Next
ऋषिमुनींच्या सत्याचा आधुनिक प्रत्यय
BOI
Monday, February 18, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

आपला संवाद स्थानिक भाषेमध्ये होतो की परदेशी भाषेत होतो, यावरून आपल्या मेंदूचे कार्य बदलते, असे एका ताज्या संशोधनातून पुढे आले आहे. आपली भाषा भावनिक बंध निर्माण करते, याचाच अर्थ ती दोन मनांमध्ये समानता निर्माण करते. ऋषिमुनींनी पुरातन काळी सांगितलेल्या सत्याचा हा आधुनिक काळात आलेला प्रत्ययच होय.
.........
समानी व आकूति: समाना हृदयानि व: ।
समानमस्तु वो मनो यथा व: सुसहासति ।।

ऋग्वेदातील हा एक प्रसिद्ध श्लोक. याचा अर्थ असा - तुमचे संकल्प, निश्चय आणि भावना एकसमान असाव्यात. तुम्हा लोकांची हृदये समान व्हावीत. तुम्हा लोकांची मने समान असावीत, जेणेकरून परस्परांचे कार्य सर्वत्र एकत्रच उत्तम प्रकारे होऊ शकेल.

दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांशी बोलतात, तेव्हा त्या केवळ शब्दांचे आदानप्रदान करत नाहीत, तर मनापासून एकमेकांशी जोडल्या जातात. त्यामुळे त्यांच्या भावनाही एका पातळीवर येतात. किमान उत्तम संवादात तरी असे होते. यालाच आजकालच्या भाषेत ‘वेव्हलेंग्थ जुळणे’ असे म्हणतात. हेच आधुनिक सत्य प्राचीन ऋषीमुनींनी प्रार्थनेच्या किंवा ऋचेच्या स्वरूपात ऋग्वेदात मांडले आहे. अन् हे विचार जुळण्यासाठी किंवा मने जुळण्यासाठी सर्वोत्तम माध्यम कोणते - तर ते भाषा!

आधुनिक संशोधनांनी या सत्याला पुन्हा उजळणी तर दिली आहेच, शिवाय त्यावर मान्यतेची मोहोरही उमटवली आहे. आपला संवाद स्थानिक भाषेमध्ये होतो की परदेशी भाषेत होतो, यावरून आपल्या मेंदूचे कार्य बदलते, असे एका ताज्या संशोधनातून पुढे आले आहे.

अमेरिकेतील सॅन सेबॅस्टियनमधील ‘बास्क सेंटर ऑन कॉग्निशन, ब्रेन अँड लँग्वेज’ (बीसीबीएल) या संस्थेच्या तज्ज्ञांनी हे संशोधन केले आहे. ‘कोर्टेक्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ टोरांटो (कॅनडा) आणि माद्रिद येथील नेब्रिजा विद्यापीठ यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने हे संशोधन करण्यात आले आहे. ‘बीसीबीएल’चे अलेजांद्रो पेरेझ यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले.

दोन व्यक्ती जेव्हा एकमेकांशी बोलतात, त्या वेळी त्यांचे मेंदू एकाच वेळी कार्य करायला सुरुवात करतात. ते एकमेकांशी मेळ साधतात आणि त्यांच्यात एक अद्वितीय बंधन निर्माण होते.

मज्जाशास्त्रात (न्यूरोसायन्स) यालाच मेंदूचे सिंक्रोनायझेशन असे म्हणतात. आपण संवादासाठी कोणती भाषा वापरतो, यावर मेंदूचे हे कार्य अवलंबून असते, याला आता शास्त्रज्ञांनी दुजोरा दिला आहे.

वेगवेगळ्या भाषांच्या वातावरणात मेंदूच्या लहरींचे सिंक्रोनायझेशन कसे होते याचे विश्लेषण शास्त्रज्ञांनी केले. त्यातून तज्ज्ञांनी असा निष्कर्ष काढला, की ज्या पद्धतीने दोन मेंदूंच्या क्रियेत सिंक्रोनायझेशन होते किंवा ते समान पद्धतीने काम करतात, ते संभाषणात वापरल्या जाणाऱ्या भाषांवर अवलंबून असते. ‘दोन मेंदूंमधील सर्वोत्तम मेळ असणारे भाग हे संभाषणात मूळ भाषेचा वापर केला जात आहे अथवा परकीय भाषेचा वापर केला जात आहे यानुसार वेगवेगळे असतात,’ असे या शास्त्रज्ञांना आढळले.

यापूर्वी शास्त्रज्ञांनी २०१७मध्ये एक संशोधन केले होते. त्यात आपल्या मूळ भाषेत बोलणाऱ्या दोन व्यक्तींच्या संवादातील मेळाचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला होता.

याच विषयावरून आणखी एका संशोधनाबद्दल सांगायला हरकत नाही. आपण बोलण्यासाठी जी भाषा वापरतो, त्यावरून आपले नैतिक निर्णय बदलतात, असे त्या संशोधनात आढळले होते.

शिकागो विद्यापीठ आणि बार्सिलोनामधील पोम्पेऊ फेबरा विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञांनी ते संशोधन केले होते. परकीय भाषेचा वापर करणारे लोक जेव्हा नैतिक द्विधा परिस्थिती निर्माण होते, तेव्हा उपयुक्ततावादी दृष्टिकोन बाळगतात आणि मोठ्या प्रमाणावरील लोकांसाठी जे चांगले आहे, त्याचे मूल्यमापन करन निर्णय घेतात, असे त्या संशोधनात आढळले होते.

शिकागो विद्यापीठातील मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक बोएज कीसार यांनी त्या संशोधनाचे नेतृत्व केले होते. ‘आजच्या जागतिकीकरण झालेल्या जगात या संशोधनाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. कारण खूप लोक आपल्या मूळ, तसेच परदेशी भाषांमध्ये नैतिक निर्णय घेतात,’ असे कीसार यांनी तेव्हा म्हटले होते. म्हणजेच ते कोणत्या भाषेत निर्णय घेतात यावरून त्यांचा निर्णय फिरू शकतो.

त्यासाठी त्यांनी उदाहरण दिले होते न्यायालयात ज्युरी म्हणून काम करणाऱ्या स्थलांतरित व्यक्तीचे. अशी व्यक्ती मूळ इंग्रजी भाषकापेक्षा वेगळ्या पद्धतीने निर्णय घेण्याकडे झुकू शकते, असे त्यांनी म्हटले होते.

‘त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघ, युरोपियन युनियन, मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या किंवा गुंतवणूक कंपन्यांसारख्या ठिकाणी होणाऱ्या विचारविमर्शाचा अर्थ लावण्यात किंवा अंदाज बांधण्यास या शोधाद्वारे मदत होईल,’ असे त्या संशोधनातील प्रमुख शास्त्रज्ञ अल्बर्ट कोस्टा तेव्हा म्हणाले होते.

सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर स्वभाषेत बोलणारी माणसे अधिक भावनिक निर्णय करतात, तर परकीय भाषा वापरणारे लोक अधिक व्यवहारवादी निर्णय घेतात, असा त्याचा मथितार्थ होता. याच शास्त्रज्ञांच्या गटांनी आर्थिक निर्णयावरील भाषेच्या परिणामाचाही अभ्यास केला होता आणि त्यातही जवळपास असेच निष्कर्ष आले होते.

आपली भाषा ही भावनिक बंध निर्माण करते, याचाच अर्थ ती दोन मनांमध्ये समानता निर्माण करते. वर उल्लेख केलेल्या शास्त्रज्ञांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे त्यांच्या मेंदूचे सिंक्रोनायझेशन चांगले होते.

याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे म्हणी आणि वाक्प्रचार. कोणत्याही देशाच्या किंवा भाषेतील म्हणी या त्या समाजाचे प्रतिबिंब असतात, असे म्हटले जाते. त्या त्या समाजाच्या संस्कृतीमधले शहाणपण तिच्यात साठवलेले असते. तंत्रज्ञानाच्या भाषेत सांगायचे, तर एका-एका म्हणीत ज्ञानाचे एन्क्रिप्शन केलेले असते आणि ते पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केले जाते. प्रत्येक भाषेत असे शब्दसमूह असतात, त्यांचा अर्थ शब्दकोशाने लागत नाही, तर त्या संस्कृतीत एकरस झाल्यावरच तो अर्थ लागतो.

उदाहरणार्थ, इंग्रजीत मुसळधार पावसाला ‘इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स’ असे म्हणतात. आता त्याचा अर्थ ‘उंदीर-मांजरे कोसळतायत,’ असा अर्थ लावून चालत नाही. त्याचप्रमाणे एखादा परभाषक मराठी शिकत असला तर त्याला आधी ‘मुसळ’ या शब्दाचा अर्थ शिकावा लागेल व मगच त्याला मुसळधार म्हणजे काय, याचा अर्थ कळेल.

त्याचप्रमाणे बंगालीत ‘अकाले बाढे सकाले मरते’ अशी एक म्हण आहे. अवेळी आलेला पूर लवकर ओसरतो, असा त्याचा अर्थ. आता या म्हणीमध्ये बंगालमधील नद्यांचे जाळे, तेथे वारंवार येणारा पूर, तसेच पावसाळ्यातील पूर आणि अन्य वेळचा पूर यांच्यातील फरक अशा अनेक गोष्टी चार शब्दांत समाविष्ट आहेत. कुठल्याही बंगाली भाषकाला त्या सगळ्या समजावून सांगाव्या लागत नाहीत.

म्हणजे, ऋषिमुनींच्या भाषेत ‘समानमस्तु वो मनो’ अशी त्यांची अवस्था असते. त्यांची मने समान झालेली असतात. शास्त्रज्ञांच्या भाषेत त्यांचे सिंक्रोनायझेशन झालेले असते. त्यामुळे ही समज त्यांच्यात आपोआप येते. त्यावर परभाषेचे कलम करण्याची गरज नसते. हा स्वभाषेचा परिणाम आहे. हे स्वभाषेचे संचित आहे. हे संचित जपणे ही आपली जबाबदारी आहे.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search