Next
‘ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प दिशादर्शक’
प्रेस रिलीज
Saturday, September 01 | 02:08 PM
15 0 0
Share this storyपुणे : ‘पाण्याच्या पुनर्वापराला चालना देण्यासाठी माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून साकारलेला देशातील पहिला ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प दिशादर्शक असून, असे प्रकल्प महाराष्ट्रात सर्वत्र उभारण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केले.

सहकारनगर येथील कै. वसंतराव बागुल उद्यान येथे माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या संकल्पनेतून आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून साकारलेल्या देशातील पहिल्या ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा खासदार चव्हाण यांच्या हस्ते झाला. या वेळी माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, नांदेडचे आमदार अमरनाथ राजूरकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी महापौर कमल व्यवहारे, नगरसेविका सुजाता शेट्टी, लता राजगुरू, संगीता तिवारी, नगरसेवक महेश वाबळे, नगरसेवक मनीष आनंद, पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल  आदींसह मान्यवर उपस्थित होते.

खासदार चव्हाण म्हणाले, ‘दिवसेंदिवस वाढणारी लोकसंख्या आणि निसर्गाचा लहरीपणा, भूगर्भात आटत चाललेला पाणीसाठा या पार्श्वभूमीवर भविष्यात पिण्याच्या पाण्यावरून युद्ध भडकेल अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करीत आहे. त्यामुळे पाणीबचतीसाठी शाश्वत आणि ठोस पर्याय ठरणारा  देशातील पहिला ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प पथदर्शी आहे आणि राज्यात सर्वच महापालिकांनी असे प्रकल्प उभारण्याची काळाची गरज आहे.’

माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या कार्याचा गौरव करताना ते म्हणाले की, ‘एक व्यक्ती सलग सहावेळा निवडून येते ही काही साधी गोष्ट नाही. कल्पकता असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे प्रकल्प आबा बागुल यांनी राबविले आहेत. पाण्याच्या पुनर्वापराचा प्रकल्प  सिंगापूरला मी दहा वर्षांपूर्वी पाहिला आणि आपण रेल्वेने पाणी पोहचविण्याचा कटू अनुभवही घेतला आहे या पार्श्वभूमीवर पाण्याच्या पुनर्वापराला चालना देण्यासाठी आबा बागुल यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच सर्वांसाठी उपयुक्त आणि दिलासादायक आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांनी खऱ्या अर्थाने पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबविली होती याकडेही त्यांनी लक्ष वेधले. आबा बागुल यांची कल्पकता आणि दूरदृष्टी पाहता, त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी सदैव आहे.’

प्रास्ताविक करताना उपमहापौर बागुल म्हणाले, ‘स्वयंपाकासाठी तसेच अंघोळीसाठी वापरले जाणारे पाणी शुद्ध करून पुन्हा वापरात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण असणारा देशातील पहिला ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या मापदंडानुसार या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.आजवर पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पडलेल्या आहेत. पक्षाची ध्येयधोरणे जनमाणसात रुजवलेली आहेत, त्यामुळे मला जनाधार लाभला आहे आणि सलग सहावेळा निवडून आलो आहे.’

सूत्रसंचालन घनःश्याम सावंत यांनी केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link