Next
ये शाम की तनहाईयाँ...
BOI
Sunday, May 06, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

आपल्या अभिनयसामर्थ्याने रूपेरी पडदा गाजविणाऱ्या अभिनेत्री नर्गिस यांचा स्मृतिदिन (तीन मे) नुकताच होऊन गेला. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या ‘ये शाम की तनहाईयाँ...’ या नर्गिस यांच्यावर चित्रित झालेल्या गीताचा....
...........
‘तिचे’ मूळ नाव फातिमा रशिद असे होते. आणि सारे जण बालपणी तिला ‘बेबी’ असे म्हणत होते. तिची आई ‘जद्दनबाई’ १९३३पासून चित्रपटात कामे करत होती. बेबी चार वर्षांची असताना जद्दनबाई मुंबईत राहायला आली. तेथे सेंट मेरीज स्कूलमध्ये तिचे नाव घातले. शाळेत असताना एका नाटकात बेबीने काम केले. ते पाहून तिचे शिक्षक म्हणाले, ‘तुला अभिनय कधीही जमणार नाही. यापुढे तू अभिनय करण्याचा कधीही प्रयत्न करू नकोस.’

वाचकहो, कशी गंमत असते बघा! बालपणी ‘ज्या बेबीला’ अभिनय जमणार नाही असे सांगितले गेले, तीच मुलगी मोठेपणी ‘नर्गिस’ नावाने प्रसिद्ध होते आणि अभिनयाचे पुरस्कार केवळ भारतात नव्हे, तर परदेशातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतही मिळवते. काळ कसा बदलतो नाही का? आपण कॉलेजात जावे, शिकावे, डॉक्टर व्हावे हीच १०-१२ वर्षांच्या नर्गिसची इच्छा होती; पण नियतीला ते मंजूर नव्हते.

मुळात ती पाच वर्षांची असतानाच तिच्या आईच्या चित्रपटात बालकलाकार म्हणून ती पडद्यावर दिसली. ‘तलाश-ए-हक’ असे त्या चित्रपटाचे नाव होते. ‘बेबी रानी’ हे नाव तेव्हा तिला देण्यात आले होते व तिच्या त्या चित्रपटातील कामाबद्दल ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्रात लिहूनही आले होते. या चित्रपटाव्यतिरिक्त जद्दनबाईंच्या अन्य तीन चित्रपटांतही बालवयातील नर्गिसने काम केले होते.

१२-१३ वर्षांची नर्गिस छान दिसत होती. चित्रपट निर्माते मेहबूब हे नर्गिसच्या आईचे जुने मित्र! त्यांनी नर्गिसला पहिले आणि मेहबूब प्रोडक्शनच्या ‘तकदीर’ या चित्रपटासाठी नायिका म्हणून निवडले; पण नर्गिस त्यासाठी तयार नव्हती. तिला शिकायचे होते. डॉक्टर बनायचे होते; पण बऱ्याच प्रयत्नांनी तिचे मन वळवले गेले व ती सिनेमात काम करायला तयार झाली. मेहबूबनी तिचे मूळ नाव व बेबी रानी हे नाव बदलून ‘नर्गिस’ हे नाव ठेवले.

‘तकदीर’च्या घवघवीत यशानंतर नर्गिसने चित्रपटामध्येच कारकीर्द करण्याचे ठरवले. ‘अस्मत,’ ‘अनबन’, ‘हुमायूँ’, टरामायणी’, ‘मेहंदी’ असे चित्रपट मिळत गेले. ‘नर्गिस’ नावाच्याच एका चित्रपटात तीच नायिका होती. या सर्व कालावधीत ती एक स्टार बनली. त्यामुळेच १९४७मध्ये राज कपूरने ‘आग’ चित्रपटाच्या निर्मितीचे काम हाती घेतले, तेव्हा त्यामध्ये नर्गिसला घेण्याचा विचार झाला तेव्हा ‘ती एक बडी चित्रतारका असून, तिचे मानधन आपल्याला परवडणारे नाही,’ असे त्याला वाटले होते.

...पण राज कपूर-नर्गिस ही जोडी हिंदी चित्रपटसृष्टीत गाजवी ही नियतीची इच्छा होती. त्यामुळेच नर्गिसच्या आईचा विरोध असूनही दोघे एकत्र येत राहिले. १९४८-१९४९ या दोन वर्षांत नर्गिसच्या आई-वडिलांचे निधन झाले. आणि ‘बरसात’पासून नर्गिसने आर. के. स्टुडिओ हेच आपले विश्व मानले. त्या वेळी तिने मेहबूब यांना ‘आन’ चित्रपटात काम करण्याबद्दल नकार कळवला.

नंतर राज कपूरचा ‘आवारा’ आला. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक राज कपूर भारतात व भारताबाहेरही लोकप्रिय ठरला व त्यामुळे नर्गिसची लोकप्रियताही परदेशात पोहोचली. त्यानंतर अंदाज, मेला, बाबुल, जोगन, दीदार, हलचल असे चित्रपट तिने दिलीपकुमारबरोबरही केले. आर. के. चित्रसंस्थेच्या चित्रपटांव्यतिरिक्त राज कपूर व नर्गिस ही जोडी अंबर, अनहोनी, आशियाना, धून, पापी, चोरी चोरी अशा काही चित्रपटांतून दिसून आली होती.

अनहोनी चित्रपटातील नर्गिसचा डबल रोल (दुहेरी भूमिका) तिच्यामधील अभिनयसामर्थ्याचा एक वेगळा आविष्कार दाखवतो. ‘मदर इंडिया’तील तिची भूमिका तर माइलस्टोन बनून राहिली आहे. ‘मदर इंडिया’च्या चित्रीकरणाच्या वेळीच सुनील दत्त यांच्याबरोबर प्रेमरज्जूंनी नर्गिस बद्ध झाली. ११ मे १९५८ रोजी ते दोघे विवाहबंधनात बांधले गेले.

१९५८मध्येच ‘अदालत’, ‘लाजवंती’ आणि ‘घर संसार’ हे नर्गिसचे तीन चित्रपट प्रसिद्ध झाले! या काळात हातात असलेले चित्रपट पूर्ण करून तिने चित्रपट संन्यास घेतला. फक्त भावाचा चित्रपट म्हणून ‘रात और दिन’ या चित्रपटात तिने नंतर काम केले. १९६८मध्ये तो प्रदर्शित झाला. या अखेरच्या चित्रपटानंतर ती समाजापुढे ‘मिसेस दत्त’ म्हणून आली. सुनील दत्त यांच्या अजंता आर्टस् या चित्रसंस्थेचे कामकाज ती पाहू लागली. एकपात्री प्रयोगाचा ‘यादें’ चित्रपट सुनील दत्त यांनी निर्माण केला. त्याची कथाकल्पना खुद्द मिसेस दत्त यांची होती. त्या चित्रपटात ती आपल्या मुलांसोबत ‘सावली’ स्वरुपात दिसली. रूपेरी पडद्यावरचे तेच तिचे अखेरचे दर्शन!

चित्रपटात काम करायचे बंद केल्यानंतर नर्गिस एक गृहिणी बनली व नंतर एक समाजसेविका बनली. मंदबुद्धिग्रस्त मुलांची शाळा तिने सुरू केली. विविध संस्थांची कामे ती बघू लागली. तसेच चित्रपट उद्योगातील राज्यसभेची पहिली स्त्री सदस्य म्हणून तिची नेमणूक झाली होती. नंतरच्या काळात कर्करोगाने ग्रस्त झालेल्या नर्गिसला वाचवण्याची पराकाष्ठा सुनील दत्त यांनी केली. परंतु अखेर तीन मे १९८१ रोजी नर्गिसची जीवनयात्रा संपुष्टात आली. तीन मे रोजी झालेल्या नर्गिस यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कारकीर्दीचा हा धावता आढावा घेतल्यानंतर आपण त्यांच्यावर चित्रित झालेल्या अनेक मधुर गीतांपैकी एका गीताकडे वळू या!

नर्गिसचा विषय निघाला म्हणजे सर्वप्रथम आठवते ती ‘आह’मधील सर्वस्व अर्पून राजवर प्रेम करणारी ‘निलू’! नुसते पत्र पाठवून प्रत्यक्षात चेहरा न बघता, ‘जाने न नजर......’ गाणारी, खळाळणाऱ्या निर्झराप्रमाणे आनंदी असलेली ‘निलू’! राजची प्रत्यक्ष भेट झाल्यावर त्याच्यावर प्रेम करणारी ‘निलू’! राज भेटत नाही, त्याचे पत्रही येत नाही म्हणून व्याकुळ चेहऱ्याने त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली ‘निलू’! ती वाट बघते बघते अन् थकून जाते. राज येतच नाही. तो का नाही आला? अजून त्याची वाट किती दिवस पाहायची? कधी येणार तो, या प्रश्नांमध्ये गुरफटून गेलेली, विरहाच्या दुःखाने खचून गेलेली ती राजची प्रेयसी निलू दुःखाने सहजगत्या गुणगुणून जाते...

ये शाम की तनहाईयाँ, ऐसे में तेरा गम 
पत्ते काही खडके, हवा आयी तो चौंके हम 

सायंकाळ! कातरवेळ! तशी अस्वस्थ करणारीच असते. अख्खा दिवस ज्यांनी विरहाग्नीचे चटके खात काढला आहे, त्यांची या कातरवेळी होणारी अवस्था तर विचारूच नका! प्रिय व्यक्ती जवळ नसल्याने जाणवणारे एकाकीपण, त्याच्या विरहाचे दु:ख व तशात ही सायंकाळ! हवेमुळे, वाऱ्यामुळे झाडांची पाने अथवा रस्त्यावर पडलेली पाने जरी हलली, तरी त्यामुळे आवाज ऐकून वाटते, की तूच आलास (पण हाय रे दुर्दैवा, तू येतच नाहीस.)

जिस राह से तुम आने को थे, उसके निशान भी मिटने लगे 
आए ना तुम सौ सौ दफा, आए गए मौसम

तू येणाऱ्या वाटेवरच्या खुणाही आता नष्ट होत चालल्या आहेत. किंबहुना तुझ्या येण्याची आशाच आता संपुष्टात येऊ लागली आहे. एक ऋतु आला, गेला, दुसरा आला. ऋतूंचे बदल घडत आहेत, येणे-जाणे सुरू आहे; पण तू मात्र एकदाही आला नाहीस आणि मी मात्र -

सीने से लगा तेरी याद को, रोती रही मैं रातको 
हालत पे मेरी चाँद तारे, रो गए शबनम...

हे ऋतू बदलत आहेत आणि मी मात्र तुझ्या आठवणी हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवून रात्रभर रडत बसते. माझी ही अशी अवस्था बघून हा आकाशीचा चंद्रमा व तारे यांनीही अश्रु ढाळले व सकाळी त्या अश्रूंना जग दवबिंदू (शबनम) म्हणाले.

‘आह’च्या नायिकेचे या अवस्थेतील भाव व्यक्त करताना गीतकार शैलेंद्रने साध्या दोन-दोन ओळींत, पण समर्थ शब्दांत तिचे दुःख मांडले आहे. अखेरच्या ओळीत या प्रतिभासंपन्न कवीचा कल्पनाविलास उत्तुंग शिखर गाठतो. प्रियकराच्या आठवणीत रडणाऱ्या प्रेयसीच्या दु:खी अवस्थेमुळे तिला बघून चंद्र-ताऱ्यांनीही अश्रू ढाळले व जगाने त्या अश्रूंना दवबिंदू म्हटले, ही कल्पना म्हणजे शैलेंद्रमधील जातिवंत कवीचे थक्क करणारे दर्शन आहे.

या संपूर्ण गीताच्या आशयाप्रमाणे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांचा मधुर आणि व्याकुळ स्वर, त्याच्या जोडीला शंकर-जयकिशन यांच्या संगीताचा संथ ठेका, अप्रतिम चाल आणि संपूर्ण गीताच्या वेळी नर्गिस यांचा लाजवाब अभिनय! सारे सारेच सुनहरे!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search