Next
भातशेतीमध्ये साकारला पाचू-कवडा
श्रीकांत इंगळहळीकरांच्या ‘पॅडी आर्ट’ उपक्रमाचे तिसरे वर्ष
BOI
Friday, September 21, 2018 | 06:08 PM
15 0 0
Share this story


पुणे : सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील फुलांवर संशोधन करणारे पुण्यातील नामवंत वनस्पतिशास्त्रज्ञ श्रीकांत इंगळहळीकर यांनी आपल्या भातशेतीत या वर्षी एमेराल्ड डव्ह अर्थात पाचू-कवडा हा विषुववृत्तीय सदाहरित जंगलात राहणारा पक्षी साकारला आहे. ‘पॅडी आर्ट’ अर्थात भातशेतीच्या माध्यमातून भव्य चित्र साकारण्याचे हे इंगळहळीकर यांचे सलग तिसरे वर्ष आहे. सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा येथे त्यांची भातशेती आहे.

श्रीकांत इंगळहळीकर
व्यवसायाने उद्योजक असलेल्या इंगळहळीकर यांनी जपानमधील ‘पॅडी आर्ट’चा प्रथमच पुण्यात प्रयोग केला. मागील दोन वर्षे त्यांनी यातूनच साकारलेला गणपती व काळा बिबट्या पुणेकरांसाठी आकर्षण ठरला होता. ‘पॅडी आर्ट’ साकारताना जमिनीचा एका ‘कॅनव्हास’सारखा वापर केला जातो आणि विविध रंगांतील भाताची रोपे लावून रंगसंगती साधली जाते. जोराच्या पावसात गुडघाभर पाण्यात उभे राहून दोन रंगांच्या भाताची लावणी करणे हे आव्हानात्मक काम असल्याचे इंगळहळीकर यांनी सांगितले. या वर्षी इंगळहळीकर यांनी पाचू-कवडा ही एका सुंदर दुर्मीळ पक्ष्याची ५० बाय ७० फूट आकाराची प्रतिमा सादर केली आहे.

‘पाचू-कवडा’ अर्थात ‘एमेराल्ड डव्ह’ हा विषुववृत्तीय सदाहरित जंगलात राहणारा पक्षी असून, त्याचा आढळ भारतापासून दक्षिण-पूर्व आशियापर्यंत आहे. सह्याद्रीमध्ये माथेरान, भीमाशंकर, महाबळेश्वर, कोयना, आंबोली अशा सावलीच्या जंगलात पाचू-कवड्यांच्या जोड्या दिसतात. पडलेली फळे आणि वाहनांतून सांडलेले धान्य खायला हे पक्षी रस्त्यावर उतरतात आणि चाहूल लागताच वेगाने दाट जंगलात नाहीसेही होतात, अशी माहिती इंगळहळीकर यांनी दिली. 

या पक्ष्याला तमिळनाडू सरकारने राज्य पक्ष्याचा दर्जा दिला असून, जंगलांचे संरक्षण व संवर्धन केल्यास यासारखे अनेक दुर्मीळ पक्षी टिकून राहू शकतील. त्यामुळे सरकार व नागरिकांनी याकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. येत्या काही वर्षांत सह्याद्रीच्या जंगलातील दुर्मिळ प्राणी, पक्षी आणि इतर जीवांच्या प्रतिमा सादर करण्याचा विचार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

‘पॅडी आर्ट’ या कलेविषयी : 
दक्षिण जपानमधील ओमोरी जिल्ह्यात असलेल्या इनाकादाते या गावात ‘पॅडी आर्ट’चा जन्म झाला. या भागात वर्षानुवर्षे भातशेती केली जाते. ही भातशेती कोणत्याही यंत्राच्या वापराविना केली जाते. काही वर्षांपूर्वी या भातशेतीला दोन हजार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तेथील शेतकऱ्यांनी उत्सव साजरा करण्याचे ठरवले आणि त्यातून ‘पॅडी आर्ट’ अर्थात ‘टॅम्बो अटा’ ही कला १९९३मध्ये जपानमध्ये लोकप्रिय झाली. 

या गावात होणाऱ्या या उत्सवाची माहिती श्रीकांत इंगळहळीकर यांना इंटरनेटच्या माध्यमातून मिळाली आणि त्यापासून प्रेरित होऊन त्यांनी सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा येथे असलेल्या आपल्या ‘लेक्सॉन विंडर्स’ या कंपनीच्या आवारात या ‘पॅडी आर्ट’पासून भव्य गणपती व काळा बिबट्या साकारला होता. इंगळहळीकर यांनी साकारलेले ‘पॅडी आर्ट’ उंचावरून आणखीनच खुलून दिसत असून, त्यामुळे पुणे आणि परिसरातील पर्यटकांसाठी ते एक आकर्षण ठरते आहे. जवळजवळ डिसेंबर महिन्यापर्यंत हे ‘पॅडी आर्ट’ पाहता येणार आहे.

(रानफुले, निसर्ग, तसेच अन्य संबंधित विषयांवरील श्रीकांत इंगळहळीकर यांची पुस्तके बुकगंगा डॉट कॉमवरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Maneesha Lele About 153 Days ago
Innovative, creative.....
0
0

Select Language
Share Link