Next
सोलापुरातील प्रिसिजन कॅमशाफ्ट कंपनीची स्थिती भक्कम
वार्षिक सर्वसाधारण सभेत मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांची माहिती
प्रेस रिलीज
Tuesday, October 01, 2019 | 03:36 PM
15 0 0
Share this article:सोलापूर :
‘प्रिसिजन कॅमशाफ्ट कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. बँकेत फंड जमा आहे. दर वर्षी शंभर कोटींची वाढ, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, युरोपात केलेला विस्तार आणि इलेक्ट्रिक वाहनांना जगभरात मिळणारा वाढता प्रतिसाद या आमच्या जमेच्या बाजू आहेत,’ अशी माहिती सोलापुरातील प्रिसिजन कॅमशाफ्ट कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी रवींद्र जोशी यांनी दिली. 

कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा २५ सप्टेंबरला पार पडली. या सभेमध्ये कंपनीचे संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी रवींद्र जोशी यांनी कंपनीच्या आर्थिक परिस्थितीचा लेखाजोखा मांडला. २०१८-१९ या वर्षात कंपनीने भरीव कामगिरी केली असल्याचे त्यांनी सांगितले. वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर गुंतवणूकदारांच्या विविध प्रश्नांना उत्तर देत असताना त्यांनी आयपीओच्या दिवसापासूनचा आढावा घेतला. 

‘आयपीओमधून आलेल्या २४० कोटी रुपयांपैकी २१६ कोटी रुपये सोलापुरात नवीन उत्पादनक्षमता निर्माण करण्यासाठी वापरण्यात आले आणि उर्वरित रक्कम आयपीओ संदर्भातील गोष्टींवर खर्च झाली. आम्ही गुंतवणूकदारांना जे सांगितले, ते तंतोतंत पाळले याचा आम्हाला अभिमान आहे. आज कंपनीकडे मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ आहे. मंदीचा काळ प्रत्येक कंपनीसाठी खडतर असतो; पण तरीदेखील ३१ मार्च २०१९ रोजी कंपनीकडे ९९.९२ कोटी रुपयांचे केवळ म्युच्युअल फंड आहेत,’ असे जोशी यांनी सांगितले.  

भांडवल बाजारात ‘प्रिसिजन’च्या समभागांच्या किमती खाली जात असल्याबद्दल विचारले असता जोशी म्हणाले, ‘मी प्रत्येक गुंतवणूकदाराला हेच सांगू इच्छितो, की संयम बाळगा. अवघ्या ऑटो विश्वातच मंदी असल्याकारणाने त्याचा परिणाम शेअर बाजारातील किमतींवर होतच असतो; पण आज कॅमशाफ्टच्या जागतिक बाजारपेठेच्या १० टक्के आणि भारतीय बाजारपेठेच्या ७० टक्के बाजारपेठ या कंपनीने काबीज केली आहे.’ 

‘दुसरी महत्त्वाची गोष्ट गुंतवणूकदारांनी समजावून घेतली पाहिजे, ती म्हणजे कॅमशाफ्ट हा मूलभूत व्यवसाय आहे. ही टेस्ट मॅच आहे, ट्वेंटी-ट्वेंटीची मॅच नाही. ग्राहकाकडून ड्रॉइंग आल्यावर उत्पादन चालू होईपर्यंत नऊ महिने जातात. त्यामुळे गुंतवणूकदारांना लगेच त्याचे परिणाम दिसत नाहीत. ‘प्रिसिजन’ हा सट्ट्यासाठीचा शेअर नाही. आज पैसे टाकून उद्या दुप्पट होतील, अशी अपेक्षा ठेवू नये,’ असेही जोशी यांनी सांगितले. ‘‘प्रिसिजन’सारख्या सुविधा निर्माण करण्यासाठी या क्षेत्रातील कंपन्यांची बरेच काही करण्याची इच्छा असते. त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नसते. वित्तपत्रके ताकदीची नसतात. मग बाजारात मिळेल त्या दराला कर्ज काढावे लागते; पण आर्थिक व्यवस्थापनाचे ‘प्रिसिजन’चे कौशल्य मोठ्या कंपन्यांना लाजवेल असे आहे. खेळत्या भांडवलाची गरज पडल्यास ‘प्रिसिजन’ला केवळ सहा टक्के दराने भांडवल उपलब्ध होते. आज सहा टक्के हा बाजारातला खेळत्या भांडवलाचा कदाचित सर्वांत कमी व्याजदर असेल,’ असे जोशी यांनी सांगितले.

‘सोलापूरसारख्या छोट्या शहरात असूनसुद्धा आम्ही भारताबाहेर युरोपात पताका फडकावल्या,’ असे रवींद्र जोशी यांनी अभिमानाने सांगितले. ‘केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना सवलती जाहीर करायच्या अगोदरच आम्ही हॉलंडमधील इमॉस नावाची कंपनी विकत घेतली. युरोपातील बाजारपेठेत इलेक्ट्रिक बस आणि ट्रक बनवणारी कंपनी ‘प्रिसिजन’च्या आधिपत्याखाली आल्याने आमची युरोपातील ताकद निश्चित वाढली आहे,’ असेही जोशी यांनी नमूद केले.

कॅमशाफ्ट या एका उत्पादनापासून आणि जनरल मोटर्स आणि फोर्ड या दोन मोठ्या ग्राहकांपासून चालू झालेल्या प्रिसिजन कॅमशाफ्ट या सोलापूरस्थित कंपनीकडे अधिग्रहणामुळे फोक्सवॅगन, ऑडी, बॉश असे या क्षेत्रातील दिग्गज मानले गेलेले ब्रँड्सदेखील ग्राहक म्हणून आले आहेत. कंपनीने गेल्या वर्षात आपल्या व्यवसायाशी पूरक असणाऱ्या मेमको, हॉलंडस्थित इमॉस आणि जर्मनीस्थित एमएफटी या कंपन्यांचे अधिग्रहण पूर्ण केले आहे. इमॉसच्या अधिग्रहणामुळे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातदेखील ‘प्रिसिजन’ने प्रवेश केला आहे. 

प्रिसिजन कॅमशाफ्ट ही सोलपुरातील सर्वांत मोठी अणि भांडवल बाजारातील नोंदणीकृत कंपनी आहे. कार इंजिनचा आत्मा समजला जाणारा कॅमशाफ्ट तयार करणाऱ्या प्रिसिजन या कंपनीचे सोलापूरमधील दोन्ही प्लांट्स पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. सध्या कंपनीत १५० विविध प्रकारचे कॅमशाफ्ट तयार होतात. सोलापुरातील दोन हजारांहून अधिक लोकांना ही कंपनी रोजगार देते.

(To read this news in English, please click here.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search