Next
पिरॅमिड्स नक्की बांधले कसे?
BOI
Sunday, June 24, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this story

सकारा पिरॅमिड

जगातील सात महान आश्चर्यांपैकी एक असलेल्या पिरॅमिड्सबद्दलचे कुतूहल हजारो वर्षांनतरही संपलेले नाही. ही अवाढव्य बांधकामे नेमकी कशी केली असतील, याबद्दल नवनव्या संशोधनातून अधिकाधिक माहिती पुढे येत आहे. प्रसिद्ध लेखक रवींद्र गुर्जर यांनी 
‘किमया’ सदरात लिहिलेल्या पिरॅमिड्सबद्दलच्या लेखाचा हा उत्तरार्ध...
.........
चौकोनाकृती पाया आणि वर एका बिंदूपर्यंत जाणाऱ्या त्रिकोणाकृती बाजू हे पिरॅमिडचे वैशिष्ट्य. बहुतांश पिरॅमिड्‌स हे इजिप्तमध्ये उभे असले, तरी प्राचीन मेसोपोटेमिया, मध्य व दक्षिण अमेरिका आणि चीनमध्येही त्या आकाराची बांधकामे आढळून येतात. राजा जोझरने पिरॅमिडच्या आकारात सुधारणा केली. पिरॅमिड म्हणजे मृत राजांच्या चिरनिद्रेसाठी बांधलेले अजस्र शाही दफन! त्या काळी पिरॅमिड्सच्या भोवताली अनेक मंदिरे आणि धर्मगुरूंची निवासस्थाने होती. राजाचे मृत्यूनंतरचे जीवन, पुनर्जन्म घेण्यासाठी अनुकूल वातावरण आणि खगोलशास्त्रीय विचार (ताऱ्यांची दिशा इत्यादी) करून पिरॅमिड्‌स बांधले गेले.

कललेला पिरॅमिड

गिझा येथे पिरॅमिड्‌स बांधकामासाठी वापरलेले तंत्रज्ञान शेकडो वर्षे विकसित होत आले होते. त्या काळात चित्रीकरणाची सोय नव्हती. त्यामुळे एवढे अवाढव्य काम कसे साध्य झाले याचे निष्कर्ष अभ्यासकांना नवनवीन संशोधनानंतरच काढता आले. मुख्य पिरॅमिड्सना अंतर्गत भुयारी मार्ग आणि विविध कक्ष होते. एकात राजाचे ममी बनवून केलेले शाही दफन आणि खाद्यपदार्थांसह मौल्यवान वस्तूंचा साठा आत ठेवला जाई. पायऱ्या-पायऱ्यांच्या पिरॅमिडपासून गुळगुळीत बाजूंपर्यंत त्यात सुधारणा होत गेली. बांधकामावर देखरेख करण्यासाठी एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याची (क्वचित राजाच्या नातलगाची) नेमणूक करण्यात येई. पिरॅमिड्‌सच्या भोवताली मंदिरे, निवासस्थाने आणि व्यापारी संकुले उभारण्याची जबाबदारीसुद्धा त्याच्यावर असे. मूलभूत आराखडे आणि तिरके, अंशात्मक अचूक आणि निर्दोष पद्धतीने केलेले बांधकाम यात इजिप्तचे लोक कमालीचे वाकबगार होते.

तुतानखामेनचा सोन्याचा मुखवटागिझाजवळच्या बंदरात संशोधन केल्यानंतर लक्षात आले, की बांधकामासाठी लागणारे दगड आणि अन्य वस्तू, खाद्यपदार्थ आणि मजूर यांची आवक बोटींमधून जलमार्गाने होत होती. मेनकॉरेच्या पिरॅमिडजवळ ते बंदर होते. त्यानजीकच्या गावात सर्व वस्तू साठवण्याची व्यवस्था होती. मजुरांच्या निवासाची सोयदेखील तिथेच होती. किमान १० हजार लोक तिन्ही पिरॅमिडच्या बांधकामासाठी राबत होते. त्यांच्या खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था ठेवलेली होती. मांसाहारासाठी रोज विविध (खाद्योपयोगी) प्राण्यांची कत्तल होत असे. त्यांच्या हाडांच्या अवशेषांवरून हा निष्कर्ष काढण्यात आला.

गिझाच्या दक्षिणेला काही अंतरावर दगडाची खाण आढळली. तिथूनच मोठमोठे दगड कापून, पिरॅमिडच्या जागेपर्यंत नेण्यात येत असत. दगडांची बाहेरील बाजू घासून गुळगुळीत केली जाई. आज प्रत्यक्ष तिथे गुळगुळीतपणा दिसत नाही. कारण त्या दगडांचा अन्य इमारतींच्या बांधकामासाठी केलेला वापर आणि वर्षानुवर्षे हवामानाचा झालेला परिणाम. भूर्जपत्रावर लिहिलेल्या लेखांप्रमाणे, लाइमस्टोन आजच्या कैरोजवळील (प्राचीन तुराह) खाणींपासून नाइल नदीमधून किंवा कालव्यांमधून कामाच्या जागी होड्यांमधून आणला जाई. एका फेरीला चार दिवस लागत. कामगार तर हजारो होतेच.

तुतानखामेनचा गुप्त कक्षजमिनीवरून दगड नेताना लाकडी ढकलगाड्या वापरल्या जात. घर्षण कमी व्हावे म्हणून पुढच्या बाजूला वाळूत पाणी ओतले जाई. पदार्थवैज्ञानिकांनी अलीकडेच हा शोध लावला. खाणीमध्ये तांब्याच्या हत्यारांनी दगड कोरून काढले जात. अर्थात पिरॅमिड बांधकामासंबंधी मतमतांतरे आहेत. नवनवीन पुराव्यांबरोबर त्यात बदल होत जातो. स्थानिक, जवळपासची गावे आणि अगदी पॅलेस्टाइनपासून कामगार आणले जात. त्यांच्या वसाहतींजवळ त्यांचीही थडगी सापडलेली आहेत. बांधकामाच्या पद्धतींमध्येही कालानुसार बदल (सुधारणा) होत गेले.

जोसेफ डेव्हिडोविट्स नावाच्या एका शास्त्रज्ञाने तर असा दावा केला आहे, की खाणीतून प्रत्यक्ष दगड कापून न नेता, काँक्रीटसारख्या मातीपासून प्रत्यक्ष कामाच्या जागी लाकडी साच्यांचा वापर करून मोठमोठे ‘दगड’ बनवले जात. म्हणजे ते काँक्रीट मूर्ती बनवतात तसे साच्यांमध्ये ओतून काही दिवस ठेवून द्यायचे. आतल्या आत रासायनिक क्रिया होऊन घट्ट, वजनदार दगड बनत असत. वाहतुकीच्या दृष्टीनेसुद्धा दगडांपेक्षा काँक्रीट वाहून नेणे केव्हाही सोयीस्कर जात असणार. तसे प्रयोगही अलीकडे करून पाहिलेले आहेत. तथापि हा सिद्धांत अभ्यासकांनी मान्य केलेला नाही. दहा-दहा टन ग्रॅनाइट ज्या पिरॅमिड्‌समध्ये वापरण्यात आले त्यांचे काय? ते तर खणून आणि तासून काढलेले होते. काहींना असे वाटते, की ही बांधकामे मनुष्यांच्या हातून उभी राहणे अशक्य कोटीतील असून, त्यासाठी परग्रहांवरील ‘देव’ उडत्या तबकड्यांमधून आले असणार!

एक विशेष गोष्ट म्हणजे ‘नोव्हा’ टेलिव्हिजनवरील एका मालिकेतील एका प्रसंगासाठी मॅसॅच्युसेट्‌समधील दोन बांधकाम व्यावसायिकांनी १९९७मध्ये एक पिरॅमिड उभा करण्याचा प्रयोग केला. त्याची रुंदी ३० फूट आणि उंची २० फूट होती. त्यासाठी फक्त ४४ कामगार लागले. चार महिने ते काम चालले.

गिझाच्या पठारावर पाच राजांच्या कारकीर्दीत, १०० वर्षांहून कमी काळात पुढील बांधकामे उभी राहिली. एक ग्रेट पिरॅमिड, खाफ्रे आणि मेनकॉरेचे पिरॅमिड्‌स, प्रचंड स्फिंक्स आणि अन्य देवळे. त्याआधी चार पिरॅमिड्‌स बांधलेले होते. ते म्हणजे सकारा येथील पायऱ्यांचा पिरॅमिड (हा इजिप्तचा पहिला पिरॅमिड), मेडमचा पिरॅमिड, एक झुकलेला पिरॅमिड आणि लाल दगडांचा पिरॅमिड. त्याशिवाय काही देवळे आणि निवासस्थानेही उभी राहिली. गिझा येथील पिरॅमिड्‌स नष्ट करण्याचा प्रयत्न बाराव्या शतकात झाला; परंतु ते काम इतके प्रचंड ठरले, की मेनकॉरे येथे मामुली पडझड सोडली, तर त्या नतद्रष्ट कार्याचा नाद सोडून द्यावा लागला.

प्राचीन ग्रीसमधील पिरॅमिडअशा रीतीने जगप्रसिद्ध पिरॅमिड्‌सचा इतिहास आपण थोडक्यात पाहिला. इ. स. पू. २६७० ते इ. स. पू. ६६४ या काळात १००हून अधिक पिरॅमिड्‌स इजिप्तमध्ये बांधले गेले. अन्य काही देशांतही त्याचे अनुकरण झाले. त्या आकाराची घरे बांधण्याची प्रथाही काही काळ सुरू राहिली.

वैद्यकीय विषयांवर रोमांचकारी कादंबऱ्या लिहिणारा रॉबिन कुक याने ‘स्फिंक्स’ या नावाने काल्पनिक कथेवर आधारित एक सुंदर पुस्तक लिहिले आहे. त्यावर सन १९८१मध्ये दोन तासांचा एक अप्रतिम चित्रपट निघाला. त्यात पिरॅमिडच्या आतील संपूर्ण दर्शन, तिथला खजिना पद्धतशीरपणे लुटण्याची योजना आणि इजिप्तची एक अभ्यासक त्यात कशी अडकते, याचे सुंदर चित्रण केलेले आहे. पिरॅमिड्‌स प्रत्यक्ष बघता आले नाहीत, तर निदान तो चित्रपट आपण अवश्य पहावा. इजिप्तला गेलात तर उत्तमच! (या लेखाचा पूर्वार्ध वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link