Next
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला आयएसओ मानांकन
BOI
Tuesday, September 24, 2019 | 01:20 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयातील कै. ज. वा. तथा बाबुराव जोशी ग्रंथालयाला ‘आयएसओ ९००१:२०१५’ हे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले आहे. व्यवस्थापनातील विशेष गुणवत्तेसाठी हे मानांकन दिले जाते. महाविद्यालयातील डॉ. ज. शं. केळकर सेमिनार हॉलमध्ये नुकत्याच झालेल्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्याला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, उपप्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. सर्वांनी ग्रंथपाल किरण धांडोरे आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत. 

कै. ज. वा. तथा बाबुराव जोशी ग्रंथालय हे रत्नागिरी जिल्ह्यातील, तसेच कोकण परिक्षेत्रातील एक अग्रगण्य आणि समृद्ध असे ग्रंथालय आहे. ग्रंथालयाची स्थापना गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाबरोबरच म्हणजे १९४५ या वर्षी झाली. ग्रंथालयात ग्रंथ देवघेव कक्ष, अभ्यासिका कक्ष, संदर्भग्रंथ दालन, दुर्मीळ ग्रंथदालन, नियतकालिक कक्ष, स्पर्धा परीक्षा आणि नेट-सेट परीक्षा कक्ष, पदव्युत्तर विभाग स्वतंत्र कक्ष, मोफत इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. तसेच पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त अशी आणि आपल्या आवडीचा ग्रंथ कपाटाजवळ जाऊन निवडण्यासाठी असलेली ‘मुक्तद्वार पद्धती’ही येथे आहे. 

ग्रंथालयात विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रमाणित केलेली ‘सोल’ ही संगणक प्रणाली कार्यरत असून, संगणकावर वाचन साहित्य पाहण्यासाठी ‘ओपॅक’ ही सुविधा उपलब्ध आहे. ग्रंथालय पूर्णत: संगणकीकृत असून, बारकोडिंग प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. या बारकोडद्वारेच सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्याकडून पुस्तक देव-घेव केली जाते. ‘वेब ओपॅक’ची उपलब्धता हे या ग्रंथालयाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. सध्या ग्रंथालयात एकूण एक लाख १२ हजार १४६ ग्रंथ असून, त्यात ६७ हजार १६ संदर्भ ग्रंथ आणि ४५ हजार १३० क्रमिक पुस्तकांचा समावेश आहे. २१ दैनिके, तसेच १४२ नियतकालिके ग्रंथालयात येत असतात. सुमारे दीड लाखाहून अधिक ई-बुक्स ग्रंथालयात असून, शेकडो ई-नियतकालिकेही येतात. दृक्श्राव्य माध्यमातील फिती, ऑडिओ बुक्स आदींची संख्या ८१० असून, प्रबंध आणि शोधनिबंधांची संख्या ६२ आहे; तसेच ग्रंथालयाकडे २८१ दुर्मीळ पुस्तके आणि ७८ हस्तलिखितांचा खजिना उपलब्ध आहे. 

‘सहकार’ या महाविद्यालयाच्या वार्षिकांकाचे डिजिटायझेश करण्यात आले आहे. विविध दैनिकांत प्रसिद्ध होणाऱ्या महाविद्यालयाशी संबंधित अशा बातम्यांचे संकलन आणि डिजिटायझेशन करण्यात आले आहे. ग्रंथालयाची प्रशस्त, हवेशीर आणि स्वतंत्र अशी ‘अभ्यासिका’ ही विद्यार्थ्यांना त्यांच्या अध्ययनास प्रेरित करणारी सुंदर अशी जागा आहे. तसेच पदवी आणि पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: मोफत असा ‘इंटरनेट कक्ष’ कार्यान्वित आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी स्वतंत्र अभ्यासिका कक्ष आहे. ग्रंथालयात नियमितपणे आणि विशेष दिवसांचे औचित्य साधून ग्रंथसंग्रह ग्रंथप्रदर्शनाद्वारे वाचकांना खुला करून दिला जातो. सहकार भित्तिपत्रक प्रकाशनप्रसंगी भित्तिपत्रकाच्या विषयानुसार ग्रंथप्रदर्शने नियमितपणे आयोजित केली जातात. ग्रंथालयात उपलब्ध असलेली ग्रंथसंपदा विद्यार्थ्यांना कळावी या प्रमुख उद्देशाने प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. 

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पूरक आणि सकस वाचनाकरिता प्रवृत्त करणारे आणि विद्यार्थिभिमुख असे ग्रंथालयाचे अनेकविध उपक्रम आहेत. यामध्ये नवीन आकर्षणे असलेला कक्ष, नव्याने दाखल झालेल्या ग्रंथांची ग्रंथयादी प्रदर्शित करणे, विद्यापीठ परीक्षांचे प्रश्नसंच तयार करणे आदींचा त्यात समावेश आहे. वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील १७ विभागांची ‘विभागीय ग्रंथालये’ असून, या विभागांना १८२५ ग्रंथ देण्यात आले आहेत, दिवाळी अंक प्रदर्शनही आयोजित केले जाते. 
मागासवर्गीय विद्यार्थी विद्यापीठ पुस्तक पेढी योजना, हुशार आणि गरजू विद्यार्थी पुस्तक पेढी योजना, कमवा शिका योजना, बहिस्थ विद्यार्थी ग्रंथालय सुविधा, विद्यार्थी ‘वाचक गट’ उपक्रम, यांतून करण्यात येणारी आदर्श विद्यार्थी वाचक आणि आदर्श शिक्षक वाचक पुरस्काराची निवड, रात्र पुस्तक देव-घेव योजना, रात्र अभ्यासिका, २० टक्के सवलत पुस्तक पेढी योजना, कमवा व शिका योजना, बहिस्थ विद्यार्थी ग्रंथालय सुविधा यांसारखे अनेक विद्यार्थिप्रिय उपक्रम प्रति वर्षी आयोजित करण्यात येतात. आगामी काळात या ग्रंथालयाला आरएफआयडी या अत्याधुनिक ग्रंथालय स्वयंचलित प्रणालीची जोड दिली जाणार आहे.

आधुनिक ग्रंथालयशास्त्रात होणाऱ्या बदलांची माहिती ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांना होण्यासाठी नियमितपणे ‘कर्मचारी प्रशिक्षण’ आयोजित करण्यात येते. या प्रशिक्षण कार्यशाळेत मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतात. ग्रंथालयाने ‘ओपन सोर्स सॉफ्टवेअर’ या राज्यस्तरीय कार्यशाळेचे २०१८मध्ये यशस्वी आयोजन केले होते. या कार्यशाळेत राज्यातील महाविद्यालयीन ग्रंथपाल आणि कर्मचारी, सार्वजनिक ग्रंथालयातील ग्रंथपाल आणि कर्मचारी, तसेच ग्रंथालयशास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी सहभागी झाले. २०१०मध्ये पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या सहयोगाने हस्तलिखित कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. नुकत्याच झालेल्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या ‘नॅक’ मानांकन प्रक्रियेतही कै. बाबुराव जोशी ग्रंथालयाने उत्तम कामगिरी केली आहे. आता आयएसओ मानांकन मिळाल्यामुळे संस्थेच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search