Next
विमानप्रवाशांची कोटींची उड्डाणे
गेल्या वर्षात केला १४ कोटी भारतीयांनी विमानप्रवास
BOI
Thursday, January 24, 2019 | 04:15 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली :  दिवसेंदिवस विमानप्रवास करणाऱ्या भारतीयांची संख्या वाढत असून, २०१८ मध्ये तब्बल १४ कोटी भारतीयांनी देशांतर्गत विमानप्रवास केल्याचे स्पष्ट झाले आहे. खासगी विमान कंपन्यांमधील स्पर्धेमुळे स्वस्त दरात विमानप्रवास करण्याची संधी मिळत असल्याने जास्तीत जास्त भारतीय याचा लाभ घेत आहेत. गेल्या वर्षी तब्बल १४ कोटी भारतीयांनी देशांतर्गत विमानप्रवास केला असून, २०१७च्या तुलनेत ही संख्या १८.६ टक्क्यांनी वाढली असल्याची माहिती नागरी हवाई महासंचालनालयाने दिली आहे. 


स्पर्धेमुळे खासगी विमान कंपन्यांना अत्यंत स्वस्त दरात विमानांची तिकिटे उपलब्ध करून द्यावी लागत आहेत. सणासुदीचे दिवस, सुट्ट्या, पर्यटनहंगाम लक्षात घेऊन या कंपन्या विशेष सवलती देतात. यामुळे गेल्या काही वर्षात भारतीय पर्यटक व प्रवाशांचा विमानप्रवासाकडे कल वाढला आहे. २०१७मध्ये देशांतर्गत विमानप्रवास करणाऱ्यांची संख्या ११.७ कोटी होती; मात्र गेल्या वर्षी त्यात १८.६ टक्क्यांनी वाढ झाली व ही संख्या १३.९ कोटींवर पोहोचली असल्याची माहिती  महासंचालनालयाने दिली. 


डिसेंबरमध्ये सर्वाधिक विमान प्रवाशांची संख्या नोंदवण्यात आली. नाताळची सुटी, विविध सवलती यामुळे गेल्या महिन्यात एक कोटीपेक्षा अधिक प्रवाशांनी देशांतर्गत विमान प्रवासाचा आनंद लुटला. हा पर्यटनाचा हंगाम असल्याने या महिन्यात सर्वाधिक प्रवाशांची संख्या नोंदवण्यात आली. यामध्ये सर्वाधिक प्रवासी स्पाईसजेटचे ९२.७ टक्के होते, तर त्याखालोखाल इंडिगोचे ८८.९ टक्के प्रवासी होते. त्यानंतर एअर एशिया, गो एअर आणि एअर इंडियाचा क्रमांक लागतो. या महिन्यात तिकीट रद्द करण्याचा दरही सर्वात कमी म्हणजे केवळ ०.६६ टक्के इतकाच होता.


एकूण व्यवसायात खासगी विमान कंपन्यांमध्ये इंडिगोने आघाडी घेतली आहे. भारतीय विमान व्यवसायातील एकूण उलाढालीमध्ये इंडिगोचा हिस्सा ४१.५ टक्के आहे. सध्या अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या जेट व एअर इंडिया या कंपन्या अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. विमान व्यवसायातील जेटचा वाटा १५.५ तर एअर इंडियाचा वाटा १२.७ टक्के आहे. 

विमानप्रवाशांची संख्या वाढत असली तरी, भारतीय विमान कंपन्या मात्र तोट्यात आहेत. जेट एअरवेज, इंडिगो व स्पाइसजेट या कंपन्यांना विविध कारणांमुळे एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत दररोज २० कोटी रुपयांचा तोटा झाला. चालू आर्थिक वर्षअखेरीस विमान कंपन्यांचा एकूण तोटा आठ हजार ८०० कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता असल्याचे इक्रा या संस्थेने म्हटले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search