Next
पंढरपुरात साकारले भव्य तुळशीवन
२५ जानेवारीला लोकार्पण सोहळ्याचे आयोजन
BOI
Thursday, January 24, 2019 | 02:42 PM
15 0 0
Share this article:


सोलापूर : विठूमाऊलीच्या दर्शनाची आस घेऊन पंढपुरात येणाऱ्या भाविकांना आता येथील आकर्षक तुळशीवनात विहार करण्याचा आनंद लुटता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाने येथे सुमारे एक हेक्टर परिसरात आकर्षक तुळशीवन साकारले आहे. या तुळशीवनाचे लोकार्पण शुक्रवारी, २५ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. 


पांडुरंगाला आवडणारी तुळस आणि वारकरी संप्रदायामध्ये असणारे तुळशीचे महत्त्व लक्षात घेऊन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून पंढरपूरात यमाई तलावाशेजारी तुळशीवन विकसित करण्यात आले आहे. विठ्ठलाची २४ फुटांची भव्य मूर्ती असलेले, श्रीयंत्राच्या रचनेवर आधारित रंगीबेरंगी फुलझाडे, कारंजे यांनी सजलेले हे तुळशीवन भाविकांचे आकर्षण केंद्र ठरणार आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरीत हे आगळेवेगळे पर्यटनस्थळ तयार झाले आहे. 


तुळशीवनाच्या पूर्व दिशेला श्री विठ्ठलाची २४ फुटांची भव्य मूर्ती असून, समोर खुले सभागृह उभारले आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना गोपुरे आहेत;तसेच प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला सह्याद्री पर्वतरांग व उजव्या बाजूला जगप्रसिध्द कासपठाराचे चित्र रेखाटण्यात आले आहे. वाघ, गवा, हरीण, मोर, फुलपाखरे यांची आकर्षक चित्रेही काढण्यात आलेली आहेत. 

उद्यानात श्रीयंत्राची प्रतिकृती साकारण्यात आली असून, श्रीयंत्राच्या मध्यभागी स्वयंचलित रंगीत कारंजे बसवण्यात आले आहे. त्यामुळे सायंकाळी विद्युतरोषणाईमध्ये याचे सौंदर्य आणखीनच खुलणार आहे. तुळशीवनात आठ प्रजातींच्या तुळशी रोपांची लागवड करण्यात आली असून, श्रीयंत्राच्या त्रिकोणामध्ये सदाफुली, गुलाब, मोगरा, शेवंती इत्यादी शोभिवंत फुलझाडे आहेत; तसेच बकुळ, पारिजातक, सोनचाफा, चाफा, बांबू, पाम या वृक्षांचीही लागवड करण्यात आली आहे. या वनात मध्यभागी कारंजे असून, त्याच्याभोवती चारही बाजूंनी एकात एक गुंफलेले नऊ त्रिकोण आहेत. त्रिकोणांच्या मध्यभागी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई, संत सावता माळी, संत कान्होपात्रा आणि संत चोखामेळा यांच्या मूर्ती आहेत. 


‘या तुळशीवनामुळे भाविकांसाठी विसाव्याचे आणि पर्यटनासाठी एक आकर्षक स्थळ उपलब्ध झाले आहे. वारीच्या काळात ज्या भाविकांना विठ्ठलाचे दर्शन होणार नाही. त्यांना इथल्या विठ्ठल मूर्तीच्या दर्शनाचा लाभ होईल. येथे साकारण्यात आलेल्या चित्रांमुळे, वनराईमुळे पर्यटकांना वनस्पती, वन्यजीव याबद्दल माहिती व त्याविषयी आवड निर्माण होण्यास मदत होईल. पंढरीत येणाऱ्या भाविकांचे हे तुळशीवन नक्कीच खास आकर्षण ठरेल,’ अशी भावना वनक्षेत्रपाल विलास पवळे यांनी व्यक्त केली. 

वारकरी आणि पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने पंढरपूरचा सर्वांगीण विकास करण्यास सुरुवात केली. यामध्ये पंढरपूरला जोडणारे सर्व रस्ते दर्जेदार करण्याबरोबरच शहरातील अंतर्गत रस्ते बनविण्यास प्राधान्य दिले. त्याचबरोबर शहरात येणाऱ्या भाविकांच्या सुखसोयींसाठी सुविधा निर्माण करण्यासही प्राधान्य दिले आहे. त्या अंतर्गत हे तुळशीवन साकारण्यात आले आहे. त्यामुळे पंढरीच्या आकर्षणात आणखी भर पडली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Jayawant Desai About 211 Days ago
The great work for varkari's and Bhagvat Dharma,in fact tulshi spreads oxygen rich atmosphere in surrounding area, that's refreshing!
0
0

Select Language
Share Link
 
Search