Next
लेफ्टनंट कर्नल महेंद्रसिंह धोनीचे ३१ जुलैपासून काश्मिरात पोस्टिंग!
BOI
Thursday, July 25, 2019 | 03:01 PM
15 0 0
Share this article:नवी दिल्ली :
आपल्या अविस्मरणीय खेळामुळे क्रिकेटरसिकांच्या हृदयात स्थान मिळविलेला महेंद्रसिंह धोनी आता लष्करात सेवा बजावणार आहे. ३१ जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीसाठी त्याचे जम्मू-काश्मीरमध्ये पोस्टिंग झाले आहे. २०११मध्ये त्याला लष्कराने लेफ्टनंट कर्नल ही मानद पदवी बहाल केली होती. 

१०६ टेरिटोरियल आर्मी बटालियनमध्ये (पॅराशूट रेजिमेंट) धोनी सहभागी होणार असून, पॅट्रोलिंगसह (गस्त घालणे) लष्कराच्या ठाण्यावरील (गार्ड अँड पोस्ट ड्युटी) सेवा बजावणार आहे. आपल्याला प्रत्यक्ष सेवा बजावण्याची संधी द्यावी, अशी विनंती धोनीने लष्कराकडे केली होती. त्याला लष्कराच्या मुख्यालयाकडून मंजुरी मिळाली आणि त्यानुसारच तो आता सेवा बजावणार आहे, असे लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आपल्या रेजिमेंटच्या कामात प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी धोनीने क्रिकेटमधून दोन महिन्यांचा ब्रेक घेतला असून, आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आपण उपलब्ध नसल्याचे ‘बीसीसीआय’ला कळविले आहे. 

चार वर्षांपूर्वी धोनीने लष्कराच्या आग्रा येथील प्रशिक्षण तळावर लष्कराच्या विमानांतून पाच वेळा पॅराशूट जम्पिंग करून प्रशिक्षित पॅराट्रूपर बनण्याचा मान मिळविला आहे. बुधवारी (२४ जुलै) तो त्याच्या बटालियनमध्ये रुजू झाला असून, त्याचे दोन महिन्यांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. बेंगळुरूमध्ये त्याच्या बटालियनचे मुख्यालय आहे. व्हिक्टर फोर्सचा भाग म्हणून तो काश्मिरात जाणार आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनी तो लष्करासोबत असणार आहे.

२०१९च्या क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात धोनीने त्याच्या ग्लोव्ह्जवर लष्कराचा लोगो वापरला होता; मात्र ते स्पर्धेच्या नियमांविरुद्ध असल्याने पुढील मॅचपासून त्याने तो काढून टाकला होता. आपल्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कपसह क्रिकेटमधील अनेक महत्त्वाच्या स्पर्धा जिंकून देऊन देशाचे नाव उंचावणाऱ्या धोनीला आता लष्करात सहभागी होऊन प्रत्यक्ष देशसेवा करण्याचीही संधी मिळाली आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search