Next
‘किसान’ कृषी प्रदर्शन १२ डिसेंबरपासून मोशीमध्ये
BOI
Wednesday, December 05, 2018 | 05:45 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘देशातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’ येत्या १२ ते १६ डिसेंबर दरम्यान मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्रात भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनात ६०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील’,अशी माहिती आयोजक निरंजन देशपांडे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, ‘१५ एकर जागेवर हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, पाच दिवसांमध्ये देशभरातून सुमारे दोन लाखांहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे या प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या १०० हून अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असेल. भारतीय कृषी अनुसंधान परिषद व त्यांच्या संशोधन संस्थाचाही कृषी प्रदर्शनात सहभाग असणार आहे.’ 

‘मोबाईलचा वाढता वापर आणि डिजीटल इंडिया उपक्रमांमुळे शेतकऱ्यांशी संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. यामुळेच उद्योजक नवनवीन सेवा व उत्पादने शेतकऱ्यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत. हे उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधींची माहिती घेऊ शकतील. आंतरराष्ट्रीय दालनात चीन, तैवान व युरोप मधील कंपन्यांचा सहभाग आहे. मुख्यत्वे छोटी यंत्रे व अवजारे या ठिकाणी प्रदर्शित होत आहेत. भारतीय शेतकऱ्यांच्या गरजा व बाजारपेठ जाणून घेणे; भारतात विक्री प्रतिनिधी नेमणे, हा या कंपन्यांचा उद्देश आहे. हे दालन प्रदर्शनाचे पहिले तीन दिवस म्हणजे १२ ते १४ डिसेंबर खुले असेल’, असेही देशपांडे यांनी सांगितले.       

                   
‘प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क १०० रुपये असून, पूर्व नावनोंदणी सुविधा kisan.net या संकेतस्थळावर व kisan.net मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर केल्यास प्रदर्शन स्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांचा वेळ वाचेल.पूर्वनोंदणी करणाऱ्यांना प्रवेश शुल्कात ५० रुपये सवलत मिळणार आहे. शेतकऱ्यांचा वेळ वाचवण्यासाठी, प्रदर्शनाच्या प्रवेशव्दारावरही मोबाईल अॅपद्वारे आगाऊ नावनोंदणीची सोय केली आहे. आत्तापर्यंत पाच हजार शेतकऱ्यांनी ‘किसान २०१८’ साठी पूर्व नावनोंदणी केली आहे. ही संख्या ५० हजारांचा टप्पा ओलांडेल अशी अपेक्षा आहे’, असे  देशपांडे यांनी नमूद केले. 

‘किसान प्रदर्शनाचे उद्घाटन १२ तारखेला सकाळी नऊ वाजता प्रदर्शन स्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या पहिल्या गटाच्या हस्ते करण्यात येणार आहे. मोशी येथील प्रदर्शन स्थळ हे पुणे शहरापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असून, येथे जाण्यासाठी शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल बस स्टॉपपासून बसची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे’,असेही देशपांडे यांनी सांगितले.

किसान प्रदर्शन
दिवस : बुधवार, १२ ते १६ डिसेंबर 
वेळ : सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत
स्थळ : पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी
संपर्क : (०२०)३०२५२०२०/ www.kisan.in
नावनोंदणीसाठी : www.kisan.net
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search