Next
मृगजळात वाहवलेले मावळे
BOI
Monday, April 23 | 06:45 AM
15 0 0
Share this story

दक्षिणी मराठी यू-ट्यूब चॅनेल

तंजावरमधील मराठी मंडळींनी मोठ्या निगुतीने शतकानुशतके जपलेली आपली भाषासंपदा ‘दक्षिणी मराठी’ या यू-ट्यूब चॅनेच्या रूपात जगासमोर आणली. त्या निमित्ताने आपली मराठी आणि त्यांची मराठी एकत्र येईल, दोन दुरावलेल्या बहिणी सोबत वाढतील अशी आशा होती. परंतु त्यांची धडपड किंवा प्रयत्न न पाहता या लोकांना ‘आपली’ भाषा शुद्धता शिकविण्याचा अगोचरपणा काही जणांनी केला. दर कोसावर भाषा बदलते म्हणणारे आपण त्या कोसावर बदलणाऱ्या भाषेला स्वीकारायला मात्र तयार नसतो. याबद्दल विचारमंथन करणारा लेख...
.............
‘छत्रपतींचे भक्त म्हणून, मराठी भाषेचे प्रेमी म्हणून किंवा इतिहासाभ्यासक म्हणून तंजावरच्या मराठी भाषक बांधवांविषयी अधिक जाणून घेण्याची आपली फार इच्छा असते... पण आता आपल्या तंजावरच्या बांधवांविषयी जाणून घेण्याकरिता इतर बाह्य स्रोतांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता उरलेली नाही. कारण तंजावरच्या महाराष्ट्रीय बांधवांनी स्वतःच आता यू-ट्यूबवर ‘दक्षिणी मराठी’ या नावाने एक चॅनल सुरू केले आहे... महाराष्ट्राच्या मराठीत फारशी, अरबी आणि उर्दू शब्दांची रेलचेल असताना, अशुद्ध मराठी बोकाळत असताना, तंजावरच्या मराठीमध्ये काय परिस्थिती आहे?.... या आणि यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या चॅनलवर पाहावयास मिळतील. कृपया खाली दिलेल्या लिंकवर एकदा क्लिक करा. चॅनलला सबस्क्राइब करा आणि माहितीचा खजिनाच प्राप्त करा.’

अशा आशयाचा संदेश काही दिवसांपूर्वीपासून व्हॉट्सअॅपवर फिरत आहे. आपल्या भाऊबंदांच्या या एका वेगळ्या मासल्याचा अनुभव घेण्याची ही नामी संधी. आधुनिक तंत्रज्ञानाने वेगवेगळ्या अनुभवांची जी दारे उघडली आहेत, त्याचा हा एक प्रत्यक्ष फायदा. यू-ट्यूबवर ‘दक्षिणी मराठी’ या नावाने ही वाहिनी मोठ्या संख्येने लोकांना आकर्षित करत आहे. त्या निमित्ताने आपली मराठी आणि त्यांची मराठी एकत्र येईल, दोन दुरावलेल्या बहिणी सोबत वाढतील अशी आशा होती. परंतु आपल्याकडे भाषेच्या वापरापेक्षा भाषेवर प्रेमच बुवा जास्त. त्यामुळे त्यांची धडपड किंवा प्रयत्न न पाहता या लोकांना ‘आपली’ भाषा शुद्धता शिकविण्याचा अगोचरपणा काही जणांनी केला आणि सगळेच मुसळ केरात गेले.

मराठी शुद्धलेखन हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय, पोटापाण्याचा म्हटले तरी चालेल. एकीकडे मराठी शाळांची संख्या कमी होण्याची ओरड, दुसरीकडे मराठी शाळांतील विद्यार्थ्यांमध्येही इंग्रजीचे अनावर आकर्षण आणि चहूबाजूंनी होणारा इंग्रजी-हिंदी इत्यादी भाषांचा मारा. या सर्व वातावरणातही काही जणांना शुद्ध मराठीचा कळवळा असतो. हा कळवळा मराठीतील योग्य लेखनासाठी किंवा भाषेच्या योग्य वापराबद्दल नसतो. तो असतो ‘मी वापरतो ती मराठी शुद्ध आणि तुमची (किंवा तुझी मराठी) अशुद्ध’ या थाटाची.

अलम मराठी जगतात चर्चांचे जे काही सार्वकालिक (सामान्यांच्या भाषेत सांगायचे तर ऑल टाइम) हिट विषय असतील, त्यात हा शुद्ध भाषेचा विषय अत्यंत वरच्या स्थानी. चहा पिताना, कुठे अल्पोपाहार करताना तावातावाने चर्चा करण्यासाठी इतका फर्मास विषय दुसरा सापडायचा नाही. भाषेचा अतिरेकी आग्रह, प्रमाणभाषेचा प्रमाणाबाहेर आग्रह धरणाऱ्या व्यक्तीला इंग्रजीत ‘ग्रामर नाझी’ ही संज्ञा आहे. जुलूम या अर्थानेच वापरायचे झाल्याचे आपण त्यांना ‘व्याकरण निजाम’ किंवा ‘व्याकरण मोगल’ म्हणू शकू! पण अति सर्वत्र वर्जयेत्! अति तेथे माती. त्यामुळे चांगल्या उद्देशाने केलेल्या कृत्यांचा अतिरेकही कधी कधी उलटेच परिणाम घडवून आणू शकतो.

या तंजावूर मराठीच्या मंडळींमध्ये नेमके हेच घडले. मोठ्या निगुतीने त्या मंडळींनी शतकानुशतके जपलेली आपली भाषासंपदा जगासमोर आणली. पिढ्यानपिढ्या जपलेला एखादा जिन्नस पाहुण्या-रावळ्यांसमोर उलगडून दाखवला, तशी महाराष्ट्रातील मंडळींसमोर तंजावर मराठी मांडली. अन् या मंडळींनी शेळी वातड असल्याचीच कैफियत त्यांच्यासमोर मांडली. शेळीचा जीव वगैरे गोष्टी नंतर!

‘आपण गेली ३५० वर्षे तंजावूरमध्ये मराठी बोलता, हे फारच मोठं काम आहे. प्रयत्न केले तर आपण चांगले मराठी बोलू शकाल. मराठी पिक्चर, मराठी मासिके, पेपर इत्यादींचे वाचन करावे. तसेच महाराष्ट्र सरकार व जागतिक मराठी परिषदेने त्यांना या कामी मदत केली पाहिजे,’ ही किंवा ‘मोडी लिपी वापरा, व्याकरण तयार करा, तमिळ शब्द फक्त दोन अक्षर असलेले वापरा,’ अशा सूचना तेथे अनेक वापरकर्त्यांनी केल्या. (यातील देवनागरीकरण किंवा विरामचिन्हांचा उपयोग माझा). एवढ्या अगत्याने हा साठा मांडणाऱ्या मंडळींना त्यामुळे काय वाटले असेल? त्यांचे आपल्या महाराष्ट्रीय बांधवांबद्दल काय मत झाले असेल? तसे पाहिले तर शुद्ध मराठीचा आग्रह काही खोटाही नाही अन् वाईटही नाही; पण हा आग्रह दुराग्रहात कधी बदलतो, हे आग्रह धरणाऱ्यालाही कधी कळत नाही. त्यामुळे भीक नको पण कुत्रा आवर हीच परिस्थिती निर्माण होणार!

वास्तविक भाषेतील, बोलीतील वैविध्य हे भाषेचे केवळ सौष्ठव नसते, तर ते भाषेच्या आरोग्याचे गमक असते. विशुद्ध साहित्यिक किंवा कृत्रिमरीत्या बांधलेली भाषा आणि प्रत्यक्षात लोकव्यवहारात बोलली जाणारी भाषा यात हाच फरक असतो - पहिली भाषा अगदी गोळीबंद, ठाशीव असते, तर दुसरी भाषा पदोपदी, क्षणोक्षणी बदलत असते. पहिली ही गोठलेल्या स्थितीत राहते, दुसरी प्रवाही राहते. लॅटिन ही पहिल्या प्रकारच्या भाषेचे उत्तम उदाहरण आहे (येथे संस्कृत हा शब्द वाचण्याची अनेकांना इच्छा होईल. परंतु संस्कृत ही गोठलेली किंवा मृत भाषा नाही. त्याबद्दल सविस्तर लिहिता येईल; पण येथे तो विषय नाही.) एस्पेरांतो ही जगातील एकमेव कृत्रिम भाषा हेही या प्रकाराचे आणखी एक चांगले उदाहरण.

जगाच्या इतिहासात प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळे भेद असतात. हे भेद कुठले? तर उच्चारणाची रूपे, शब्दसंग्रह, शैली किंवा बोली असे हे फरक असतात. समुदाय आणि भूगोलानुसार हे फरक पडत जातात. हे फरक पचविण्याची ताकद आपल्यात आहे काय? अन् ती नसेल तर मराठीला वैभवाचे दिवस आपण कसे दाखवणार? महाराष्ट्रापासून शेकडो मैल दूर राहणाऱ्यांच्या शब्दसंग्रहात जर तमिळ, कन्नड इत्यादी शब्दांची मिसळ (भेसळ नव्हे) झाली, तर त्यात बिघडले कुठे?

जिच्या वर्चस्वामुळे आज आपणच नाही, तर जगातील बहुतेक भाषक समुदाय त्रस्त झाले आहेत, त्या इंग्रजीची काय स्थिती आहे? तर इंग्रजीचे एकट्या इंग्लंडमध्ये २८ प्रकार आहेत! (स्कॉटलंड, आयर्लंड, वेल्स, उत्तर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा यात समाविष्ट नाही). सातव्या शतकामध्ये जन्म झालेल्या इंग्रजीची गेल्या १४०० वर्षांतील ही कमाई आहे. अन् हजार-दोन हजार वर्षांचा इतिहास असूनही आपण आपल्याच मराठीच्या एका वेगळ्या रूपाचा स्वीकार करायला बिचकतो.

तंजावूर मराठी ही मराठी भाषेचीच एक बोली आहे. तमिळनाडूतील तंजावर या भागात ती बोलली जाते. जवळपास एक लाखांहून अधिक लोक आजही ही भाषा रोजच्या व्यवहारात वापरतात. तमिळनाडूतील एक बोलीभाषा म्हणून तिला मान्यता आहे. शिवाजी महाराजांचे बंधू मराठा राजे व्यंकोजी यांच्यासोबत दक्षिणेत स्वारीसाठी गेलेली जी मराठी माणसे तंजावूरला पिढ्यानपिढ्या स्थायिक झाली, त्यांची ही मातृभाषा आहे. ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण भाषा आहे. आपल्याकडचे हरवलेले परंतु मूळ मराठीचे असलेले अनेक प्राचीन मराठी शब्द आजही या बोलीत सापडतात. काळाच्या ओघात आणि स्थानिक तमिळ भाषेचा प्रभाव या भाषेवर जाणवतो. मराठी नाटकाचा आणि रंगभूमीचा आरंभ विष्णुदास भावे यांच्या नाटकाने झाला, असे आपण मानतो. परंतु तंजावूरच्या राजांनी त्यांच्याही आधी नाटक लिहिले होते. अशा रीतीने मराठी नाटकांमध्ये पहिलेपणाचा मान त्यांच्याकडे जातो. अन् अशा लोकांना आपण शुद्ध-अशुद्ध शिकवत आहोत!

भाषा फक्त योग्य आणि अयोग्य असते. दर कोसावर भाषा बदलते म्हणणारे आपण त्या कोसावर बदलणाऱ्या भाषेला स्वीकारायला मात्र तयार नसतो. शुद्ध भाषा - बोली शुद्ध भाषा - हे एक मृगजळ आहे. अन् मराठीच्या प्रेमात आकंठ बुडालेले मावळे त्या मृगजळात वाहून जाऊ नयेत, म्हणून हा लेखप्रपंच!

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक असून, भाषा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘बाइट्स ऑफ इंडियावर दर सोमवारी प्रसिद्ध होणारे त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link