Next
मामा वरेरकर, सु. रा. चुनेकर
BOI
Friday, April 27 | 03:45 AM
15 0 0
Share this story

स्वतःला ‘नाटकवाला’ म्हणवून घेणारे प्रख्यात नाटककार मामा वरेरकर आणि पावणेसातशे सूचींमधून किमान तीस-पस्तीस हजार नोंदी उपलब्ध करून देणारे समीक्षक सु. रा. चुनेकर यांचा २७ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.....
भार्गवराम विठ्ठल वरेरकर 

२७ एप्रिल १८८३ रोजी चिपळूणमध्ये जन्मलेले भार्गवराम विठ्ठल ऊर्फ मामा वरेरकर हे रंगभूमीसाठी उभं आयुष्य वेचलेले रंगकर्मी. स्वतःला ते ‘नाटकवाला’ म्हणवून घेत असत. खरं पाहता त्यांनी ‘विधवाकुमारी’, ‘सात लाखातील एक’, ‘धावता धोटा’ यांसारख्या चाळीसेक उत्तम कथा-कादंबऱ्यांही लिहिल्या आहेत; पण ते गाजले आणि ओळखले गेले ते नाटककार म्हणूनच!

अगदी चार-पाच वर्षांचा असताना रत्नागिरीमध्ये आईच्या मांडीवर बसून रात्रभर चाललेलं नाटक पाहून भारावलो गेल्याची आणि नरहरबुवांच्या नाटकांची त्यांची अगदी बालपणीची आठवण त्यांनी सांगितली आहे. तेव्हापासूनच त्यांना नाटकाने भारलं होतं. कोकणात येणाऱ्या नाटक कंपन्यांचे, दशावताराचे खेळ लक्षपूर्वक पाहून आणि पुढे नाटकांचा अभ्यास करून त्यांनी स्वतःमधला नाटककार घडवला. 

सारस्वत, भूमिकन्या सीता, संजीवनी, अ-पूर्व बंगाल, करीन ती पूर्व, कुंजविहारी, जिवाशिवाची भेट, धरणीधर, न मागता, नवा खेळ, नामानिराळा, सत्तेचे गुलाम, संन्याशाचा संसार, सोन्याचा कळस, हाच मुलाचा बाप, अशी त्यांची अनेक नाटकं गाजली होती. 

त्यांना संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळाली होती. धुळ्यामध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसंच पुण्यात भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते. 

१९५९ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

२३ सप्टेंबर १९६४ रोजी त्यांचं निधन झालं.

(मामा वरेरकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
......

सुरेश रामकृष्ण चुनेकर 

२७ एप्रिल १९३६ रोजी जन्मलेले सुरेश रामकृष्ण चुनेकर हे संशोधक आणि समीक्षक म्हणून ओळखले जातात. 

साहित्य संशोधनात अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान असणारी ‘सूचीनिर्मिती’ ही अभ्यासकांसाठी मोठीच सोय असते आणि अशा अनेक सूचींची सूची तयार करण्याचं महत्त्वाचं काम चुनेकर यांनी केलं आहे. सुमारे पावणेसातशे सूचींमधून किमान तीस-पस्तीस हजार नोंदी संकलित करून एक मौलिक संदर्भसाहित्य त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे.

‘जीएं’ची निवडक पत्रे, माधव जूलियन, अंतरंग, जयवंत दळवी यांच्या नाटकांतील प्रवृत्तीशोध, माधवराव पटवर्धन वाङ्मय दर्शन, सहा साहित्यकार अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

(सु. रा. चुनेकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. 

दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link