Next
पर्यावरणपूरक हातकागदाचे महत्त्व सांगणारा दिवस
BOI
Wednesday, August 01, 2018 | 04:03 PM
15 0 0
Share this story

पुणे : लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, अण्णा भाऊ साठे यांची जयंती यासोबतच एक ऑगस्ट या दिवसाचे आणखी एक महत्त्व आहे. हा दिवस कागद दिन म्हणून ओळखला जातो. देशाच्या राज्यघटनेची पहिली प्रत पुण्यातील हँडमेड पेपर इन्स्टिट्यूट अर्थात हातकागद संस्थेमध्ये तयार करण्यात आलेल्या हातकागदावर लिहिली गेली आहे. 

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने पुण्याचे शास्त्रज्ञ के. बी. जोशी यांनी या संस्थेची स्थापना केली. त्याचे उद्‌घाटन पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते एक ऑगस्ट १९४० रोजी झाले होते. म्हणून‘फेडरेशन ऑफ पेपर ट्रेडर्स ऑर्गनायझेशन’तर्फे एक ऑगस्ट हा दिवस ‘कागद दिवस’ म्हणून  साजरा करण्यात येतो. या दिवसानिमित्त संस्थेत आज (एक ऑगस्ट २०१८) संस्थापक जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

पुण्याचे शास्त्रज्ञ के. बी. जोशी यांना टाकाऊ वस्तूंपासून कागद निर्मितीची कला विकसित करण्यास महात्मा गांधी यांनी प्रवृत्त केले होते. त्यात संशोधन करून पर्यावरणपूरक हातकागद तयार करण्याचे तंत्र जोशी यांनी विकसित केले. त्यानंतर त्यांनी पुण्यात हातकागद बनवण्याची संस्था स्थापन केली. शिवाजीनगर येथे कृषी महाविद्यालयालगत या संस्थेची इमारत आहे. आता ती ‘पेपरटेल्स’ या नावाने ओळखली जाते. येथे कागदनिर्मितीसाठी लाकूड वापरले जात नाही. कापूस, धान्याचा कचरा, जुने कागद यांपासून कागद बनवला जातो. विविध ६८ प्रकारचे कागद येथे तयार केले जातात. त्यातून प्रदूषण करणारे कोणतेही घटक निर्माण होत नाहीत. या कागदापासून फाइल्स, आकाशकंदील, फोल्डर्स अशा अनेकविध वस्तूही येथे बनवल्या जातात. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, तसेच राजीव गांधी यांच्या लग्नाच्या आमंत्रणपत्रिका येथील हातकागदावर बनवल्या गेल्या होत्या.  

दरम्यान, कागदविषयक जनजागृतीसाठी कागद दिनानिमित्त एक ऑगस्ट रोजी पुणे पेपर ट्रेडर्स असोसिएशनतर्फे दुचाकी रॅली काढण्यात आली. ‘कागद हा पर्यावरणाचा शत्रू आहे, कागदनिर्मितीसाठी सर्व झाडे नष्ट करण्यात येतात, या गोष्टी खऱ्या नसून, त्या केवळ अफवा आहेत. वापरात येणाऱ्या एकूण कागदापैकी केवळ २३ टक्के कागदाची निर्मिती प्रत्यक्ष झाडापासून मिळणाऱ्या लगद्यापासून होते. उरलेला कागद इतर मार्गांनी तयार होतो. त्यात रद्दीपासून होणारी कागदनिर्मिती ३५ टक्के असून, भाताचे तूस, गहू पिकाचे टाकाऊ पदार्थ आणि पिशव्यांपासून तयार होणाऱ्या कागदाचे प्रमाण ४२ टक्के आहे. त्यामुळे कागदनिर्मिती पर्यावरणाच्या मुळावर उठली असल्याची मांडणी निराधार आणि खोटी आहे,’ अशी माहिती ‘दी पुणे पेपर ट्रेडर्स असोसिएशन’चे अध्यक्ष जतीन शहा यांनी पत्रकाद्वारे दिली. 

कागद व्यावसायिकांच्या विविध मागण्याही त्यात मांडण्यात आल्या असून, कागद व्यावसायिकांसाठी प्रशासनाने सवलतीच्या दरात जागा उपलब्ध करून द्यावी; कागदावरील ‘जीएसटी’चे प्रमाण १२ टक्क्यांवरून पाच टक्के करावे; कागद पर्यावरणपूरक आणि विघटनशील असून, तो पुनर्निर्मितीसाठी वापरला जातो, याविषयी प्रशासनातर्फे जनजागृती व्हावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link