Next
फिलिपाइन्स - सु‘संस्कृत’ प्रभावळीतील आणखी एक देश!
BOI
Monday, March 18, 2019 | 06:45 AM
15 1 0
Share this article:फिलिपाइन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्टे यांनी आपल्या देशाचे नाव बदलून महर्लिक असे करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. फिलिपाइन्स हे नाव स्पेनचे राजे फिलिप द्वितीय यांच्या नावावरून दिलेले आहे, तर महर्लिक हा मलय शब्द असून, त्याचा अर्थ स्वातंत्र्य असा आहे. मलय ही संस्कृतचा अत्यंत प्रभाव असणारी भाषा आहे. त्या अनुषंगाने विशेष लेख.. 
......
फिलिपाइन्स हा तसा आपल्या दृष्टीने एक दुर्लक्षित देश आहे. त्याच्याबद्दल भारतात खास चर्चा होण्याचे काही कारणही नाही. या फिलिपाइन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्टे यांनी आपल्या देशाचे नाव बदलून महर्लिक असे करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. ड्युटर्टे यांच्या पूर्वीही फिलिपाइन्सचे नाव बदलण्याची चर्चा झाली होती. देशाचे माजी हुकूमशहा फर्डिनांड मार्कोस यांनी त्या नामांतराचे सूतोवाच केले होते; मात्र त्याला मूर्त रूप आले नाही. फिलिपाइन्समधील मुस्लिमबहुल प्रांत असलेल्या मागुइंडानाओ येथे एका कार्यक्रमात गेल्या सोमवारी ड्युटर्टे यांनी देशाचे नामांतर करण्याचा मनोदय बोलून दाखवला. ‘एक दिवस आपण हे नाव बदलू या. मार्कोस म्हणाले ते बरोबर होते. त्यांना ते नाव बदलून महर्लिक करायचे होते. कारण हा मलय शब्द आहे,’ असे ते म्हणाले.

फिलिपाइन्स हा देश तब्बल ३५० वर्षे स्पेनची वसाहत होता. स्पेनचे राजे फिलिप द्वितीय यांच्या नावावरून त्याला फिलिपाइन्स हे नाव देण्यात आले होते. स्पेन-अमेरिका युद्धात स्पेनचा पराभव झाल्यानंतर ही वसाहत अमेरिकेच्या ताब्यात आली आणि अखेर १९४६मध्ये स्वतंत्र होईपर्यंत फिलिपाइन्स हे अमेरिकेचे राज्य बनून राहिले.

फिलिपाइन्सचे अध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्टेपाश्चिमात्य देशांनी या भूमीला अंकित करण्यापूर्वी म्हणजे तागालोग समाजात महर्लिक हा एक समुदाय होता. सामाजिक उतरंडीत सत्ताधारी मागिनो आणि सामान्य जनतेदरम्यान या समुदायाला जागा होती. उत्कृष्ट योद्धा वर्ग म्हणून या समाजाची ओळख होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मार्कोस यांनी महर्लिक युनिट नावाच्या सैनिकांच्या एका तुकडीचे नेतृत्व करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, असे सांगितले जाते. फिलिपाइन्समध्ये लष्करी राजवट आणल्यानंतर देशात राष्ट्रवादी वातावरण आणण्यासाठी त्यांनी देशाला महर्लिक हे नाव देण्याचे सूतोवाच केले होते.

फिलिपाइन्सच्या संसदेत १९७८मध्ये आणलेल्या एका विधेयकात या नामांतराचा प्रस्ताव होता; मात्र हे विधेयक कधीही लागू झाले नाही. खुद्द मार्कोस यांच्या भ्रष्ट आणि हुकूमशाही शासनाशी संबंधित असल्यामुळे या प्रस्तावित बदलाला नंतर लोकप्रियताही लाभली नाही. आता ड्युटर्टे यांच्या या वक्तव्यामुळे त्या नामांतराने परत उचल खाली आहे. अर्थात ड्युटर्टे यांची देशाचे नाव बदलण्याची सध्या तरी औपचारिक योजना नाही, असे त्यांच्या प्रवक्त्याने सांगितले. तसे करायचेच झाले, तर देशाची राज्यघटना पुन्हा लिहावी लागेल.

आता तुम्ही म्हणाल, की यात असे काय वेगळे आहे? जगातील अनेक देश आपली नावे बदलतात, शहरांची नावे बदलतात. ब्रह्मदेशचे नामांतर म्यानमार झाले, सिलोनचे श्रीलंका झाले, इंडोचायनाचे कम्बोडिया, व्हिएतनाम आणि लाओस झाले इत्यादी. मग फिलिपाइन्सने आपले नाव बदलले, तर त्याची एवढी चर्चा कशाला? फार फार तर नामांतर करणाऱ्या देशांमध्ये आणखी एकाची भर! याचे कारण म्हणजे असे नामांतर झालेच तर ते आपल्या संस्कृत भाषेतील असणार आहे.

याचे कारण म्हणजे मलय भाषा हीच मुळात संस्कृतचा अत्यंत प्रभाव असलेली भाषा आहे. महर्लिक हा शब्द मर्देक या मलय शब्दाचे एक रूप आहे. त्याचा अर्थ आहे स्वातंत्र्य. महर्लिक आणि मर्देक हे दोन्ही शब्द मूळ महर्द्धिक या शब्दाचे अपभ्रंश आहेत, असे विल्यम हेन्री स्कॉट आणि अँथोनी रीड या भाषातज्ज्ञांचे मत आहे. या तज्ज्ञांच्या मते, महर्द्धिक याचा अर्थ अत्यंत समृद्धी, सत्ता किंवा प्रभाव असलेली व्यक्ती. हा शब्द आणि त्याची विविध रूपे संपूर्ण आग्नेय आशियातील देशांमध्ये उच्चभ्रू व्यक्तींसाठी वापरली जात होती, अजूनही वापरली जातात. 

विलियम एडवर्ड मॅक्सवेल यांनी लिहिलेल्या ‘ए मॅन्युअल ऑफ मलय लँग्वेज विथ अॅन इंट्रोडक्टरी स्केच ऑफ दी संस्कृत इलिमेंट इन मलय’ या पुस्तकात दिलेल्या माहितीप्रमाणे, ‘राजदरबार हे मलय राज्यांतील हिंदू प्रभावाचे केंद्र असल्याचे दिसून येते. सत्ताधारी वर्गांतून संस्कृत अभिव्यक्तीचा वापर हळूहळू लोकांमध्ये पसरला. आजही असे काही संस्कृत शब्द आहेत जे केवळ राजघराण्यातील व्यक्तींना लागू होतात. सामान्य वर्गांसाठी त्याच अर्थाचे मूळ शब्द वापरण्यात येतात. पुत्र आणि पुत्री हे शब्द यासाठी उदाहरण म्हणून घेता येतील. संस्कृतमध्ये फक्त ‘मुलगा’ आणि ‘मुलगी’ असा अर्थ असलेल्या या शब्दांना मलय राजदरबारात ‘राजकुमार’ आणि ‘राजकुमारी’ असा अर्थ लाभला आहे आणि हे शब्द केवळ राजांच्या मुलां-मुलींसाठीच वापरले जातात.’

हिंदू संस्कृती आणि संस्कृत भाषा भारतीय उपखंडाला सर्वांत जवळ असलेल्या सुमात्रा बेटांवर आधी पोहोचली; मात्र जावा हे हिंदू संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र बनले आणि तेथील भाषेवर संस्कृतचा सर्वाधिक प्रभाव पडला. जावा आणि मलय भाषेच्या माध्यमातून संस्कृत उर्वरित द्वीपसमूह आणि अगदी फिलिपाइन बेटांवरही पोचली. जावा बेटावरील सर्वसामान्य लिखित भाषेतील १००० शब्दांपैकी ११० शब्द संस्कृत, ५० शब्द मलय भाषेतील, तर फिलिपाइन्स बेटांवरील टॅगलॉग भाषेतील १.५ या प्रमाणात शब्द आढळतात, असेही मॅक्सवेल यांनी म्हटले होते. 

खरे तर संस्कृतच्या या सांस्कृतिक खुणा आपल्याला जगभर जागोजागी आढळतात. संपूर्ण आग्नेय आशियात भारतीय संस्कृतीच्या खुणा आपल्याला आढळतात. या देशांशी आपल्या नात्याचा धागा त्या बनू शकतात. त्या आपण हातोहात घ्यायला हव्यात. 

फिलिपाइन्सच कशाला सिंगापूर (सिंहपूर), इंडोनेशिया (अर्थ – भारतीय बेटांचा समूह), कंबोडिया (कम्बोज) या सर्व देशांची नावे ही कुठल्या ना कुठल्या प्रकारे संस्कृतशी निगडित आहेत. खुद्द या देशांनाही हे वास्तव मान्य आहे, हे आणखी विशेष. कंबोडिया आणि थायलंडसारखे देश भारताकडे मातृदेश म्हणून पाहतात, ही आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट असायला हवी. ड्युटर्टे यांच्या निमित्ताने फिलिपाइन्स जर आपल्या मुळाकडे परत जात असेल आणि या देशांच्या रांगेत जाऊन बसत असेल, तर आपण त्याचे स्वागतच केले पाहिजे.

– देविदास देशपांडे
ई-मेल : devidas@dididchyaduniyet.com

(लेखक मुक्त पत्रकार व अनुवादक आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडियावरील त्यांचे सर्व लेख https://goo.gl/wvsqQ8 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 160 Days ago
It is necessary to re- establish , rejuvinate the cultural common thread . Way must be found for the purpose . Can tourism help?
0
0
Bal Gramopadhye About 169 Days ago
The cultural influence , if it exists today , existsts today is evident in language only : nothing else . There has been a complete break . Best to accept as a fact of life .
0
0
Prajakta Deshpande About 183 Days ago
एवढी वैविध्यपूर्ण माहिती .खरच खुप छान आहे.
0
0

Select Language
Share Link
 
Search