Next
अक्षरमित्र आमीर रसूल शेखची सुहानी सफर.....!
BOI
Thursday, February 14, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यात जन्मलेला आमीर रसूल शेख हा हुशार विद्यार्थी... त्यानं डॉक्टर व्हावं अशी त्याच्या कुटुंबीयांची इच्छा असते. तिथे प्रवेश मिळाला नाही म्हणून तो इंजिनीअरिंगला गेला... मात्र पुस्तकं सापडली आणि आयुष्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. इंजिनीअरिंग सोडून त्याने समाजात वाचनाची गोडी रुजवण्यासाठी ‘अक्षरमित्र’ नावाचा उपक्रम सुरू केला. माणसं वाचण्यासाठी, देश पाहण्यासाठी सायकलवरून प्रवास केला. ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात आज या अनोख्या व्यक्तिमत्त्वाबद्दल...
...........
आमीर रसूल शेख हा मला भेटलेला एक अनोखा तरुण! दिसायला स्मार्ट, वागायला अतिशय विनयशील आणि पुस्तकांचं वेड असलेला हा मुलगा पहिल्याच भेटीत मला आवडला. त्यानं पहिल्याच भेटीत मला निरोप देताना, त्याला आवडलेल्या लेखांच्या झेरॉक्स काढून आणून ‘जरूर वाचा’ असं सांगून दिल्या होत्या. अधूनमधून अनेकदा त्याची भेट होत असायची. प्रत्येक वेळी तितक्याच उत्साहानं तो नवं काय घडतंय हे सांगत असायचा. या मुलाला जाणून घेताना त्याच्यातले अनेकविध पैलू माझ्या नजरेस पडत गेले आणि त्याची ही अनवट वाट तो किती रसरसून जगतोय हेही जाणवलं!आमीर रसूल शेख हा महाराष्ट्रातल्या ऊसतोड कामगार पुरवणाऱ्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी गाजलेल्या, दुष्काळी बीड जिल्ह्यातल्या आष्टी गावातला मुलगा! गावातच प्राथमिक शिक्षण झालं आणि वयाच्या १३व्या वर्षी पुढल्या शिक्षणासाठी म्हणून आमीरला आपलं गाव सोडावं लागलं. नाजूक वयाच्या टप्प्यावर असलेल्या आमीरचा तो मानसिक जडणघडणीचा काळ होता. इथूनच पुढे लातूर, अहमदपूर, अहमदनगर आणि पुणे या चार शहरांमध्ये त्याला त्याचे रस्ते सापडत जाणार होते. 

२००५ साली आमीरनं सातव्या इयत्तेत ९७ टक्के गुण मिळवले. या गुणांमुळे साहजिकच घरात आणि गावात आमीर खूप हुशार मुलगा आहे असा शिक्का बसला आणि मग हुशार असलं, की एक तर डॉक्टर व्हायचं, नाहीतर इंजिनीअर व्हायचं हे इतरांच्या दृष्टीनं ठरलेलंच होतं. आमीरनं डॉक्टर व्हावं, असं घरातल्यांनी नक्की केलं. त्या वेळी ‘लातूर पॅटर्न’ खूप गाजत होता. म्हणून आमीरची रवानगी लातूरमध्ये झाली. लातूर शहरातलं राजर्षी शाहू कॉलेज म्हणजे इथून मुलगा डॉक्टर होणारच असं समजलं जायचं, इतकी त्या कॉलेजची ख्याती सर्वदूर पसरली होती. अकरावीत प्रवेश मिळण्यासाठी केंद्रीय प्रवेश पद्धती होती. लातूर जिल्ह्यातल्या मुलांसाठी बहुतांश जागा राखीव असायच्या. त्यामुळे डॉक्टर होण्याचं आई-वडिलांचं स्वप्न बरोबर घेऊन आमीर लातूर शहरात दाखल झाला. 

लातूरला शिक्षणासाठी येणारा आमीर हा त्याच्या गावातला पहिलाच मुलगा होता. लातूर शहरानं आमीरला त्याच्या धर्माची जाणीव करून दिली. ‘तू मुस्लिम आहेस,’ हे त्याला कळलं. याचे काही फटकेही त्याला बसले. मुस्लिम आहे असं कळताच खोली देणाऱ्यांचे चेहरे बदलत. मग अनेक वेळा आमीरला खोली मिळवण्यासाठी नाव बदलून प्रयत्न करावे लागत. या नकारांनी अपमानित व्हावं लागलं, मनात संतापही निर्माण झाला; मात्र मुळातच वाईट लक्षात ठेवायचा स्वभाव नसल्यानं आमीरनं त्या गोष्टी मनाला फारशा लावून घेतल्या नाहीत.त्यानंतर एका प्राध्यापकांच्या घरी भाड्यानं देण्यासाठी बांधलेल्या सात खोल्या होत्या, त्यातल्या एका खोलीत आमीरच्या वडिलांनी त्याची व्यवस्था केली. सुरुवातीचे काही दिवस त्याचे वडील त्याच्यासोबत राहिले. आवश्यक ते सामान खरेदी करून दिलं आणि गावातल्या मुख्य ठिकाणचे रस्ते, खाणाखुणा त्याला नीट समजावून सांगितल्या. आठवीच्या वर्गात दाखल झालेला आमीर काहीसा अबोल होता. जातीपासून धर्मापर्यंत, आर्थिक, सामाजिक न्यूनगंडाचं ओझं बाळगून तो फिरायचा. हा न्यूनगंड दिसण्याचा होता, ग्रामीण भाषेचा होता आणि इंग्रजी भाषेचाही होता. एसटीडी बूथवर जाऊन आमीर घरी ख्यालीखुशालीचा फोन करायचा; मात्र त्यापलीकडे घरच्यांशी फारसा संवाद व्हायचा नाही. पहिल्यांदाच एकटं राहण्याची पाळी आल्यामुळे अनेक निर्णय स्वतःला घ्यावे लागत होते. खासगी क्लासही लावला होता. एकेका बॅचमध्ये ५०० ते ६०० मुलं-मुली खच्चून भरलेली असायची. घरातले क्लासचे पैसेही भरत होते; मात्र या सगळ्या परक्या गर्दीत आमीरचा एकटेपणाचा कोष आणखीनच वाढत चालला होता. 

सहामाही परीक्षेत पहिलाच पेपर मराठीचा होता आणि अभ्यास झालेला नव्हता. नापास होण्याच्या भीतीनं पहिल्यांदाच धीर करून आमीरनं कॉपी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो पकडला गेला. संपूर्ण शाळा आणि बाहेर चर्चा झाली. आमीरची खूप बदनामी झाली. तो सगळा काळ अपमानित अवस्थेत काढण्याचा होता. खूप लाज वाटत होती; पण चूक तर झाली होती. या सगळ्यांतून आमीरनं एकच केलं. पुढल्या आयुष्यात कधीही तो या प्रकारे कॉपी करण्याच्या भानगडीत पडला नाही. प्रसंगी पेपर कोरे ठेवले; पण कॉपी केली नाही. का कुणास ठाऊक, पण त्यानंतर त्याला शाळेत जावंसं वाटेनासं झालं. आणि याच मानसिक अवस्थेत नरहरे सरांच्या क्लासमुळे पुस्तकं आणि सामाजिक जग यांच्याशी त्याची भेट झाली. अभ्यास सोडून इतर काही पुस्तकं असतात ही गोष्टच तोपर्यंत आमीरला ठाऊक नव्हती. 

‘कोल्हाट्याचं पोर’ हे आमीरनं वाचलेलं पहिलं पुस्तक! हे पुस्तक वाचून आमीरला एका वेगळ्या जगाची ओळख झाली. आपलीच गोष्ट असावी इतका तो त्या कथानकात गुंतून गेला. इथूनच आयुष्याला एक वेगळं वळण लागायला सुरुवात झाली. 

आता एकलकोंड्या आमीरच्या आयुष्यात पुस्तकांनी प्रवेश केला. सुरुवातीच्या टप्प्यात दलित साहित्यानं त्याच्यावर मोहिनी घातली. एकापाठोपाठ एक अशी अनेक पुस्तकं त्यानं वाचून काढली. आयुष्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. पुस्तकांनी त्याला समाजभान दिलं आणि मग अनेक चळवळी कळत गेल्या, त्यांच्याशी तो जोडलाही गेला. कधी कधी तर पुस्तकं इतकी खुणावत, की आमीर आपल्या मेसचे पैसे उपाशी राहून वाचवायचा आणि त्या पैशांमध्ये पुस्तकं विकत घ्यायचा. कधी पुस्तकांसाठी पेट्रोल पंपावर रात्रीच्या वेळेत काम करायचा.

याच काळात आमीर कविताही करायला लागला. दहावीच्या परीक्षेत तो ९० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाला. शाहू कॉलेजच्या अॅडमिशनच्या दृष्टीनं हे गुण खूपच नाचक्कीसारखे होते. आमीरला या गोष्टीमुळे नैराश्यही आलं; पण पुस्तकांनी त्याला यातून बाहेर काढलं. लातूरनं प्रेम करणारी अनेक माणसंही दिली. एक दार बंद झालं, की दुसरं उघडतं हे त्याला समजलं. 


लातूरच्या शाहू कॉलेजइतकंच प्रसिद्ध असलेलं अहमदपूरचं महात्मा गांधी कॉलेज होतं. तिथे आमीरला अकरावीला प्रवेश मिळाला. लातूरपेक्षा इथलं वातावरण आणखीनच वेगळं होतं. शेकडो खासगी क्लासेस आणि महाराष्ट्रभरातून, महाराष्ट्राबाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांची गर्दीच गर्दी लातूरच्या तुलनेत नव्हती. इथे आमीरचं वाचन आणखीनच वाढलं. आता दलित साहित्याकडे असलेला ओढा वैचारिक वाचनाकडे वळला होता. अरुण टिकेकर, कुमार केतकर, गोविंद तळवलकर, नरहर कुरुंदकर यांचं लिखाण आमीरनं वाचलं. याच दरम्यान आमीरनं साधना आमटे यांचं ‘समिधा’ हे पुस्तक वाचलं आणि तो खूपच प्रभावित झाला. तो आनंदवनलाही जाऊन आला. त्यानंतर आनंदवनच्या वाऱ्या वाढत गेल्या. तिथलं वेगळं जगणं त्याच्या दृष्टीस पडलं. आमीरला बारावीत फक्त ७५ टक्के गुण मिळाले. त्याचाच परिणाम म्हणजे मेडिकलची सीट मिळणं अशक्य होतं. आमीरनं आपलं सामानसुमान आवरून पुन्हा लातूरमध्ये प्रवेश केला आणि ब्रेक घेऊन दोन वर्षं अभ्यासात लक्ष घातलं. पुन्हा परीक्षा देऊन मेडिकलला प्रवेश मिळेल इतके गुण प्राप्त केले; मात्र याच काळात त्यानं ‘नीलची शाळा-समरहिल’ हे पुस्तक वाचलं. प्रत्येक मूल हे खास असतं हे या पुस्तकानं त्याला सांगितलं. या पुस्तकानं आमीरला शिक्षण म्हणजे काय आणि आपल्याला मेडिकलला जायचंय का, असे जे प्रश्न पडले होते, ते सुटायला मदत झाली आणि त्यानं मेडिकलची सीट सोडून दिली. 

आपला मुलगा डॉक्टर होत नसला, तरी तो इंजिनीअर होऊ शकतो या विचारानं अहमदनगरच्या गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आमीरचा प्रवेश निश्चित करण्यात आला. इंजिनीअर होण्यासाठी कॉलेज आणि इतर वाचन सुरू होतंच. 

अहमदनगर शहरानं आपल्याला वाट दाखवली आणि विचारांना कृतीची जोड हवी असण्याची जाणीव करून दिली, असं आमीरला वाटलं. नगरमध्ये स्नेहालय संस्थेच्या डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी तर वर्षभर आपल्या घरातच आमीरला ठेवून घेतलं. वडिलांसारखं प्रेम दिलं. या काळात अनेक लोक त्याचे पालक बनले. माणसं, धर्म, जाती वाईट नसतात, तर प्रवृत्ती वाईट असतात, हे अहमदनगरनं आमीरला सांगितलं. अशा प्रवृत्ती सर्वच जाती-धर्मात असतात. या काळात तो सामजिक कामाशी आणखी जवळून जोडला गेला.


यादरम्यान ‘स्टे हंग्री स्टे फूलिश’ हे एमबीए केलेल्या मुलांवर आधारित असलेलं रश्मी बन्सल लिखित पुस्तक त्यानं वाचलं. त्या मुलांनी पैसा कमावणं हे प्राथमिक ध्येय न ठरवता आंत्रप्रूनरशिपला कसं महत्त्व दिलं आणि त्यांच्या त्या कृतीनं त्यांनी आर्थिक यश मिळवून आपल्या व्यवसायातही कसा जम बसवला, हे त्याला समजलं. ‘आय हॅव ए ड्रीम’ हेही पुस्तक त्यानं वाचलं. त्याला या पुस्तकांनी झपाटून टाकलं. आपल्यामध्येही एक आंत्रप्रूनर दडलेला आहे याची जाणीव या पुस्तकांनी त्याला करून दिली. आपण या प्रकारे काम करू शकतो, आपल्याला व्यवस्थापनातही रस आहे, हे त्याच्या लक्षात आलं. आता आपल्याला पुढे काय करायचंय, या विचाराबद्दल वाटेतलं धुकं कमी होत चाललं होतं. 

यातूनच २०१३ साली पुस्तक, सिनेमा आणि शिक्षण यावर आधारित ‘अक्षरमित्र’ उपक्रम सुरू झाला. या उपक्रमानं पुढे लातूरमध्येही आपलं काम सुरू केलं; मात्र हा उपक्रम सुरू करण्यासाठी आपल्याला अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र यांचाही सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे, असं आमीरला वाटू लागलं आणि सेकंड इअरला डिस्टिंक्शन मिळालेलं असतानाही इंजिनीअरिंग अर्धवट सोडण्याचा निर्णय आमीरनं घेतला आणि घरी कळवला. 

‘अक्षरमित्र’ या उपक्रमातून लोकांमध्ये आणि शालेय स्तरावरच्या किशोरवयीन मुलांमध्ये वाचनाची गोडी रुजवणं, खऱ्या शिक्षणाचा अर्थ, मूल्य आणि विवेकवादी विचार यांचा प्रसार करणं अशी उद्दिष्टं आमीरनं डोळ्यासमोर ठेवली. अनेक लोकांना वाचायला आवडतं; पण काय वाचावं हे बऱ्याचदा कळत नाही. शिवाय वाचण्यासाठी नेमकी पुस्तकं कुठे उपलब्ध असतील, हेही अनेकदा ठाऊक नसतं. वाचक आणि पुस्तकं यांच्यातला दुवा बनण्याचं काम ‘अक्षरमित्र’नं सुरुवातीच्या काळात करायचं ठरवलं. अगदी शालेय स्तरावरच्या मुलांमध्ये मूल्यांची रुजवणूक करणारी, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारी पुस्तकं, नियतकालिकं पोहोचवणं आणि त्यांच्या मनातलं कुतूहल जागं करणं यासाठी चांगल्या पुस्तकांची यादी तयार करून ती आमीर आणि त्याच्या टीमनं शाळा-शाळांपर्यंत पोहोचवली. ही यादी करण्यासाठी त्यानं अनेक तज्ज्ञांची मदतही घेतली. वाचनवेड्या लोकांपर्यंत पुस्तकं घेऊन पोहोचलं पाहिजे, या विचारानं आमीरनं पुस्तकं जमा करायचं ठरवलं; पण पुस्तकं कुठून आणायची हे ठाऊक नव्हतं. पुणे शहरात प्रकाशन व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याचं समजताच आमीर पुण्यात येऊन अनेक प्रकाशकांना भेटू लागला. आमीरला कोणी ओळखत नसल्यानं आणि पैशानंही तो कफल्लक असल्यानं त्याला कोणी दाद देईनासं झालं; पण आमीरनं चिकाटी सोडली नाही. प्रत्येक नकार पचवत प्रकाशकाच्या या दारातून त्या दारात तो जात राहिला. त्याच्यावर साधना प्रकाशनानं पहिला विश्वास टाकला. आमीरनं ‘साधना’चा विश्वास सार्थ करून दाखवला. काहीच काळात त्यानं ‘साधना साप्ताहिक’ आणि ‘वाटसरू’ यांचे वर्गणीदार मोठ्या संख्येने वाढवले. प्रत्येक वर्गणीदार व्यक्तीकडून तो त्यांच्या आप्त-स्वकीयांची पाच नावं गोळा करायचा आणि मग त्या पाच लोकांना भेटून त्यांना वर्गणीदार बनवायचा. अशा प्रकारे साखळी वाढत गेली. यानंतर साधना प्रकाशनामुळेच त्याला मनोविकास प्रकाशनाची वाट सापडली. मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर हे कार्यकर्ते असल्यानं त्यांनीही आमीरला भरपूर मदत केली. आता आमीरच्या कामात आणखी मित्र येऊन सहभागी झाले. त्यांच्या कामामुळे वाचकांचा आणि प्रकाशकांचा ‘अक्षरमित्र’वरचा विश्वास वाढला. साधना, वाटसरू, यांबरोबरच अंतर्नाद, मुक्त शब्द, प्रबोधनपत्र, विचारशलाका ही मराठी आणि कॅरॅवॅन, फ्रंटलाइन, बेरने वेव्ह, टेल मी व्हाय, बीबीसी नॉलेज, स्टोअर ही इंग्रजी नियतकालिकंही आपल्या वर्गणीदारांसाठी आमीरनं सुरू केली. अर्थातच हे करत असताना आमीरला अक्षरमित्र म्हणजे वर्गणीदार बनवणं किंवा पुस्तक विक्री केंद्र इतकंच मर्यादित ठेवायचं नव्हतं. तसंच यातून आर्थिक नुकसान होऊ नये याची काळजीही घ्यायची होती. 

आमीरच्या इंजिनीअरिंग सोडून चाललेल्या उद्योगांमुळे आमीरच्या वडिलांनी त्याला पैसे पाठवणं बंद केलं होतं. या काळात आमीर ‘चुका करा आणि त्या चुकांमधून शिका’ हा धडा घेत होता. अरविंद गुप्ता, अनिल सद्गोपालन आणि मंजिरी निमकर ही शिक्षणक्षेत्रात काम करणारी माणसं, तसंच भोपाळची एकलव्य ही संस्था आमीरसाठी आदर्शवत होती आणि आजही आहेत.

एका सुट्टीत आमीर घरी गेला, तेव्हा त्यानं आपल्या वडिलांना ‘नीलची शाळा’ हे पुस्तक वाचायला दिलं. त्यांना ते खूपच आवडलं. त्यांनी ‘अक्षरमित्र’ला खरं तर सुरुवातीला विरोध केला होता; पण ते पुस्तक वाचल्यानंतर त्यांनी आमीरकडून चक्क २०० पुस्तकं विकत मागवली आणि ती इतरांना भेट दिली. 

आता आमीरला अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र हे दोन विषय शिकण्यासाठी पुणे शहर खुणावत होतं. पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये आमीर दाखल झाला. आतंरराष्ट्रीय संबंध आणि अर्थशास्त्र यांचे धडे गिरवायला लागला. 

पुण्यात आल्यावर आमीरला संघर्ष करावा लागला; पण स्वतंत्रपणे उभं राहू शकतो याचं बळही पुण्यानंच आमीरला दिलं. नवनवीन शक्यता त्याला आता खुणावू लागल्या. जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या एका शिक्षकाचा मुलगा डॉक्टर होण्यासाठी घराबाहेर पडला होता; मात्र आता त्याला इंजिनीअरही व्हायचं नव्हतं आणि कुठला व्यवसायही करायचा नव्हता. त्याला आता आधी स्वतःला घडवायचं होतं. शिक्षण विषयात काम करायचं होतं, साहित्य जाणून घ्यायचं होतं. सिनेमा करायचा होता, माहितीपट करायचे होते, संपूर्ण भारत सायकलवरून पालथा घालायचा होता. भारताले लोक, संस्कृती, जगभरातले सिनेमे, नाटकं, लोककला, भाषा या गोष्टींची ओळख करून घ्यायची होती. चित्रपट क्षेत्रात ट्रुफो आणि तारकोस्कव्ही, सत्यजित रे आणि ऋत्विक घटक हे दिग्दर्शक त्याला खूप आवडतात. तसंच आनंद गांधी (शिप ऑफ थिसस) आणि रितेश बात्रा (लंच बॉक्स) हेही दिग्दर्शक आवडतात. या दोघांकडे तो भारताच्या सिनेमाचं उज्ज्वल भविष्य म्हणून बघतो. 

यानंतर आमीरनं प्रवास करायचं मनावर घेतलं. या प्रवासाला निमित्त ठरला त्याचा मित्र प्रसाद वाघ! प्रसाद एक सिनेमावेडा तरुण! आपण आपला समाज वाचलेला असतो; पण तो प्रत्यक्ष अनुभवलेला नसतो हे आमीरच्या लक्षात आलं. आपले तत्त्वज्ञ अगदी विवेकानंदांपासून सगळ्यांनी भारत पालथा घातला होता. त्यामुळे त्यांच्या जगण्यात, त्यांच्या कामात, त्यांच्या विचारात आणि त्यांच्या बोलण्यात एक खोली होती, हेही आमीरला समजलं. 

त्यामुळे आमीर सायकलवरून दक्षिण भारत बघायला निघाला. आजकाल जे सायकलचे ग्रुप्स असतात, ज्या पद्धतीनं व्यवस्थित प्रशिक्षण आणि बरोबर प्रवासासाठी आवश्यक सामान घेऊन, नियोजन करून निघतात, त्यातलं आमीरला काहीच ठाऊक नव्हतं. तो निघाला. दिवसभर सायकलवर प्रवास करायचा आणि रात्री जे गाव लागेल तिथं मुक्काम करायचा त्यानं ठरवलं. हायवे, शहरं प्रवासात टाळायची हे नक्की होतं. महाराष्ट्राच्या माणदेशापासून सुरुवात करायचं ठरलं. धरमशाला, कोलकाता, केरळ आणि पुणे असा प्रवास करायचं त्यानं ठरवलं. या काळात या चारही ठिकाणच्या फिल्म फेस्टिव्हलला त्याला उपस्थित राहायचं होतं. तसा तो उपस्थित राहिला. एकेका दिवशी त्यानं अनेक चित्रपट बघितले. केरळमध्ये केरळ शास्त्र साहित्य परिषदेच्या लोकांबरोबर तो २२ दिवस राहिला. कर्नाटक आणि गोव्यातही तो गेला. तमिळनाडूचा काही भाग त्याला अनुभवता आला.

या प्रवासानं आमीरला भारत नव्यानं कळला. या प्रवासात त्याचा लोकांवरचा विश्वास वाढला. आमीर कुठलाही सेलेब्रिटी नव्हता, तरी या प्रवासानं शेकडो कुटुंबं मिळाली, असं त्याच्या लक्षात आलं. लहान लहान गावांमधून मुक्काम आणि प्रवास केल्यानं त्याला अनेक माणसं भेटली, कळली, समजली. त्यांनी त्याच्यावर भरभरून प्रेम केलं. तो आपल्यापासून लवकर दूर जाऊ नये म्हणून काहींनी त्याची सायकल लपवून ठेवली, तर काहींनी जाताना त्याचा सत्कार केला, काहींनी प्रवासात खाण्यासाठी बरोबर शिदोरी बांधून दिली. केरळमधल्या एका स्त्रीनं तर आईच्या नात्यानं जणू काही आपला मुलगा खूप दिवसांनी आलाय, या विचारानं दोन दिवसांत केरळचे अनेक खास पदार्थ करून त्याला खाऊ घातले. तो परतताना गावातल्या लोकांनी त्याची मिरवणूक काढून आपलं प्रेम व्यक्त केलं. देश काय असतो, हे या प्रवासातून त्याला समजलं. केवळ महाराष्ट्रच नाही, तर प्रत्येक राज्यात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी तो त्या त्या राज्याशी जोडला गेला. हेच आपलं खरं जगणं आहे आणि हेच आपल्याला अनुभवायचं आहे हे त्याला उमगत गेलं. या प्रवासानं आपण खूप समृद्ध झालो, असं आमीरला वाटलं. 

लेखिका दीपा देशमुख यांच्यासह आमीर

स्वप्नं, ध्येयवाद अशा गोष्टींच्या मागे धावायचं नाही आणि त्यावर विचारही करायचा नाही, असं आमीरनं त्यानंतर ठरवलं. स्वप्नं पाहणं म्हणजे त्या स्वप्नांची मर्यादाही आपणच ठरवणं, असं त्याला वाटतं. आपलं भविष्य आपण डिझाइन करू शकत नाही. कारण पुढे काय होणार त्या क्षणांची आपल्याला कल्पनाही नसते. तो तो क्षणच आपल्याला निर्णय घ्यायला भाग पाडतो. त्यामुळे झापडबंद पद्धतीनं एकाच दिशेनं प्रवास करायचा नाही, हेही त्यानं यातून ठरवलं. आपल्याला येऊन मिळणारे अनेक आकस्मिक प्रवाह आणि प्रवास आपण अनुभवले, बघितले पाहिजेत असं त्याला जाणवलं. आपण सगळंच आधी डिझाइन केलं तर आपला वर्तमान आणि भविष्यकाळ दोन्हीही गमावून बसतो, असं त्याला वाटतं. वर्तमानाचा आनंद घेण्यासाठी वर्तमानातच जगलं पाहिजे हे त्याला प्रवासानं शिकवलं. आपल्याला नावीन्याचा ध्यास आहे आणि त्या त्या क्षणांवर आपला मालकी हक्क नाहीये हे आमीरला समजलं. हेच तर बुद्धानं सांगितलंय हेही त्याच्या लक्षात आलं. 

प्रवासात त्याला बुद्ध आणि गांधी नीटपणे कळत गेले. स्वतःत होणारे बदल टिपता आले. आतमध्ये जाऊन स्वतःला तपासता आलं. या सगळ्या दृष्टीनं आपला कम्फर्ट झोन सोडून बाहेर निघणं किती आवश्यक आहे, हेही त्याला कळलं. स्वतःवर प्रेम असायला हवं; मात्र आपल्या प्रतिमेवर नाही या विचारांवर तो ठाम झाला. त्याच्या प्रवासात त्याला अनेक मोठे कलाकार, चित्रकार, कामगार, शेतकरी अनेक लोक भेटले. या प्रत्येकामधलं वेगळेपण त्याला नवं काहीतरी देऊन गेलं. त्यांचं प्रेम आणि त्यांच्यातली मानवता त्याला उल्हसित करून गेली.शिक्षण म्हणजे आपल्यात रुजत चाललेल्या चांगल्या मूल्यांची रुजवणूक, शिक्षण म्हणजे स्वतःला निर्णय घेता येणं, शिक्षण म्हणजे आपल्याला काय हवंय हे ओळखून जगता येणं, शिक्षण म्हणजे स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करून चालायला लावणारी गोष्ट, शिक्षण म्हणजे केवळ पैसा नाही किंवा भौतिक वस्तू विकत घेण्याचा मार्ग नाही, तर आयुष्य आनंददायी करणारी आणि आपल्या कामातूनच आनंद देणारी गोष्ट, शिक्षण म्हणजे मानवतावाद, हे आमीरला आज उमगलं आहे. जेवढं वाचन महत्त्वाचं, तेवढाच प्रवास महत्त्वाचा, हेही आमीरला समजलं. धर्माच्या चौकटी गळून पडल्या. आमीर स्वतःला नास्तिक म्हणवतो; मात्र नास्तिक असणं म्हणजे आपल्या जगण्याचीती एक पद्धत असं तो मानतो. जे आस्तिक आहेत त्यांच्या जगण्याची पद्धत आपल्यापेक्षा वेगळी असं समजून तो त्यांच्या त्या जगण्यावर, त्या पद्धतीवर टीकाही करत नाही. 

आज आमीरला त्याचा भविष्यकाळ ठाऊक नाही आणि त्याला ठाऊक करून घ्यायचाही नाही. आनंददायी जगायचं आहे आणि साध्य साधण्यापेक्षा प्रक्रिया आणि प्रवास याच गोष्टींना लक्षात ठेवून पुढली वाटचाल करायची आहे. त्याच्या वाटचालीसाठी, त्याच्या कामासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा!

संपर्क : आमीर रसूल शेख
ई-मेल : aksharmitrabooks@gmail.com
मोबाइल : ९४०३७ ७२३३९, ९७३०३ ८०६००

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Shashwati About 156 Days ago
Wow... Great ... M so glad and wealthy coz he is my friend
1
0
Sanjay Pujari Karad About 159 Days ago
Nice Inspired article
1
0

Select Language
Share Link
 
Search