Next
‘खरे लेखन हे चित्रासारखे...’
BOI
Wednesday, February 07 | 12:45 PM
15 0 0
Share this story

९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख
‘खरे लेखन हे चित्रासारखे असते. आपल्या प्रतिभेने आपले अंतरंग आपण त्यात मिसळत असतो,’ असे माजी सनदी अधिकारी आणि लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांना वाटते. बडोद्यात येत्या १६, १७ आणि १८ फेब्रुवारी होणार असलेल्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ते भूषविणार आहेत. त्यानंतर दहा दिवसांनी, २७ फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिनही येतो आहे. या पार्श्वभूमीवर, ‘बाइट्स ऑफ इंडिया’चे प्रसन्न पेठे आणि प्राची गावस्कर यांनी देशमुख यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी मराठी भाषेच्या अनुषंगाने अनेक विषयांवर मनमोकळी मते मांडली. त्यांच्याशी साधलेल्या संवादाचा हा सारांश... 
......
प्रशासकीय अधिकारी असूनही तुम्ही केवळ त्या क्षेत्रातील अनुभवांबद्दलच नव्हे, तर वैविध्यपूर्ण लेखन केले आहे. त्याचे मूळ नेमके कशात आहे?
- लहानपणापासूनच मला लेखनाची गोडी होती. प्रशासकीय सेवा क्षेत्र मी चरितार्थासाठी स्वीकारले. अर्थात मला लोकांमध्ये मिसळायला आवडते. त्यामुळे लेखक म्हणून संवेदनशील असणे आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणे या दोन्ही बाबी एकमेकांना पूरक ठरल्या. माझ्या प्रशासकीय अनुभाविश्वाने मला लेखक म्हणून समृद्ध केले आणि लेखकाच्या संवेदनशीलतेमुळे लोकांचे दुःख, समस्या मी समजून घेऊ शकलो. त्या उत्तम प्रकारे सोडवू शकलो आणि यशस्वी प्रशासकीय अधिकारी होऊ शकलो. अर्थातच अनुभव नुसते असून चालत नाही, प्रतिभा असली तरच त्या अनुभवांची पुनरर्चना करणे, ते प्रभावीपणे मांडणे शक्य होते. खरे लेखन हे चित्रासारखे असते. आपल्या प्रतिभेने आपले अंतरंग आपण त्यात मिसळत असतो. लोकांचे प्रश्न, मग ते स्थानिक पातळीवरील असोत की जागतिक पातळीवरील, ते मला आव्हान देतात. त्यामुळे मी इतक्या विविध पातळीवरील लेखन करू शकलो. मी म्हणेन, की लेखक विषय निवडत नसतो, तर विषयच लेखकाला निवडत असतात.
 
तुमच्या लेखांतून साहीर, शैलेंद्र यांसारख्या कवींविषयी आणि टॉलस्टॉय, दोस्तोय्व्स्की  यांसारख्या लेखकांविषयी तुमचं प्रेम दिसतं. त्यांच्या साहित्याचा तुमच्या लेखनावर काही परिणाम झालाय का?
- निश्चितच. कारण साहीर आणि शैलेंद्र हे दोघेही ‘प्रोग्रेसिव्ह’ शायर होते. त्यांनी कायम पुरोगामी विचार मांडले. त्यांचे विचार मला खूप जवळचे वाटतात. कारण माझी विचारांची पद्धत किंवा चिंतनाची बैठक त्यांच्या विचारांशी खूप जुळती आहे. मी एका अर्थाने ‘नाही रे’ वर्गाबद्दल लिहिणाऱ्या प्रेमचंद परंपरेचा पाईक आहे. ‘नाही रे’ वर्गाच्या दु:खाची कहाणी सांगून समाजमन जागृत करणे मला महत्त्वाचे वाटते. म्हणूनही मला या सर्वांविषयी प्रेम आहे. 

तुम्ही अफगाणिस्तान संदर्भात ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद’सारखी तब्बल ९०० पानांची महाकादंबरी लिहिलीत. त्यामागे काय विचार होता? तुम्हाला हे का लिहावेसे वाटले? त्यासाठी संशोधन कसे केले?
- मला कायमच आंतरराष्ट्रीय विषयांत रस असतो. अफगाणिस्तानात जेव्हा सत्तांतर होऊन कम्युनिस्ट राजवट आली, तेव्हा मला कुतूहल वाटले होते, की हे कसे शक्य झाले असेल. कारण मुळात तो तर धार्मिक देश आणि तिथे पुरोगामी विचारांचे, जनतेच्या भल्याचे राज्य आले असताना, तो विचार धर्माच्या नावाखाली नंतर का नाकारला गेला, या विचाराने माझ्यातल्या लेखकाला चालना मिळाली आणि मग मी खूप फिरलो. खूप अभ्यास केला. कुराण, कम्युनिझम तपासले आणि मग आठ वर्षांनंतर ही कादंबरी लिहून झाली. 

तुम्हाला गुरुदत्त खूप आवडतो. ‘तू दिल में तो आता है’ असं नाटकही तुम्ही लिहिलंय. गुरुदत्तविषयी काय सांगाल?
- गुरुदत्त हा माझा आवडता कलावंत आहे. मला मीनाकुमारी आणि किशोरकुमार हेही एका अर्थाने अवलिये कलावंत वाटतात. गुरुदत्तचे प्रेमप्रकरण आणि शोकांतिकाही भावते. कलेचे असमाधान, जीवनात जे पाहिजे ते मिळत नाही त्याचे असमाधान आणि जे मिळते आहे ते नको असतानाही मिळते आहे म्हणून आलेले असमाधान अशी विचित्र सरमिसळ असणारा हा मनस्वी कलावंत भुरळ पाडतो. मी त्याच्यावरही लिहीत आहे.

अलीकडे मराठी भाषेचा वापर करताना व्याकरण, शुद्धलेखन यांकडे दुर्लक्ष केले जाते. बोली असो किंवा प्रमाणभाषा, कोणत्याही बाबतीत ही गोष्ट पाळली जात नाही. ‘भावना पोहोचल्या की झाले,’ अशी भूमिका घेतली जाते. याबद्दल तुम्हाला काय वाटते?
- ललित साहित्यात बोलीभाषा वापरणे योग्य वाटते. जिथे आपल्याला ज्ञान द्यायचे आहे, निवेदन आहे तिथे प्रमाणभाषा वापरणेच योग्य आहे. निवेदनाची भाषा ही प्रमाणभाषा आणि त्यात संवाद असतील तर बोलीभाषा वापरायची असा प्रघात आहे. बोलीभाषा आणि प्रमाणभाषा वापरण्याचे  तारतम्य ठेवले पाहिजे. अर्थात, प्रत्येक लेखकाचा विचार याबद्दल वेगळा असू शकतो. दुसऱ्या भाषेतील, पण आपल्या भाषेत प्रचलित झालेले, सहज वापर असलेले शब्द वापरण्यास हरकत नाही. दुसऱ्या भाषेतील शब्द आले, की ती भाषा प्रवाही होते असे म्हणतात. भाषा समृद्ध होण्यासाठी त्या भाषेत आलेले दुसऱ्या भाषेतील, बोलीभाषेतील प्रचलित, रुळलेले शब्द योग्य रूपात प्रमाणित केले पाहिजेत. उदाहरणार्थ, टेबल हा शब्द मराठीत रुळला आहे; मात्र त्याचे अनेकवचन टेबल्स असे होते, ते वापरणे थोडे खटकते. त्याऐवजी ‘टेबलं’ असे त्याचे मराठीकरण चांगले वाटते, ते लेखक, भाषा तज्ज्ञ यांनी प्रमाणित केले पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण न होता एकच शब्द सर्वत्र वापरला जाईल. उर्दूचे उदाहरण घेतले तर, त्यांचे मूळ शब्द तीस ते चाळीस हजार होते. आता ते तीस ते चाळीस लाख झाले आहेत. दर वर्षी ते डिक्शनरी काढून त्यात नवे शब्द देत असतात. या वर्षी त्यांनी ‘आधार’ हा मराठी शब्द घेतला आहे. तो त्या भाषेत वापरण्यास हरकत नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. असे प्रमाणीकरण मराठीतही झाले पाहिजे. अर्थातच, भेसळ ही चवीपुरती असावी. आपल्या भाषेत जे शब्द आहेत, ते न वापरता दुसरेच वापरणे योग्य नाही. त्याकरिता आपणच आग्रही राहिले पाहिजे. डॉ. माशेलकर, डॉ. नारळीकर असे विज्ञान क्षेत्रातील संशोधकदेखील मराठीत बोलताना क्वचितच इंग्रजी शब्दाचा वापर करतात. अत्यंत अस्खलित मराठी बोलतात. ही पद्धत आपण पाळली पाहिजे, तरच आपली भाषा टिकेल. बोलीभाषाही टिकवल्या पाहिजेत. त्यासाठी आपण विविध उपक्रम राबवले पाहिजेत. त्यासाठी बोलीभाषेतील संमेलने घ्यावीत, असे मी सुचवले आहे. तसेच त्या भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांनी त्या भाषेतील म्हणी, वाक्प्रचार, अर्थपूर्ण शब्द जतन केले पाहिजेत. त्याचे दस्तऐवजीकरण केले पाहिजे. त्याचे शब्दसंग्रह तयार केले पाहिजेत. ते मराठीत आणले, त्यांचा वापर लेखकांनी केला, तर त्या बोलीभाषा आपोआपच संवर्धित होतील.

मराठी भाषेवर इंग्रजीचा प्रभाव वाढत आहे. त्याबद्दल काय वाटते?
- मराठी भाषा सर्वच म्हणजे अगदी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येदेखील अनिवार्य केली पाहिजे. महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे. याकरिता मी मराठी विद्यापीठ असावे, असा प्रस्ताव मांडला आहे. आज तरुण मुलांची नाळ मराठीशी जोडलेली राहिली नाही, तर मराठी टिकणार नाही. कालांतराने मराठी बोलणारा महाराष्ट्र राहणार नाही. कुसुमाग्रजांचे ‘भाषा मरता संस्कृती मरते’, हे सांगणे लक्षात ठेवून सर्वांनी मराठी टिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

सरकारी भाषा अत्यंत बोजड असते. त्याबद्दल तुमचे काय मत आहे?
- भाषा चुकत नसते, भाषेचा वापर करणारे चुकत असतात. त्यामुळे सरकारी व्यवस्थेत मराठी भाषेचा वापर होताना ती थोडी तांत्रिक, बोजड वाटते; पण हा भाषेचा नव्हे, तर भाषेचा वापर करणाऱ्यांचा दोष आहे. महाराष्ट्राची भाषा म्हणून मराठीचा स्वीकार करण्यात आला, तेव्हा प्रशासकीय व्यवस्थेत अनेक नवीन मराठी शब्द आणण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक इंग्रजी शब्दांना उत्तम मराठी शब्द सुचवले. ते प्रशासकीय भाषेत वापरण्यात आले. हळूहळू हे शब्द सरावाचे झाले आणि जनमानसातही रुजले. त्या शब्दांचा योग्य वापर करणे ही आपली जबाबदारी आहे. चुकीचे शब्द वापरले, तर भाषेचीच हानी होते, हे लक्षात घेऊन जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. मग सरकारी भाषेतील चुकांचा प्रश्न येणार नाही. 

(लक्ष्मीकांत देशमुख यांची मुलाखत व्हिडिओ स्वरूपात, तीन भागांत ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या यू-ट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे. ते व्हिडिओ सोबत देत आहोत. लक्ष्मीकांत देशमुख यांची पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link