Next
‘प्रवासवर्णन म्हणजे रसरशीत प्रवासानुभव असायला हवा’
BOI
Wednesday, May 17, 2017 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

प्रभू ज्ञानमंदिरात वाचनासोबतच शॉर्टफिल्म किंवा डॉक्युमेंटरी पाहायचीही सोय आहे.

मूळच्या पुणेकर, पण विवाहानंतर लंडनमध्ये स्थिरावलेल्या आणि मराठीत प्रवासवर्णनपर लेखन सातत्याने करणाऱ्या प्रसिद्ध लेखिका मीना प्रभू....पुणे सोडल्यावर पाच दशकांनी त्यांनी आपल्या या माहेरच्या गावी ‘प्रभू ज्ञानमंदिर’ हा अत्याधुनिक किंडल लायब्ररीचा प्रकल्प राबवला आहे. त्याचे औपचारिक उद्घाटन पाच मे रोजी झाले. प्रवास या विषयावरील बरीच पुस्तके, मासिके आणि नियतकालिके वाचनप्रेमींना येथे मिळतील! मीना प्रभूंनी डझनभर प्रवासवर्णने केवळ लिहिली नसून, त्यातून जगातील निरनिराळ्या ठिकाणांची ज्ञान देणारी व रंजन करणारी विस्तृत माहितीही दिली आहे. प्रवासवर्णनावरील तब्बल बारा पुस्तके लिहिणाऱ्या मीना प्रभूंची ‘माझं लंडन,’ ‘इजिप्तायन,’ ‘तुर्कनामा,’ ‘ग्रीकांजली,’ ‘चिनी माती’ अशी सारी पुस्तकं वाचकांच्या पसंतीस उतरली. प्रभू ज्ञानमंदिर प्रकल्पाच्या निमित्ताने विवेक सबनीस यांनी मीना प्रभू यांच्याशी साधलेला संवाद...

- मीनाताई, ‘प्रभू ज्ञानमंदिर’ या प्रकल्पाच्या संकल्पनेविषयी सांगा... 
- आम्ही समाजाचे देणे लागतो. ज्या समाजाने आम्हाला भरभरून दिले, त्याला काही प्रमाणात का होईना आपण परत दिले पाहिजे अशी माझी ठाम धारणा आहे. माझ्या व आमच्या कुटुंबाचा पुण्याशी असणारा संबंध जुना आहे. पुणे ही ज्ञानाची गंगोत्री आहे. तिथे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित किंवा ‘मल्टिमीडिया’चा वापर करून, ‘किंडल’चा वापर करता येईल अशी छान डिजिटल लायब्ररी करावी असे माझ्या मनात होते. त्यासाठी लोकमान्य मल्टिपर्पज  को-ऑपरेटिव्ह सोसायटीची दोन हजार चौरस फुटांची जागा या संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ संपादक किरण ठाकूर यांच्यामुळे उपलब्ध झाली. माझे पती सुधाकर प्रभू यांचे वडील व माझे सासरे दिवंगत श्रीरंग रघुनान प्रभू यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही ‘प्रभू ज्ञानमंदिरा’ची उभारणी केली आहे. माझ्या सासऱ्यांचे आयुष्य अत्यंत खडतर गेले. त्या काळात ते वकील झाले आणि कोर्टात काम करू लागले. आपल्या कामाशिवाय त्यांनी ‘विद्यावृद्धी समाज’ या उपक्रमाद्वारे शिक्षण व शिष्यवृत्त्या मिळवून देण्यासाठी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना खूप मदत केली. दानशूर व्यक्तींना ते स्वत: पत्रे लिहित असत. व्यवसायाने वकील असलेल्या श्रीरंग प्रभू यांनी नोकरीच्या वेळेनंतर दररोज हे काम सातत्याने ३० वर्षे केले. ते एक प्रकारचे ‘अनसंग हिरो’ किंवा विस्मरणातले नायकच होते! त्यांच्या कामापासून प्रेरणा घेऊनच आम्ही ‘प्रभू ज्ञानमंदिरा’ची उभारणी कोणताही नफा मिळवण्याचे उद्दिष्ट डोळ्यांपुढे न ठेवता केली आहे. भविष्यात यापेक्षा मोठी जागा मिळाली, तर तिथेही हा उपक्रम रवींद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनच्या धर्तीवर चालू ठेवण्याचा आमचा मानस आहे.

- तुमचे बालपण पुण्यात गेले, कॉलेज शिक्षणही येथेच झाले. वाचन व लेखनाचे वेड तुम्हाला त्याच वयापासून होते? 
- मी पुण्यातील ३७, नागेश पेठ म्हणजे सध्याच्या रास्ता पेठेत राहत होते. पतंगे यांचे ते दुमजली घर. घरात माणसांचा खूप राबता असायचा. मावशी व मामेभावंडांसोबतचे ते दिवस आजही मला छान आठवतात. याच भागातील आगरकर हायस्कूलमध्ये आणि पुढे एस. पी. कॉलेजमध्ये मी शिकले. त्यानंतर बी. जे. मेडिकल कॉलेजातून डॉक्टर झाले. १९६६मध्ये विवाह झाल्यानंतर मी एकदम लंडनला उडी घेतली! शाळेत मी पुस्तकी किडा होते! वाचायची खूप आवड आणि शाळेजवळच्या श्री ग्रंथालयाया सभासदत्वामुळे तिथली पुस्तके मी झपाटल्यासारखी वाचून काढत असे. अधिकृतपणे लेखनाला मी तशी उशिरा सुरुवात केली. आतापर्यंत एकंदर १४ पुस्तके लिहून झाली आहेत.

- प्रवासवर्णन हा तुमचा आवडीचा विषय आहे. याबाबत तुम्ही कोणापासून प्रेरणा घेतलीत, की जसे वाटले तसे लिहित गेलात? 
- मी खूप प्रवासवर्णने वाचली आहेत. मराठीतले पहिले प्रवासवर्णन असलेले गोडसेभटजींचे ‘माझा प्रवास’ हे पुस्तक मी वाचले आहे. ते स्वत: पानिपतच्या युद्धाचे साक्षीदार होते. त्यामुळे त्या प्रवासवर्णनाला एक जिवंतपणा आला आहे. ‘पुलं’चे ‘अपूर्वाई’ मी तीन वेळा वाचले होते. गंगाधर गाडगीळ व बाळ सामंतांची प्रवासवर्णनेही वाचली. या साऱ्यांचे माझ्यावर भाषिक संस्कार झाले. असे असले, तरी यापूर्वी जी प्रवासवर्णने लिहिली गेली, त्यापेक्षा वेगळे लिहायचे, असे मी मनाशी पक्के ठरवले होते. माझ्या दृष्टीने आपण केलेले केवळ प्रवासवर्णन न होता, तो एक रसरशीत असा जिवंत प्रवासानुभव व्हायला हवा! माझ्या मते प्रवासवर्णनात तुम्ही पाहिलेली व अनुभवाला आलेली माणसे पाहताना तुम्ही जितके सत्याच्या जवळ जाता, तितके ते लेखन वाचकांना जास्त भिडते.

- तुमचे पहिले प्रवासवर्णन कसे लिहिले गेले? 
- लग्नानंतरची माझी पंचवीस वर्षे लंडनमध्येच गेली होती. पु. ल. देशपांडे, गाडगीळ व सामंतांची पुस्तके वाचल्यावर मी मनाशी पक्के ठरवले, की आपण यातील कशाचीच नक्कल करायची नाही. आपले स्वत:चें असे वेगळे त्यातून दिसले पाहिजे. प्रवासवर्णनातील बारकावे, अनुभवाचा जिवंतपणा व त्या भागाचा इतिहास-भूगोल याचाही अभ्यास मी सुरू केला. ‘माझं लंडन’ हे पहिले प्रवासवर्णन या भूमिकेतूनच साकारले. 

- लंडनवरचे तुमचे पुस्तक वाचताना लंडन हे एक मानवी व्यक्तिमत्त्व वाटावे इतके ते रसरशीतपणे उभे राहिले आहे. ही किमया कशी साधलीत? 
- यापूर्वी लंडनवर लिहिलेली हजारो पुस्तके मी डोळ्यांखालून घातली. पंचवीस वर्षांच्या दीर्घ वास्तव्यामुळे या शहरात मी हळूहळू गुंतत गेले होते. लंडनची माहिती सांगणाऱ्या अनेक पदयात्रांमध्ये मी आवर्जून सहभागी झाले होते. यातून या शहराची ऐतिहसिक, तसेच सांस्कृतिक पार्श्वभूमी समजावून घ्यायला खूप मदत झाली. या शहराचे भौगोलिक बदल सांगणारे मायकेल फॉक्स यांच्यासारखे माहीतगार मित्रही मला मिळाले. त्याच्या इंग्रजीवरून मी चटकन मराठीत त्याचा अनुवाद करत असल्याचे पाहून, मी भाषाप्रभू आहे याची त्याला खात्री पटली. मध्य वस्तीतील लाल रंगात रंगवलेला एक गोल मी पाहिला; पण त्याचा नेमका अर्थ काय हे त्याने सांगितले. १६६५मध्ये याच ठिकाणी असलेल्या विहिरीतील पाण्यामुळे लंडनमध्ये सर्वत्र कॉलरा पसरला होता, त्याचे हे चिन्ह! अशी अनेक प्रकारची अद्भुत माहिती मला या पुस्तकात घालता आली. 

- प्रवासवर्णने लिहिण्यासाठी आणखी कशाचा उपयोग झाला? 
- माझा मुलगा तुषार याच्या शाळेने त्याची इंग्लंडच्या इतिहासावरील परीक्षेला बसण्यासाठी निवड केली. विशेष म्हणजे तो या परीक्षेत ‘यूके’मध्ये दुसरा आला. त्याचा अभ्यास घेण्याच्या निमित्ताने माझाही या देशाचा १०६६ ते १९६६ अशा प्रदीर्घ कालखंडाचा खोलवर अभ्यास झाला. इतर पुस्तकांच्या बाबतीतही माझे पती सुधाकर प्रभू यांच्याबरोबर होणाऱ्या भरपूर प्रवासांमुळे मनसोक्त फिरता आले. त्यांच्या कॉन्फरन्समध्ये ते रमायचे, तेव्हा मी टॅक्सीने ते जिथे, ज्या देशात जात तो भाग भटकून यायचे. उदाहरणार्थ, हॅरोड्सला जाऊन मी तिथली शाळा व तळे बघितले. पार्लमेंट हाउस, हाउस ऑफ लॉर्डस्, कोहिनूर हिरा असणारे म्युझियम अशी अनेक स्थळे पाहताना त्याच्याशी संबंधित माहिती विविध अंगांनी गोळा करता आली. 

- प्रवासवर्णन करणारे तुमचे आवडते लेखक कोण?  
- अठराव्या शतकाच्या अखेरीला किंवा एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला ‘अरेबियन नाइट्स’ लिहिणाऱ्या रिचर्ड बर्टन यांचे लिखाण मला खूप आवडले आहे. त्यांना तर शापित यक्ष म्हणत. या माणसाला जगातील अनेक भाषा येत होत्या. माझ्या महितीनुसार हा माणूस मराठीही अस्खलित बोलत असे! ज्या प्रांतात ते जात, तेथील भाषा व रीतिरिवाज शिकून घेत  व त्यांच्यासारखे वागत व जगत असत. रोज ते नवे हजार शब्द शिकत आणि त्याचा वापर आपल्या बोलण्यातून व लिखाणातून करत असत. हज यात्रेतही ते सामील झाले होते. त्यासाठी त्यांनी स्वत:च्या त्वचेचा व केसांचा रंगही बदलला होता! पण एका किरकोळ चुकीमुळे ते पकडले गेले. त्यांच्या प्रवासवर्णनात एक विलक्षण जिवंतपणा व त्या त्या भाषिक व संस्कृतीचा गंध असे. 

- आगामी काळात तुमची कोणती नवीन प्रवासवर्णने आम्हाला वाचायला मिळणार आहेत? 
- सध्या दोन पुस्तके डोळ्यांपुढे आहेत. एक मुंबई ते खाली श्रीलंका हा प्रवास आणि याच प्रवासाचा भाग म्हणून आशियातील जपान व थायलंड अशी ही दोन पुस्तके असून, त्यांची जुळवणी सध्या सुरू आहे. ‘अपूर्वरंग’ असे एक नाव द्यायचे मी ठरवले आहे. हे सारं पूर्ण व्हायला वेळ लागेल.

- प्रभू ज्ञानमंदिर प्रकल्पाला व तुमच्या पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
- धन्यवाद!
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search