूर्णवेळ अध्यक्ष मिळाले आहेत. प्रवाशांना केंद्रस्थानी ठेवून ‘पीएमपी’च्या कारभारात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी २९ मार्च रोजी कारभार स्वीकारल्यावर दिली. 

पीएमपी ही लिमिटेड कंपनी असल्यामुळे कंपनीप्रमाणे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून कारभार केला जाईल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘पीएमपी’च्या सध्याच्या अवस्थेचा पूर्ण अभ्यास करून मग उपाययोजनांबद्दल विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  रोजची प्रवासी संख्या ११ लाख असूनही पीएमपी तोट्यात का, याचा अभ्यास करावा लागणार असल्याचे ते म्हणाले. ‘पीएमपी’तील त्रुटी दूर करून प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असेही त्यांनी सांगितले. 

आपल्या कामाची चुणूक त्यांनी पहिल्याच दिवशी दाखवून दिली. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी काही तासांतच कर्मचाऱ्यांसाठी काही नियम घालून दिले आहेत. कामावर असताना गणवेशाची सक्ती, केस-दाढी नीटनेटकी, कामाच्या वेळेत बाहेर जाण्यास बंदी अशा काही नियमांचा त्यात समावेश आहे. सध्या सर्व कर्मचारी सातच तास काम करतात आणि शिवाय अर्धा तास जेवणाची सुट्टी असल्याने कामाचे तास साडेसहाच असतात. हे लक्षात घेऊन मुंढे यांनी कामाची वेळ सकाळी पावणेदहा ते सायंकाळी पावणेसहा अशी केली आहे. एका पत्रकाराने फेसबुकवर केलेल्या पोस्टनुसार, मुंढे यांनी ‘पीएमपी’च्या कॉल सेंटरला फोन लावला. तो तीन वेळा वाजून गेल्यानंतर उचलला गेला. मुंढे यांनी संबंधित अधिकाऱ्याला समज दिली. अशा रीतीने शेकडो समस्या असलेल्या ‘पीएमपी’चा गाडा हाकण्यास मुंढे यांनी सुरुवात केल्यानंतर त्या समस्या सुटतील, अशी आशा पुणेकर बाळगून आहेत. 

कोण आहेत मुंढे?
बीडमधील तडसोना हे तुकाराम मुंढे यांचे जन्मगाव. त्यांचे वडील एक सर्वसामान्य शेतकरी असूनही त्यांनी तुकाराम यांना उत्तम शिक्षण मिळण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. तुकाराम यांच्या बुद्धीची झलक लहानपणापासूनच दिसत होती. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन नंतर ते औरंगाबादला गेले. तेथेच त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. २००५मध्ये ते नागरी सेवांमधून ‘यूपीएससी’ची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि महाराष्ट्र केडरमधून आयएएस अधिकारी बनले. आयएएस अधिकारी बनल्यापासून जिथे जिथे त्यांचे पोस्टिंग झाले, तिथे तिथे त्यांनी त्यांच्या कामाचा चांगला ठसा उमटवला आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात कडक पवित्रा स्वीकारून सरकारी कार्यालयांतील कार्यसंस्कृती सुधारण्याचा जणू वसाच त्यांनी घेतला. त्यामुळे साहजिकच ते व्यवस्थेतील अनेकांच्या रोषाचे धनी बनले; मात्र नागरिकांचा त्यांना पाठिंबाच मिळाला. त्यांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता आपल्या कामाचा धडाका सुरूच ठेवला. 

पुण्यात येण्यापूर्वी एप्रिल २०१६पासून ते नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते. तिथेही त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात मोठी मोहीम राबवली. खासकरून अनधिकृत बांधकामांविरोधात त्यांनी शस्त्र उगारले. त्यांच्या या मोहिमेला राजकीय नेत्यांकडून कडाडून विरोध झाला. गेल्या ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबई महापालिकेत त्यांच्या विरोधात अविश्वास ठरावही मंजूर झाला. राज्य सरकारमधील घटक पक्ष असलेली शिवसेनाही मुंढे यांना हटवण्यासाठी आग्रही होती; मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंढे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आणि त्यांनी ‘नवी मुंबईला अशा प्रामाणिक, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची गरज आहे,’ असे सांगून मुंढेंच्या बदलीस नकार दिला. नवी मुंबईतील नागरिकांनी ‘सेव्ह मुंढे’ अशा मोहिमाही सोशल मीडियावर राबवल्या होत्या. 

मुंढे लोकप्रतिनिधींचा योग्य तो मान राखत नसल्याची तक्रार अनेकांनी केली होती. त्या तक्रारीची मात्र फडणवीस यांनी दखल घेतली आणि लोकशाहीत लोकप्रतिनिधींचा योग्य तो मान राखला गेला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्याआधी नागपूर आणि सोलापूर जिल्ह्यातील त्यांच्या नियुक्तीवेळीही मुंढे यांना राजकीय नेत्यांच्या रोषाला असेच सामोरे जावे लागले होते. ऑक्टोबरमध्ये फडणवीस मुंढे यांच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे त्यांची बदली एवढ्यात होणार नाही, असे वाटत असतानाच सहा दिवसांपूर्वी त्यांच्या बदलीचा आदेश निघाला. त्यानंतर पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी तातडीने हालचाली करून फडणवीस यांना पत्र पाठवून मुंढे यांची ‘पीएमपी’च्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली. त्यानुसार अखेर मुंढे पुण्यात दाखल झाले. मुंढेंच्या बदलीमुळे नवी मुंबईतील नागरिक नाराज झाले असले, तरी पुणेकर मात्र आनंदले आहेत. त्यांच्या धडक मोहिमेत कोणी आडकाठी आणली नाही आणि त्यांचा कार्यकाळ पूर्ण होऊ शकला, तर नक्कीच ‘पीएमपी’ला चांगले दिवस येतील, असे वाटते.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search