Next
मंगळावर भूमिगत पाण्याचे सरोवर
जीवसृष्टी असण्याच्या शक्यतेत वाढ..
BOI
Saturday, July 28, 2018 | 05:00 PM
15 1 0
Share this story


इटालियन संशोधकांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात मंगळावर भूमिगत म्हणजेच भूभागाखाली पाण्याचे एक सरोवर असल्याचे समजले आहे. मंगळावरील आजवरच्या संशोधनात प्रथमच असे सरोवर सापडले असून, २० किलोमीटर व्यास असलेल्या या सरोवराच्या शोधामुळे तिथे जीवसृष्टी असण्याची शक्यता वाढली आहे. एका अमेरिकी संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या इटालियन संशोधकांच्या अहवालात हे संशोधन नमूद करण्यात आले आहे. 

मंगळावरील बर्फाच्या दीड किलोमीटर थराच्या खाली असलेल्या या २० किलोमीटर व्यासाच्या सरोवरातील पाणी थंड, क्षारयुक्त आणि खनिजयुक्त असल्याने पिण्यायोग्य नाही. पाण्याच्या सरोवरात सूक्ष्मजीव असण्याची शक्यता काही अभ्यासकांनी वर्तवली आहे; मात्र हे पाणी पिण्यायोग्य नसल्याने काही अभ्यासकांनी त्यात सजीव असण्याबाबत साशंकता वर्तवली आहे. 

युरोपीयन स्पेस एजन्सीच्या मार्स एक्स्प्रेस ऑर्बिटर यानावरील रडारच्या मदतीने या सरोवराचा शोध लागला असल्याचे ऑस्ट्रेलियन खगोलीय वेधशाळेचे फ्रेड वॉटसन यांनी म्हटले आहे. आजवर मंगळावर सापडलेल्या पाण्याच्या प्रदेशांपैकी हा सर्वांत मोठा प्रदेश आहे. मंगळ पूर्वी उबदार व ओलसर होता, आता मात्र तो थंड, ओसाड आणि कोरडा आहे. ३.६ अब्ज वर्षांपूर्वी तिथे पाण्याची सरोवरे असावीत. तिथे विपुल प्रमाणात पाणी असावे, असेही अंदाज संशोधकांनी वर्तवले आहेत. 

मंगळावर जीवसृष्टी आहे काआणि असल्यास तिथे वस्ती करता येणे शक्य आहे का, अशा काही विषयांवर काही महिन्यांपूर्वी भरपूर चर्चा झाली होती. ‘मंगळ ग्रह एवढ्या लवकर मानवी वसाहतीचा नवा पर्याय म्हणून पृथ्वीच्या टप्प्यात आलाय, असे म्हणता येणार नाही. मानवनिर्मित तंत्रज्ञानाच्या जोरावर आपण मंगळावर एक वेळ सहीसलामत पोहोचू शकू हे खरे; मात्र मंगळावर वस्ती करणे, तेथील प्रतिकूल वातावरणात सर्वसामान्य पद्धतीने राहू शकणे, हे अजूनही दुरापास्त आहे,’ अशा शब्दांत तेव्हा कॅलिफोर्निया विद्यापीठातील खगोलशात्रज्ञांनी मत व्यक्त केले होते. या धर्तीवर आता सापडलेल्या या सरोवरामुळे या अभ्यासाला कोणती नवीन दिशा मिळेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल..
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link