Next
इतिहासाच्या पाऊलखुणा जपण्याची ठाणेकरांची मागणी
मिठबंदर रस्त्याचे काम करताना आढळला ब्रिटिशकालीन रेल्वे रुळ
प्रशांत सिनकर
Thursday, January 10, 2019 | 04:00 PM
15 0 0
Share this story

मिठबंदर रस्त्याचे खोदकाम करताना आढळलेला ब्रिटिशकालीन रेल्वे रुळ.ठाणे : ठाणे पूर्व भागातील मिठबंदर रस्त्यावर ठाणे महानगरपालिकेचे रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी खोदकाम करताना सुमारे १०० वर्षांपूर्वीचा ब्रिटीशकालीन रेल्वे रूळ सापडला असून, तो साधारण १०० फूट लांबीचा आहे. सध्या सर्वच शहरे स्मार्ट सिटी होण्याच्या दृष्टीने कात टाकत असतानाच जुन्या ठाण्यातील हे वैभव लुप्त होऊ नये, इतिहासाच्या पाऊलखुणा जपल्या जाव्यात, अशी मागणी ठाणेकरांकडून केली जात आहे.

भारतीय इतिहासात कोरून ठेवणारा क्षण म्हणजे १८५३मध्ये भारतातील पहिली रेल्वे वाडीबंदर ते ठाणे अशी धावलेली पहिली रेल्वे. याच रेल्वेचे ब्रिटिशकालीन अवशेष रस्ता खोदकाम करताना आढळून आले आहेत. देशातील १०० शहरे स्मार्ट होणार आहेत. त्यासाठी केंद्राकडून कोट्यवधींचा निधी मंजूर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील रस्ते चकाचक करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. ठाणे पूर्व कोपरी मिठबंदर रोड, गणपती विसर्जन घाट परिसरात ठाणे महापालिकेच्या वतीने रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असतानाच कामगारांना रस्त्याच्या खाली रेल्वेचा ब्रिटिशकालीन रेल्वे रूळ आढळून आला आहे. ठाण्याचा इतिहास सांगणारा हा ठेवा जतन करणे आवश्यक असताना तो मातीमोल अवस्थेत आढळून आला आहे.

ठाण्यात पहिली रेल्वे धावल्यानंतर पुढच्या काळात रेल्वेचे विस्तारीकरण मिठबंदर रोड येथे झाले. कोपरी येथे मिठाची आगर होती. त्यामुळे मीठ वाहून नेण्यासाठी रेल्वे मालगाडी येत होती. साधारण १९७० ते ८०च्या दशकापर्यंत ही मालगाडी येत असे; परंतु काळाच्या ओघात मिठागरे बंद पडल्याने या वाहतूक मार्गाकडे दुर्लक्ष झाले. कालांतराने या रुळावरच माती आणि डांबर टाकून रस्ते बनविण्यात आले. प्रत्यक्षात देशातील पहिल्या रेल्वे वाहतुकीचा हा ठेवा जतन करणे आवश्यक असतानाच त्याकडे सोयीस्करपणे कानाडोळा करण्यात आला.

दरम्यान मिठबंदर येथे चिमजीआप्पा यांच्या काळापासून ठेवण्यात आलेल्या तोफांचीही दुरवस्था झाली असून, अनेक तोफा खाडीच्या गाळात गडप झाल्या आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेने ठाणे स्मार्ट करताना ठाण्याचे ऐतिहासिक वैभव जपणे गरजेचे असल्याची मागणी ठाणेकरांकडून केली जात आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link