Next
नवी मुंबई, माळशेज घाट आणि मुरबाड
BOI
Saturday, July 27, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

गोरक्षगडावरील कोरीव पायरीमार्ग‘करू या देशाटन’ सदराच्या मागील भागात आपण ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीच्या दक्षिण, पश्चिम किनाऱ्यावरील गायमुखापर्यंतच्या ठिकाणांची माहिती घेतली. आजच्या भागात पाहू या ठाण्याच्या पूर्व भागातील ठिकाणे, नवी मुंबई, माळशेज घाट आणि मुरबाड...
........
गॅमन ब्रिजच्या अलीकडे उल्हास नदी दक्षिणेकडून घारापुरी, नवी मुंबई, वाशी, घणसोली, कळव्याकडून येऊन खाडीला मिळते. ही खाडी व पूर्वेकडील डोंगर म्हणजेच पारसिक हिल. डोंगर आणि खाडी यामधील पट्ट्यामध्ये नवी मुंबई पनवेलपर्यंत विस्तारली आहे. 

पारसिक हिल : कळवा खाडी ओलांडल्यावर पारसिकनगर भाग येतो. येथे पूर्वी पारशी लोकांची वसाहत होती. असे म्हणतात, की पारसी लोक वसई भागात राहत होते. तेथे पोर्तुगीज आल्यावर त्यांनी धर्मांतर करण्याचे सुचविले. त्या वेळी पारशी लोकांनी विचार करण्यास वेळ मागून घेतला व ते वसई सोडून या ठिकाणी येऊन राहिले. इंग्रज सत्तेवर आल्यावर ते पुन्हा वसईला परतले; मात्र या भागाला पारसिकनगर व बाजूला असलेल्या डोंगराला ‘पारसिकहिल’ असे नाव पडले. पारसिक बोगद्यापासून कोकण भवनपर्यंत असलेल्या डोंगरास ‘पारसिक हिल’ असे नाव आहे. नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्याला या डोंगराची पार्श्वभूमी आहे. डोंगरावर दोन्ही बाजूला सुरेख जंगल आहे. महापे गावाजवळ ‘गाविलदेव’ पक्षी निरीक्षण मनोराही आहे. नवी मुंबईच्या महापौरांचे अधिकृत निवासस्थानदेखील टेकडीच्या वर आहे. दोन्ही बाजूला तीव्र उत्तर असलेला हा डोंगर आहे. या डोंगरावर पूर्व बाजूला मुंबादेवीचे मंदिर आहे. पावसाळ्यात पारसिक हिल नवी मुंबईची शोभा वाढवतो. पावसाळ्यात डोंगरातून येणारे धबधबे हिरवाईवर अधिकच खुलून दिसतात. 

पारसिक बोगदा

पारसिक बोगदा :
मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर जो पहिला बोगदा लागतो, तो पारसिक बोगदा याचा नावाने ओळखला जातो. हा भारतातील रेल्वेचा पहिला बोगदा आहे. यामुळे ठाणे ते दिवा हे अंतर कमी झाले. हा बोगदा १.३१७ किलोमीटर लांब आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यावेळी हा बोगदा उडवून देण्याचा कट रचला गेला होता. या कटात मारुतीकुमार, मोरेश्वर नाचणे, रमेश चिटणीस, काशिनाथ कोळी, पशुपतिनाथ करोडिया, कृष्णकुमार त्रिवेदी इत्यादी क्रांतिकारक सामील होते; पण टॅक्सी ड्रायव्हरच्या फितुरीमुळे इंग्रजांनी सापळा रचून या सर्वांना अटक केली होती. 

पारसिक किल्ला : अस्तित्वच न राहिलेला, इतिहासानेही फारशी दाखल न घेतलेला हा किल्ला पारसिक बोगद्याजवळ खाडीच्या बाजूला होता. कल्याणजवळील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या दुर्गाडी किल्ल्याला शह देण्यासाठी पोर्तुगीजांनी येथे हा किल्ला बांधला होता. खरे तर येथे शिवाजी महाराजांनी किल्ला बांधायचे ठरविले होते व त्या दृष्टीने तयारी सुरू करताच पोर्तुगीजांनी या ठिकाणी हल्ला करून जागा ताब्यात घेतली व त्यांनीच हा किल्ला बांधला. वसई खाडीतून कल्याणपर्यंत गलबताने व तेथून पुढे नाणेघाटातून देशावर जाणाऱ्या व्यापारी मार्गातील वसई खाडीवर नियंत्रण असावे, यासाठी त्या वेळी सत्ताधीशांची धडपड असायची. त्यातूनच वसईपासून कल्याणपर्यंत खाडीकिनाऱ्याने किल्ल्यांची निर्मिती झाली. त्यापैकीच अस्तित्व नसलेला पारसिक किल्ला फक्त आठवणीत तरी राहायला हवा. 

येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या सैन्याची पोर्तुगीजांबरोबर चकमक झाली होती. सन १७३७मध्ये वसई मोहिमेच्या वेळी चिमाजी अप्पांनी ठाण्याचे सुभेदार रामजी बिवलकर, सरदेशपांडे, अंताजी रघुनाथ कावळे आणि अंजूरचे वतनदार गंगाजी नाईक यांच्याकडे या किल्याची मोहीम सोपविली. त्यांनी दोन दिवसांतच हा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर हा किल्ला १८१८मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला. पुणे-मुंबई रेल्वेचे काम सुरू झाल्यावर या किल्ल्यातील अवशेषांचे दगड पारसिक बोगद्यासाठी वापरले गेले आणि किल्ल्याचे अस्तित्वच संपले. इ. स. १९०३पर्यंत ब्रिटिशांच्या येथे पागा होत्या. इ. स. १९०३पर्यंत कलेक्टर, इंग्रज अधिकारी, सार्जंट यांची घरे आणि घोड्याच्या पागा होत्या. १९६५ साली प्रसिद्ध सिनेअभिनेत्री नूतन हिचे पती श्री. बहल यांनी येथे बंगला बांधला. १९०७ साली कै. श्री. चिंतामण गं. गोगटे यांनी लिहिलेल्या ‘महाराष्ट्रातील किल्ले’ या पुस्तकात पारसिक किल्ल्याबाबत उल्लेख आहे. सदाशिव टेटविलकर यांनी या किल्ल्याचा बऱ्यापैकी अभ्यास केला आहे. त्यांनी मिस्ट्री ऑफ दी पारसिक फोर्ट या त्यांच्या ब्लॉगमध्ये छान माहिती दिली आहे. 

नवी मुंबई महानगरपालिका : मुंबईवरील ताण कमी करण्यासाठी सन १९७०मध्ये ‘सिडको’ची स्थापना करण्यात येऊन औद्योगिक वसाहती व त्या अनुषंगाने निवासी वसाहती उभारण्यात आल्या. काही प्रशासकीय कार्यालये कोकण भवनामध्ये हलविण्यात आली. ठाण्यामधील कळव्यापासून पनवेल खाडीपर्यंत हे नवीन शहर विकसित करण्यात आले. याच भागात नवी मुंबई महानगरपालिकेची १७ डिसेंबर १९९१ रोजी स्थापना करण्यात आली. त्या वेळी ‘सिडको’मधील २९ गावे तिच्या अखत्यारीत होती. 

९८ टक्के लोकसंख्या शिक्षित असणारे भारतातील हे पहिले शहर ठरले आहे. या शहरात २२८ प्राथमिक, १४१ माध्यमिक, ६२ उच्च माध्यमिक शाळा, बारा पदवी, चार डीएड, १८ इंजिनीअरिंग, पाच पॉलिटेक्निक, सात शिपिंग, १२ नर्सिंग, तीन फार्मसी, तीन माहिती तंत्रज्ञान, १२ मॅनेजमेंट, चार हॉटेल मॅनेजमेंट, तीन विधी, तीन संगणक तंत्रज्ञान, तीन वास्तुविशारद, तीन मेडिकल, पाच डेंटल, दोन आयुर्वेद, दोन संशोधन आणि सात सर्वसाधारण महाविद्यालये आहेत. याशिवाय सीबीएसई व आयसीएसई अशी डझनभर विद्यालये आहेत. डी. वाय. पाटील स्टेडियम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम येथे असून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मॅचेस खेळविल्या जातात. पनवेलहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या मार्गावर अद्ययावत रेल्वे स्थानकेही आहेत. नवी मुंबईसाठी नव्याने विमानतळही लवकरच होत आहे. 

मुंब्रा डोंगर

मुंबादेवी :
ठाणे-पुणे महामार्गावर पारसिक डोंगराच्या कडेला उल्हास नदी व देसाई खाडीच्या संगमाजवळ मुंब्रा आणि कौसा ही जोडगावे आहेत. प्रसिद्ध मुंबादेवीचे मंदिर गावाच्या पश्चिमेला असून, देवीच्या नावावरून मुंब्रा ही गावाची ओळख झाली आहे. मुंब्रा व कौसा येथे कौसा जामा मशीद, सुन्नी जामा मशीद, सुन्नींर मशीद या हमरस्त्याजवळ असलेल्या मशिदी आहेत. कौसा येथे एक सुंदर तलावही आहे. ८० टक्के मुस्लिम वस्ती असलेल्या या गावात प्रामुख्याने कोळी व आगरी समाजाची वस्ती होती. फार पूर्वीपासून हा गाव गलबते बांधण्यासाठी प्रसिद्ध आहे. १९७५पर्यंत हा भाग शेतीने व्यापलेला होता. त्यानंतर याचे झपाट्याने नागरीकरण झाले. येथील देसाई खाडी व उल्हास नदी यांच्यामुळे एक वेगळेच सौंदर्य या ठिकाणाला लाभले आहे. खाडीच्या किनाऱ्यावरून मोठ्या संख्येने उडणारे पक्ष्यांचे थवे लक्ष वेधून घेतात. खाडीच्या बाजूने असलेल्या खारफुटीच्या जंगलामुळे खाडीच्या सौंदर्यात भर पडली आहे. खाडीमध्ये छोटी बेटे तयार झाली आहेत व त्यावर असलेल्या खारफुटी जंगलामुळे खाडी अधिकच सुंदर दिसते. 

मुंबादेवी

मुंबादेवीचे मंदिर साधारण ६८८ फूट उंचीवर पारसिक हिलच्या एका कातळाच्या खाली आहे. साधारण ३०० वर्षांपूर्वी हे मंदिर स्थापन झाले असावे. पूर्वी पाऊलवाट होती. आता सुमारे एक हजार पायऱ्या चढून जाता येते. मुंबादेवी ही कोळी बांधवांची कुलदेवता असून, मुंबादेवी, सिद्धिमंत्री, कालरात्री, चंद्रघटा, महागौरी, कात्यायनी, स्कंदमाता, शैलपुत्री, कूष्मांडा अशा नऊ देवी येथे वास करून राहिल्या आहेत. या मंदिरापासून मुंब्रा गाव व उल्हास नदीचे विहंगम दृश्य दिसते. 

मलंगगड

मलंगगड :
माथेरानच्या डोंगररांगेतील पेब आणि चंदेरी किल्ल्याच्या पश्चिमेला मलंगगड आहे. या किल्ल्यांची माहिती आपण रायगड जिल्ह्याच्या फेरफटक्यात पाहिली होती. माथेरानच्या डोंगररांगेतील पशचिमेकडील ठिकाण म्हणजे मलंगगड. हा किल्ला शिलाहार राजावटीत बांधला असावा. मलंगगड हे धार्मिक स्थान श्री मलंग किंवा हाजी मलंग या नावाने ओळखले जाते. येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर आहे. याच मंदिरातील मच्छिंद्रनाथ यांच्या समाधीला हाजीमलंग असेही म्हणतात. दर पौर्णिमेला या समाधीची आरती होते व समाधीवर भगवे वस्त्र अर्पण केले जाते. या ठिकाणच्या मालकीवरून दोन समाजात वाद आहे. पर्यटनाच्या व इतिहासाच्या दृष्टीने आपण याकडे पाहू. 

हाजी मलंग

हा किल्ला कल्याण परिसरातील महत्त्वाचा किल्ला असल्याने इंग्रज व मराठे यांच्यात या किल्ल्यावर वर्चस्व राखण्यासाठी स्पर्धा होती. वर्ष १७८०मध्ये ॲबिंग्डन या इंग्रजी अधिकाऱ्याने मलंगगडाला वेढा घातला. या किल्ल्याच्या उत्तर-पूर्व बाजूला माळशेज घाट व दक्षिण पूर्व बाजूला बोरघाट आहे. त्यामुळे दोन्ही व्यापारी मार्गावर पूर्वीपासून याला महत्त्व होते. इंग्रज सैन्याने वेढा घातल्याने गडावरील लोकांची उपासमार होऊ लागली. त्या वेळी नाना फडणवीसांनी काही सरदारांना हाताशी घेऊन मोठी फौज जमा केली आणि मलंगगड व वसईवर धाडली. स्वतः नाना व हरिपंत फडके दहा हजार फौजेसह खंडाळ्याला आले. सुरुवातीला त्यांनाही यश येत नव्हते. आणखी कुमक येत आहे हे कळताच इंग्रजांनी काढता पाय घेतला. किल्ल्यावरून दक्षिण- पश्चिम-उत्तर बाजूचे विहंगम दृश्य दिसते. येथे लवकरच रोपवे होणार असल्याने भाविकांची व पर्यटकांची पायपीट कमी होणार आहे. 

गोरक्षगड, मच्छिंद्रगड (फोटो : विकिपीडिया)

बारवीगोरक्षगड, मच्छिंद्रगड : गोरक्षगड हा घाटवाटांवर नजर ठेवणारा किल्ला सुमारे २१३५ फूट उंचीवर आहे. या दोन्ही किल्ल्यांना कोणतेही किल्ल्याचे स्वरूप नाही. ही दोन्ही ठिकाणे ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी आहेत. अवघड असूनही देखणा आहे. गोरक्षगडावर चहूबाजूंनी तुटलेले उभे कातळकडे आहेत, गुंफा आहेत, सातकर्णी काळातील कोरीव शिल्पकृती आहे, शिलालेख आहेत, खडकात खोदलेली पाण्याची टाकी आहेत, भुयारी जिने आहेत, नभ चुंबणारा शिखरमाथा आहे, त्यावर गोरखनाथांची समाधी आहे. तेथील जंगलात अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत. सरपटणारे अनेक प्रकारचे प्राणी आहेत. म्हसा गावापासून अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर गडांची ही जोडगोळी उभी आहे. 

बारवी धरण : मुरबाडच्या दक्षिणेस बारवी नदीवर हे धारण आहे. येथे पक्षी अभयारण्य आहे. 

भगीरथ फॉल, बेडीसगावभगीरथ फॉल, बेडीसगाव : नेरळ-बदलापूर मार्गावरील वांगणी गावापासून पदभ्रमंती करीत येथे जावे लागते. या छोटेखानी निसर्गरम्य धबधब्याखाली मनसोक्त आंघोळ करण्यासाठी झुंबड उडते. 

सिद्धगड : हा किल्ला मुरबाड तालुक्यात, भीमाशंकर अभयारण्याच्या क्षेत्रामध्ये आहे. येथील संपूर्ण परिसर जंगलमय झाला आहे. येथे विविध वनस्पतींचे अस्तित्व असून, त्यात अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतीही आहेत. येथे दक्षिण तटावर भैरवाचे स्थान आहे. स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर भाई कोतवाल व हिराजी पाटील या महान क्रांतिकारकांची ही बलिदानभूमी तरुणांसाठी स्फूर्तिस्थान आहे. दोन जानेवारी १९४३ रोजी क्रांतिकारक हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांना सिद्धगड किल्ल्याच्या पायथ्याशी वीरमरण आले होते. तेव्हापासून या ठिकाणाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. हे पदभ्रमंती करणाऱ्यांचे आवडते ठिकाण आहे. किल्ल्यावर जाणारी वाटपण बिकटच आहे. या किल्ल्याचा कालखंड निश्चित सांगता येत नसला, तरी या ठिकाणी बौद्धकालीन लेणी असल्याने याचे अस्तित्व दोन हजार वर्षांपासून असावे. 

सिद्धगड

आजोबापैठणकडे जाणारा व्यापारी मार्ग पुरातन काळापासून असल्याने याचे महत्त्व पूर्वी असणारच. छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्ष १६५७-५८मध्ये याचा ताबा घेतला होता. किल्ल्यावर उद्ध्वस्त वाड्यांचे अवशेष, सैनिकांच्या बराकी, धान्याची कोठारे, पाण्याची टाकी आहेत. यामुळे किल्ल्याचे महत्त्व लक्षात येते. गायधरा या पूर्वी वापरात असलेल्या मार्गाजवळच हा किल्ला आहे. त्या काळी व्यापारी या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘भिवाचा आखाडा’ येथे विश्रांतीसाठी थांबत होते. या किल्ल्यावर आजही एक तोफ आहे. पेशवे दफ्तरानुसार १७३४मध्ये मराठ्यांनी वसईच्या किल्ल्यावर स्वारी केली, तेव्हा सिद्धगडावर काही काळ सैनिक ठेवल्याची नोंद आहे. १८१८नंतर या किल्ल्यावर इंग्रजांनी तोफांचा मारा करून किल्ल्याचे अतोनात नुकसान केले. नंतरच्या काळात या किल्ल्याकडे दुर्लक्ष झाले; पण पर्यटकांची पावले आता इकडे वळु लागली आहेत. हा किल्ला म्हसा येथून २१ किलोमीटर अंतरावर आहे. 

आजोबाआजोबा : भंडारदरा धरणाच्या पश्चिमेला असलेल्या रतनगडाच्या दक्षिण प्रवेश बाजूला सह्याद्री डोंगररांगांमध्ये आजोबाचा पर्वत आहे. हे स्थळ देवस्थान आणि पर्यटनस्थळ म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. मुरबाड तालुक्याचे शेवटचे गाव वेळूक आणि आळवे येथून आजोबाच्या पर्वतावर जाता येते. सह्याद्रीच्या रांगेत रतनगड आणि हरिश्चंद्रगड यांच्या जवळ असलेला आजोबाचा डोंगर एखाद्या पुराणपुरुषासारखा दिसतो. या गडाची तीन हजार फूट उभी भिंत ही प्रस्तरारोहकांसाठी एक आव्हान व आगळेवेगळे लक्ष्य आहे. स्थानिक पुराणकथेनुसार, याच गडावर बसून वाल्मिकींनी रामायण लिहिले. याच गडावर सीतामाईने लव आणि कुश यांना जन्म दिला. लव आणि कुश वाल्मिकींना ‘आजोबा’ म्हणत असत. म्हणूनच या गडाचे नाव आजोबागड असे पडले. गडावर वाल्मिकींचा आश्रम व समाधी आहे. येथे गडावर राहण्यासाठी एक कुटी आहे. जवळच पाण्याचा झरा आहे. मुक्कामाचा कार्यक्रम असेल, तर जेवण तयार करूनच आणावे. वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळून गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी वाट नसल्याने आपल्याला मुक्काम आश्रमातच करावा लागतो. आश्रमाजवळून पुढे धबधब्याच्या वाटेने दीड-दोन तास चढून गेल्यावर एक गुहा लागते. येथे लव-कुशाच्या पादुका खडकात कोरलेल्या आहेत. येथे डावीकडे पाण्याचे एक टाकेसुद्धा आहे. या गुहेपर्यंत जाण्यासाठी लोखंडी शिड्यादेखील लावल्या आहेत. अनेक दुर्गवीर रतनगड - आजोबाचा गड - हरिश्चंद्रगड असा चार ते पाच दिवसांचा ट्रेक करतात. 

माळशेज घाट

माळशेज घाट :
निसर्गप्रेमींना खुणावणारा माळशेज घाट मुरबाड तालुक्यातून जातो. पावसाळ्यात घाटातील धबधबे, धुक्याची ओढणी, हिरवा शालू पांघरलेले डोंगर बघण्यासाठी पर्यटकांच्या गाड्या मुंबई, मुरबाडमार्गे तसेच पुण्याहून, नाशिकहून, नारायणगावमार्गे येतच असतात. पिंपळगाव धरणामुळे ‘रोहित पक्षी’ (फ्लेमिंगो) म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दर वर्षी या जलाशयात येतात. या घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात, तर घाटातील मुख्य भाग ठाणे जिल्ह्यात येतो. पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला घाट आहे. येथील तीन धारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे. या मार्गामुळे नगर, औरंगाबाद मुंबईला जवळ आले आहे. ब्रिटिश काळात कल्याण, मुरबाड, नगर रेल्वेमार्गाची योजना होती. आता पुन्हा या नवीन मार्गाची चाचपणी चालू आहे. 

कसे जाल मुरबाडकडे?
नाशिक, पुणे, नगरहून येण्यासाठी नारायणगाव, आळेफाटा, माळशेज घाटाकडून, तसेच मुंबईहून कल्याणमार्गे येता येते. जवळचे रेल्वे स्टेशन कल्याण व अंबरनाथ - ३१ किलोमीटर. मुरबाडमध्ये राहण्यासाठी साधी हॉटेल्स व आसपास रिसॉर्टस् आहेत. जवळचा विमानतळ मुंबई - ७३ किलोमीटर. 

(या भागातील माहितीसाठी अंबरनाथचे राजू सोनार यांचे सहकार्य मिळाले.)  

- माधव विद्वांस

ई-मेल : 
vidwansmadhav91@gmail.com

(लेखक हौशी आणि अभ्यासू पर्यटक आहेत. ‘करू या देशाटन’ या दर बुधवारी आणि शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेख https://goo.gl/nZb2n5 या लिंकवर उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप

गोरक्षगडावरील शिलालेख
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Mahesh Shambho Kalburge About 76 Days ago
अतीशय सुंदर शब्दांकन व समग्र सचित्र माहिती दिली आहे. आपण रोजच्यारोज अशी विविध ठिकाणांची माहिती देता त्यामुळे माहिती व ज्ञानात नक्कीच भर पडते.. आपल्या या सातत्याने चालू असलेल्या कामाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा..
0
0
Raju sonar About 80 Days ago
सुंदर महिती आहे नकाशे दिल्यास लेख समजण्यास वाचण्यास उत्तम होईल
0
0

Select Language
Share Link
 
Search