Next
‘लिज्जत पापड’ने उभारले महिलांचे नेतृत्व
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन
BOI
Friday, December 07, 2018 | 05:24 PM
15 0 0
Share this article:

मृणाल कुलकर्णी यांना ‘लिज्जत रत्न’ पुरस्कार प्रदान करताना (डावीकडून)प्रतिभा सावंत, सुमन दरेकर,अनिता दाते, स्वाती पराडकर, सुशीलकुमार शिंदे, मृणाल कुलकर्णी, सिंधुताई सपकाळ, रामदास फुटाणे, उल्हास पवार, सचिन इटकर.

पुणे : ‘महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे, असे नेहमी बोलले जाते; परंतु प्रत्यक्षात महिलांचे नेतृत्व उभारण्याचे काम ‘लिज्जत पापड’ने केले आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख देण्यासह स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम ‘लिज्जत पापड’ने केले. महिलांना स्वयंरोजगार कसा द्यावा, याचे उत्तम उदाहरण लिज्जत पापडच्या रूपाने आपल्यासमोर आहे’, असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.

श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या महोत्सवात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांना ‘लिज्जत रत्न’ पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, काँग्रेसचे नेते अभय छाजेड, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, अभिनेते राहुल सोलापूरकर, खासदार वंदना चव्हाण, युएसके फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. उषा काकडे, सचिन ईटकर, संस्थेच्या अध्यक्षा स्वाती पराडकर, संचालिका सुमन दरेकर, चेतना नहार, कमल कोळगे, मंदाकिनी डावखे, रत्नमाला जाधव, विमल कांबळे उपस्थित होते. या वेळी राहूल सोलापूरकर यांचा ‘प्रभात ते सैराट’ हा मराठी चित्रपट सृष्टीच्या प्रवासावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले, ‘घरात असणाऱ्या महिलांच्या हाताला रोजगार देण्याचे काम लिज्जत पापडने केले आहे. आज लिज्जत पापडच्या कुटुंबात ५० हजारपेक्षा जास्त महिला काम करत आहेत. या उद्योग समूहाचे नेतृत्व महिलांच्या हाती असल्याने त्याचे नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे. शिवाय, महिलांमधील नेतृत्वगुण विकसित होत आहेत. आगामी काळातही हे काम असेच सुरू राहावे.’

सिंधूताई सपकाळ म्हणाल्या, ‘महिलांना सन्मान आणि आत्मविश्वास देण्याचे काम ‘लिज्जत’ने केले आहे. दिवसभर कष्ट करून आपल्या संसाराला हातभार लावणाऱ्या बायकोचे कौतुक करण्याची सवय नवऱ्याने लावावी. त्यातून नात्यातील गोडवाही वाढेल. आपल्या कुटुंबातील आपण प्रमुख आहोत याच आत्मविश्वासाने आपण आयुष्य जगले पाहिजे. कुटुंबाची काळजी घेताना स्वत:ची काळजी घेणे पण तितकेच गरजेचे आहे.’

मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘लिज्जत’चा हा पुरस्कार म्हणजे माहेरची साडी मिळाल्याचा आनंद आहे. जगभरात आपल्या उद्योगाची ख्याती पसरविणाऱ्या ‘लिज्जत’वर चित्रपट बनावा. विविध अनुभवांचा सामना करीत या महिलांनी स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले आहे. आपल्याप्रमाणेच मुलीला आणि सुनेलाही घडवावे. त्यांची प्रेरणा बनावे.’

अनिता दाते म्हणाल्या, ‘लहानपासून लिज्जत पापडची जाहिरात पाहत आले आहे. ती जाहिरात पाहून पापड खायची नेहमीच इच्छा व्हायची. इतकंच नव्हे, तर ‘राधिका’ साकारतानाही तुमच्या सर्वांकडून प्रेरणा मिळते. प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठी, स्वत:साठी काम करते. त्यातूनच ती प्रमुख बनते.’
 
या वेळी ‘लिज्जत पापड’तर्फे सिंधूताई सपकाळ यांच्या ममता बालसदन संसथेला तीन लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला. प्रास्ताविक स्वाती पराडकर यांनी केले. माया प्रभुणे यांनी सूत्रसंचालन यांनी केले. सुरेश कोते यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search