Next
‘वेद’ला राष्ट्रीय वर्चस्वाचे वेध
BOI
Friday, May 04 | 06:45 AM
15 0 0
Share this story


व्हॉलीबॉलमध्ये मक्तेदारी निर्माण करण्यासाठी सहा प्रकारच्या गोष्टी प्रत्येक खेळाडूला आत्मसात कराव्या लागतात. त्या वेदने खूपच लहान वयात आत्मसात केल्या आहेत. सर्व्हिस, पासिंग, सेट, आक्रमण, ब्लॉक आणि डिग यात वेदने कमालीचे वर्चस्व सिद्ध केले आहे... ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख पुण्यातील व्हॉलीबॉलपटू वेद शिंदेबद्दल...
................................................
व्हॉलीबॉलसारख्या सांघिक खेळातदेखील एखादा खेळाडू वैयक्तिक नैपुण्याच्या जोरावर अत्यंत लहान वयात मक्तेदारी निर्माण करतो, हे खरेच अविश्वसनीय आहे. पुण्याचा वेद शिंदे हा खेळाडू, ज्याने वयाच्या केवळ अकराव्या वर्षी बेस्ट डिफेंडर आणि बेस्ट स्मॅशर म्हणून पुण्यातील व्हॉलीबॉल क्षेत्राला आपली दखल घेण्यास भाग पाडले.

वयाच्या सातव्या वर्षी त्याने व्हॉलीबॉल खेळायला सुरुवात केली आणि केवळ पाच वर्षांच्या आतच त्याचे नाव शालेय, जिल्हा व राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धांमध्ये गाजू लागले. सिंबायोसिस शाळेत आता सातव्या इयत्तेत असलेला वेद खेळाबरोबरच अभ्यासातही हुशार आहे. सातत्याने ८० ते ८५ टक्के गुण मिळवत तो अभ्यासातही आपले कसब दाखवत आहे. म्हणूनच त्याचा सराव, स्पर्धा सहभाग यांवर घरातून कोणतेही बंधन आणले जात नाही. त्याचे वडीलही क्रिकेट खेळलेले असल्याने घरात क्रीडासंस्कृती रुजलेली आहेच.

सिंबायोसिस शाळा व्हॉलीबॉल या क्रीडाप्रकारात पुण्यात जबरदस्त वर्चस्व राखून आहे, त्यामुळे या शाळेत प्रवेश घेणारे बहुतांश विद्यार्थी याच खेळाकडे वळतात. तशीच वेदलाही या खेळाची गोडी लागली आणि हळूहळू हा खेळ त्याची पॅशन बनला. वयाच्या मानाने तो खूप उंच असल्याचा त्याला इथे दुहेरी फायदा होतो. एक तर डिफेन्ड करताना संपूर्ण कोर्ट कव्हर करता येते आणि उंचीमुळे जबरदस्त आणि बिनतोड स्मॅश मारता येतो. वेदची अंगकाठी सडपातळ असली, तरी त्याची चपळता वाखाणण्याजोगी आहे; मात्र मोठ्या स्तरावर खेळण्यासाठी त्याला आता शारीरिक ताकद आणि क्षमता वाढविण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. 

या खेळात सध्या त्याची सातत्यपूर्ण कामगिरी आहे आणि त्यासाठी त्याला बामणे सर आणि कोकरे सर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या सूचना व मार्गदर्शन कुठेही फोल जाणार नाही, याची काळजी वेद कोर्टवर घेतो आणि त्यातूनच आज तो यशस्वी ठरत आहे. सध्या तो बारा वर्षांखालील गटात खेळत असला, तरी या खेळातील त्याचे सातत्य आणि धडाडी पाहून त्याची शाळा त्याला जाणीवपूर्वक चौदा वर्षांखालील गटातही खेळवते. यातूनच त्याला मोठ्या मुलांबरोबर खेळण्याचा सरावही करता येतो आणि तसा अनुभवदेखील मिळतो. 

आत्तापर्यंत त्याने भरपूर पुरस्कार मिळवले आहेत. विभागीय स्पर्धांसाठीही त्याची सातत्याने निवड होते आणि आपल्या कामगिरीच्या जोरावर तो आपली निवड सार्थ ठरवत आला आहे. सासवड, बारामती, कोल्हापूर आणि पन्हाळा येथील स्पर्धा त्याने सांघिक खेळ असूनही वैयक्तिक कामगिरीवर गाजवल्या आहेत. पुण्यात होणाऱ्या जवळपास प्रत्येक स्पर्धेत तो सहभागी होतो. नुकत्याच झालेल्या ‘स्कूलिंपिक’मध्येही त्याने आपल्या खेळाच्या जोरावर शाळेच्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला होता. सुधीर फाटक आणि वैदेही फाटक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मिलेनियम शाळेने नुकत्याच घेतलेल्या जिल्हा मानांकन स्पर्धेतही सिंबायोसिस शाळेने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत वेदची कामगिरी सर्वाधिक लक्षवेधी ठरली होती. तो आता बारा वर्षांखालील गटाचा शालेय संघाचा कर्णधारही बनला आहे. 

रोज दोन ते चार तास सराव करणारा वेद यंदाच्या मोसमापासून जिल्हा परिषदेच्या वरच्या गटातील स्पर्धेतही सहभागी होईल. यापूर्वी तो बारा वर्षांखालील गटात दोन वेळा सहभागी झाला आहे आणि सर्वोत्तम खेळाडूही ठरला आहे. अमेरिकेत ज्या व्हॉलीबॉलचा पाया रचला गेला, त्या खेळात आता भारतीय खेळाडूही संथ गतीने का होईना, प्रगती करत आहेत. ही उज्ज्वल भवितव्याची नांदी ठरावी. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला बाल्यावस्थेत असलेला हा खेळ, पुढील सहा दशकांमध्ये इतका लोकप्रिय झाला, की १९६४ च्या ऑलिंपिकमध्ये अधिकृतरीत्या या खेळाचा समावेश करण्यात आला. वेदला या खेळात आणखी प्रगती करून राष्ट्रीय खेळाडू असा नावलौकिक मिळवायचा आहे.

व्हॉलीबॉलमध्ये मक्तेदारी निर्माण करण्यासाठी सहा प्रकारच्या गोष्टी प्रत्येक खेळाडूला आत्मसात कराव्या लागतात. त्या वेदने खूपच लहान वयात आत्मसात केल्या आहेत. सर्व्हिस, पासिंग, सेट, आक्रमण, ब्लॉक आणि डिग यात वेदने कमालीचे वर्चस्व सिद्ध केले आहे. त्याची उंची त्यासाठी खूपच लाभदायक ठरली आहे. अतिउच्च दर्जाच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे सामने वेद न चुकता पाहतो आणि त्यातून रोज काही ना काही नवीन शिकून त्याचा सराव करतो. खेळ कोणताही असो, इतकी मेहनत मैदानावर आणि मैदानाबाहेर जर कोणी खेळाडू करत असेल, तर त्याला राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू बनण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.

खेळासाठी दोन प्रकारचे प्रशिक्षण आवश्यक असते. एक म्हणजे सामन्यात खेळण्यासाठीचे प्रशिक्षण आणि दुसरे म्हणजे स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण. सध्या वेद हे दोन्हीही प्रकारचे प्रशिक्षण घेत आहे. अथक सराव आणि मेहनत, तसेच सातत्याने स्पर्धा सहभाग आणि त्यातील यश याच गोष्टी येत्या काळात वेदला असामान्य खेळाडू बनवतील. यातूनच त्याचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू बनण्याचे व देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरेल.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Gaurav Uttekar About 262 Days ago
Congratulations ved & keep it up....
0
0
naina nahar About 262 Days ago
congrates ved shinde...keep it up...
0
0
PARAG BHASKAR AHER About 262 Days ago
Congratulations & keep it up Ved....👏👏
0
0

Select Language
Share Link