Next
‘पालकांनी मुलांना अपेक्षापूर्तीचे साधन समजू नये’
‘जीजीपीएस’मधील पालक कार्यशाळेत सुहास विद्वांस यांचे प्रतिपादन
BOI
Saturday, October 13, 2018 | 02:14 PM
15 0 0
Share this story

‘जीजीपीएस’मध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना रत्नागिरी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुहास विद्वांस.रत्नागिरी : ‘ज्या गोष्टी शिकताना आपल्याला आनंद मिळतो, तेच शिक्षण, ही शिक्षणाची सोपी व्याख्या आहे. शिक्षण घेताना मुलांना त्यातून आनंद मिळाला पाहिजे. अनेकदा पालक आपल्या इच्छा मुलांवर लादतात. आपण नाही केले, म्हणून मुलांनी ते करावे अशी त्यांची अपेक्षा असते. याच नादात ते मुलांचे करिअरही ठरवतात. मुलांना आपल्या अपेक्षापूर्तीचे साधन समजू नये. मुलांचे आयुष्य स्वतंत्र आहे, याचे भान पालकांनी बाळगले पाहिजे,’ असे प्रतिपादन रत्नागिरी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी सुहास विद्वांस यांनी केले.

‘शिक्षण कशासाठी’ या विषयावर रत्नागिरीतील ‘श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूल’मध्ये (जीजीपीएस) १३ ऑक्टोबर २०१८ रोजी पालकांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी विद्वांस बोलत होते. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण यांच्यासह पालक-शिक्षक संघाचे प्रतिनिधी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

विद्वांस म्हणाले, ‘आपण मुलांना शाळेत का पाठवतो याचा विचार केला, तर १० टक्के पालकांनाही हे खात्रीने सांगता येणार नाही. ९० टक्के मुले पालकांनी पाठवले म्हणून शाळेत येतात. शिक्षणातून आनंद तर मिळालाच पाहिजे; पण त्याहीपेक्षा ते भीतीमुक्त करणारे असावे. वर्षाच्या शेवटी परीक्षेचा ताण, दबाव नसेल, तेव्हाच मुले शिक्षणाचा आनंद घेऊ शकतील. हल्ली मुलांना परीक्षेतील गुणांची भीती घातली जाते. त्यामुळे कमी गुण मिळाले, तर मुलांमध्ये नैराश्य येते. गुणांपेक्षाही तुम्ही आयुष्यात काय करता याला खूप महत्त्व आहे. गुण हे केवळ पुस्तकी माहितीवर मिळतात. ते तुमची योग्यता ठरवत नाहीत. आपण मुलांना जगण्याची क्षमता देऊ शकलो, तर आपण मुलांना चांगले शिक्षण दिले, असे मी मानतो.’

सुहास विद्वांस यांचे स्वागत करताना प्रतापसिंह चव्हाण.‘शाळा असो किंवा कुठलाही क्लास, पालक आपल्या मुलांची, त्यांच्या गुणांची तुलना दुसऱ्या मुलांबरोबर करतात. हल्ली सर्रास हे चित्र सगळीकडे पाहायला मिळते. तुलना करून आपण त्यांच्या शिक्षणाचे नुकसान करत असतो हे पालकांच्या लक्षात येत नाही. बऱ्याचदा पालक शाळेला दोष देतात, शाळा पालकांना दोष देते, विद्यार्थी शिक्षकांना दोष देतात; पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, की शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हे तीन घटक एकत्र आले, तरच शाळा बनते. शाळा ही केवळ शिक्षक, केवळ पालक किंवा केवळ विद्यार्थ्यांचीच नाही. म्हणून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी या तिन्ही घटकांचे एकत्रित योगदान लागते,’ असे विद्वांस यांनी नमूद केले.

‘शाळेमुळे मुलांची समाजाशी ओळख होते. आपल्या सोबत असणाऱ्यांशी कसे वागावे, कसे बोलावे याचे ज्ञान ती इथे घेत असतात. मुलांनी शाळेत फक्त भूगोल, इतिहास शिकायला यायचे नाही, हे पालकांनाही समजण्याची गरज आहे. मुलांचे केवळ गुणपत्रक बघत असाल, तर तुमचे कुठेतरी चुकत आहे. मुलांच्या भावना विकसित झाल्या नाहीत, तर त्यांच्या गुणपत्रकावर कितीही गुण असले तरी ती माणूस म्हणून शून्य होतील, हे पालकांनी समजून घ्यावे,’ असा सल्ला विद्वांस यांनी पालकांना दिला.

प्रास्ताविक करताना प्रताप प्रतापसिंह चव्हाण. शेजारी सुहास विद्वांस आणि शिक्षिका समिधा बाष्टे.

प्रास्ताविक करताना शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण म्हणाले, ‘आजच्या काळात मुलांना किंवा पालकांना शिक्षणाची गरज नेमकी कशासाठी आहे - नोकरी मिळवण्यासाठी, पैसे कमावण्यासाठी, चांगल्या नोकरीसाठी, उत्तम नागरिक बनण्यासाठी की आनंदी जीवनासाठी - याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना या मुद्द्यांवर मते देण्यास सांगण्यात आले होते. मुलांबरोबरच पालकांनाही ‘शिक्षण नेमके कशासाठी’ याबाबत मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केली होती.’

शिक्षिका समिधा बाष्टे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Vijay Atmaram Pandit About 11 Days ago
माननीय विध्वंस साहेबांचे विचार प्रत्येक पालकाच्या मनात रूजवले गेले पाहिजेत . तरच ही अंकुरणारी मने बहरतील . अन्यथा परिणाम वेगळेच भोगावे लागतील
0
0

Select Language
Share Link