Next
पुण्यातील हिंदुगर्जना चषक कुस्ती स्पर्धा यंदा राज्यस्तरीय
१५ ते १७ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत आयोजन
BOI
Wednesday, February 13, 2019 | 02:42 PM
15 0 0
Share this article:

२०१८च्या स्पर्धेतील विजेत्यांसह आयोजक धीरज घाटे

पुणे :
हिंदुगर्जना प्रतिष्ठान आणि साने गुरुजी तरुण मंडळाच्या वतीने हिंदुगर्जना चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाचे स्पर्धेचे तिसरे वर्ष आहे. आतापर्यंत ही स्पर्धा जिल्हा स्तरावरच आयोजित करण्यात येत होती. यंदा प्रथमच हिंदुगर्जना चषक कुस्ती स्पर्धेत राज्यभरातील खेळाडू सहभागी होणार आहेत.  १५, १६ आणि १७ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत पुण्यातील सारसबाग उद्यानाजवळील सणस स्पोर्टस् ग्राउंड येथे कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे. 

शुक्रवारी, १५ फेब्रुवारी रोजी दुपारी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन होईल आणि रविवारी, १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी खुल्या गटातील विजेतेपदाची कुस्ती आणि बक्षीस समारंभ असणार आहे. स्पर्धेमध्ये यंदा प्रथमच महिला गटाचे सामनेही खेळविण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी महिला कुस्तीपटूंचे केवळ प्रदर्शनीय सामने भरविले होते. आता महिलांसाठी स्वतंत्र स्पर्धा असणार आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि राष्ट्रकुल पदकविजेती रेश्मा माने हिने हिंदुगर्जना चषक कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे निश्चित केले आहे. 

स्पर्धेसाठी एकूण दहा लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. हिंदुगर्जना चषक कुस्ती स्पर्धेच्या विजेत्याला मानाची चांदीची गदा, बुलेट आणि दोन लाख रुपयांचा धनादेश असे पारितोषिक देण्यात येणार आहे. मुख्य गटातील उपविजेत्याला एक लाख रुपयांचा धनादेश आणि तृतीय क्रमांक विजेत्याला ५० हजार रुपयांचा धनादेश अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.

यंदा प्रथमच पार पडणाऱ्या महिलांच्या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला मानाची चांदीची गदा, अॅक्टिव्हा गाडी आणि एक लाख रुपयांचा धनादेश असे पारितोषिक देण्यात येणार आहे. उपविजेत्या महिला खेळाडूला ५१ हजार रुपयांचा धनादेश, तर तृतीय स्थानावरील महिला खेळाडूला २५ हजार रुपयांचा धनादेश पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे.

कुमार गटातील विजेत्याला चांदीची गदा आणि २५ हजार रुपयांचा धनादेश पारितोषिक म्हणून प्रदान करण्यात येणार आहे. उपविजेत्यालादहा हजार रुपयांचा धनादेश तर तृतीय स्थानावर राहिलेल्या मल्लाला पाच हजार रुपयांचा धनादेश दिला जाईल.

यंदा स्पर्धा राज्यस्तरावर आयोजित करण्यात आलेली असल्याने हिंदुगर्जना चषक कुस्तीची माहिती महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचावी, यासाठी हिंदुगर्जना प्रतिष्ठान आणि साने गुरुजी तरुण मंडळाचे जवळपास दीडशे कार्यकर्ते राज्यभर पोहोचले. दहा कार्यकर्त्यांची एक टीम अशा जवळपास पंधरा टीम तयार करण्यात आल्या होत्या. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नाशिक, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नगर, करमाळा, फलटण, ठाणे, मुंबई आणि रायगड आदी ठिकाणी या टीम आणि कार्यकर्ते पोहोचले. गावातील मान्यवर लोकप्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, आखाड्यांचे वस्ताद, नामवंत कुस्तीपटू, माजी महाराष्ट्र केसरी तसेच कुस्ती स्पर्धांचे विजेते पैलवान आदी सर्वांना त्यांनी स्पर्धेची माहिती दिली. त्यांना हिंदुगर्जना चषक कुस्ती स्पर्धेला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. 

कोल्हापूरचा मल्ल माऊली जमदाडे, राजगुरुनगरचा शिवराज राक्षे, गत वर्षीचा हिंदुगर्जना चषक विजेता मुन्ना झुंजुरके आणि कुमार गटामध्ये शुभम थोरात आदी मल्लांनी आखाड्यात उतरण्याचे ठरविले आहे. 

हिंदुगर्जना चषक स्पर्धेने कुस्ती स्पर्धेला एक वेगळा आयाम दिला आहे. पुणे शहरात कुस्तीसारख्या रांगड्या खेळाची लोकप्रियता वाढविण्यात, तसेच उत्सुकता निर्माण करण्यात हिंदुगर्जना चषक स्पर्धेची विशेष भूमिका आहे. कोणतेही वादविवाद न होता अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने स्पर्धा पार पडते. कुस्ती पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी विशेष व्यवस्था असल्यामुळे हजारो नागरिक स्पर्धेला उपस्थिती लावतात. गेल्या वर्षीपासून स्पर्धेचे यू-ट्यूबवरून थेट प्रक्षेपण (लाइव्ह टेलिकास्ट) केले जाते. त्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या कुस्तीप्रेमी मंडळींपर्यंत ही स्पर्धा पोहोचली आहे. लाखो रुपयांची घसघशीत बक्षिसे आणि मानाची चांदीची गदा यामुळे अनेक नावाजलेले मल्ल हिंदुगर्जना चषक कुस्ती स्पर्धेमध्ये मैदानात उतरतात. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search