Next
प्राप्तिकर बचतीसाठी....
BOI
Saturday, April 14, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

आर्थिक वर्ष संपत आले, की शेवटच्या क्षणी प्राप्तिकर वाचवण्यासाठी गुंतवणूक करण्याची घाई प्राप्तिकरदाते करत असतात. वर्षाच्या सुरुवातीलाच नियोजन केले, तर ऐन वेळी ताण येत नाही. प्राप्तिकर बचतीसाठी आर्थिक नियोजन कसे करावे, याचे मार्गदर्शन... ‘समृद्धीची वाट’ या सदरात ...
........
बहुतांश प्राप्तिकरदाते आपल्या प्राप्तिकराचे नियोजन करण्याबाबत फारसे गंभीर असल्याचे दिसून येत नाही. उलटपक्षी, फेब्रुवारी व मार्च महिन्यात कर वाचविण्याच्या दृष्टीने घाईगडबडीत आयुर्विमा, एनएससी, पीपीएफ यांसारखी गुंतवणूक करत असतात. खरे तर, प्रत्येक करदात्याने आपले करनियोजन करताना आर्थिक नियोजन करणेदेखील आवश्यक आहे. कोणते गुंतवणूक पर्याय कर नियोजनासाठी उत्तम आहेत, याचा आढावा आपण आज घेऊ.

कर नियोजनासाठी उपलब्ध असलेले गुंतवणूक पर्याय साधारणपणे मध्यम व दीर्घ मुदतीचे असतात. त्या दृष्टीने आपली भविष्यातील आर्थिक गरज विचारात घेऊन गुंतवणुकीचा पर्याय निवडणे आवश्यक असते.

आपली भविष्यातील आर्थिक गरज तीन ते पाच वर्षे कालावधीनंतर असेल, तर म्युच्युअल फंडाच्या ‘ईएलएसएस’ योजनेत गुंतवणूक केल्यास तीन वर्षांनंतर कधीही रक्कम पूर्ण अथवा हवी तेवढी रक्कम काढता येते. अशा गुंतवणुकीतून मिळणारा परतावा (रिटर्न) अंदाजे १३ ते १५ टक्के इतका असू शकतो; मात्र तो नेमका किती मिळेल याची खात्री देता येत नाही. असे असले, तरी यातून मिळणारा परतावा एनएससी किंवा कर सवलतीस पात्र असणारी पाच वर्षे मुदतीची बँक ठेव यांच्यापेक्षा जास्त असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. त्यामुळे करबचत करण्यासाठी गुंतवणूक करताना या पर्यायाचा प्राधान्याने विचार करावा. विशेषत: तरुणांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा.

मुलांच्या शिक्षणाची किंवा आपल्या अन्य दीर्घकालीन गरजांसाठी तरतूद करावयाची असेल, तर विमा कंपनीचा चिल्ड्रन प्लॅन, एंडोवमेंट, मनी बॅक, युलिप यात गुंतवणूक करण्यापेक्षा कमीतकमी प्रीमियमचा टर्म इन्शुरन्स प्लॅन घेऊन, उर्वरित रक्कम म्युचुअल फंडाच्या ईएलएसएस, पीपीएफ, सुकन्या समृद्धी किंवा एनपीएस यांसारख्या दीर्घकालीन योजनेत गुंतवल्यास करसवलतीचा फायदा तर मिळेलच, शिवाय मुलांचे शिक्षण, सेवानिवृत्तीनंतरची आर्थिक तरतूद यांसारखी उद्दिष्टे सहज साध्य होतील. ‘कलम ८० सी’नुसारची दीड लाख रुपयांची मर्यादा संपली असेल, तर एनपीएस योजनेत आणखी ५० हजार रुपयांची गुंतवणूक करून दोन लाखांची वजावट मिळविता येते. (कलम ८० सीसीडी (१) बी नुसार)

गृहकर्जावरील करसवलत मोठी असल्याने त्याचाही लाभ करबचतीसाठी होतो. गृहकर्जाच्या दीड लाखापर्यंतची मुदलाची परतफेड ‘८० सी’नुसार करसवलतीस पात्र असते. याशिवाय गृहकर्जावरील दोन लाखांपर्यंतचे व्याज प्राप्तिकराच्या ‘सेक्शन २४’नुसार करपात्र उत्पन्नातून वाजवटीस पात्र असते. आपण आपले घर एक एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत घेतले असेल, घराची किंमत ५० लाखांच्या आत असेल व गृहकर्ज ३५ लाखांच्या आत असेल, तर आणखी ५० हजार रुपयांपर्यंतचे व्याज करपात्र उत्पन्नातून वजावटीस पात्र असते. या सवलतीचा फायदा घेण्यासठी पती-पत्नी दोघेही कमावते असतील, तर घर घेताना संयुक्त नावावर घ्यावे व गृहकर्जसुद्धा संयुक्त नावावर घेऊन, कर्ज परतफेड संयुक्त खात्यातून केल्यास दोघांनाही वरील सवलतीचा फायदा घेता येईल.

विमा कंपनीची पेन्शन योजना घेण्यापेक्षा ‘एनपीएस’मध्ये गुंतवणूक केल्याने मिळणारा परतावाही जास्त असतो; करसवलतसुद्धा जास्त मिळवता येते. (‘८०सीसीडी (१) बी’नुसार)

 याव्यतिरिक्त मुलामुलींच्या, स्वत:च्या अथवा पत्नीच्या उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जावरील संपूर्ण व्याज करपात्र उत्पन्नातून वजावटीस पात्र असते.
मेडिक्लेम पॉलिसीचा ६० वर्षांच्या आतील व्यक्तीसाठी २५ हजार रुपयांपर्यंतचा प्रीमियम व ६० वर्षांवरील व्यक्तीसाठीचा ५० हजार रुपयांपर्यंतचा प्रीमियम ‘सेक्शन ८० डी’नुसार करपात्र उत्पन्नातून वजावटीस पात्र आहे. ही बाब ध्यानात घेऊन मेडिक्लेम पॉलिसी घेणे फायदेशीर असते.

थोडक्यात असे म्हणता येईल, की केवळ कर वाचविण्याच्या उद्देशाने घाईगडबडीत वर्षअखेरीस गुंतवणूक न करता आपले करनियोजन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच करून, आपल्या सर्व आर्थिक गरजा विचारात घेऊन योग्य ती गुंतवणूक अथवा विमा पॉलिसी घेणे निश्चितच फायद्याचे असते. यामुळे करबचत तर होतेच, शिवाय आपल्या आर्थिक गरजांची तरतूदही केली जाते. 

- सुधाकर कुलकर्णी 
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link