Next
समानार्थी शब्दांचा बृहद्ग्रंथ : अमरकोश
BOI
Sunday, December 09, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

‘अमरकोश’ हा एक अद्वितीय ग्रंथ आहे. अभ्यासकांशिवाय इतरांच्या बघण्यात तो सहसा येत नाही; परंतु मुद्दाम एकदा तो बघावा. अमरसिंह या विद्वानाने या ग्रंथाची रचना केली आहे. एका शब्दाला समानार्थी अन्य शब्द किती आहेत आणि त्यांचे लिंग काय, हे त्यावरून समजते. लेखक-संपादकांना तर हा कोश अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक आहे. ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर ‘किमया’ या सदरात आज लिहीत आहेत अमरकोशाबद्दल...
...........
आपले संस्कृत वाङ्‌मय अत्यंत समृद्ध आहे. वेद-उपनिषदे-पुराणे यांच्याप्रमाणे अनेक प्रकारचे कोश इथे निर्माण झाले आहेत. त्यातील ‘अमरकोश’ हा एक अद्वितीय ग्रंथ आहे. अभ्यासकांशिवाय इतरांच्या बघण्यात तो सहसा येत नाही; परंतु मुद्दाम एकदा तो बघावा. एका शब्दाला समानार्थी अन्य शब्द किती आहेत आणि त्यांचे लिंग (पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग) काय, हे त्यावरून समजते. लेखक-संपादकांना तर हा कोश अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक आहे.

अमरसिंह या विद्वानाने या ग्रंथाची रचना केली आहे. हा कोणत्या काळात होऊन गेला, याबद्दल मतमतांतरे आहेत. विक्रम राजाच्या दरबारातील नवरत्नांपैकी तो एक होता, असे मानले जाते. याचा अर्थ इसवी सनापूर्वी पहिले शतक. इथपासून ते इसवी सनाच्या सहाव्या शतकापर्यंत त्याचा काळ नेण्यात येतो. तो बौद्धमत मानणारा होता, तथापि जैन होता, असे काही पुराव्यांच्या आधारे मांडण्यात आले आहे. त्याने अन्य काही ग्रंथ लिहिले किंवा नाही, हे ज्ञात नाही. अर्थात, ‘अमरकोश’ हे एकच काम श्रेष्ठ दर्जाचे झालेले आहे, यात शंकाच नाही.

आपल्या शास्त्रांनी शब्दाला ब्रह्म मानलेले आहे. शब्दाच्या आधारे (अनाहत, ओंकार) आत्मसाक्षात्कार होऊ शकतो. शब्द हा सर्वव्यापक, महान असा आहे. तो आकाशाचा गुणधर्म आहे; आकाशातच शब्द दुमदुमतो. आपण उच्चारलेले शब्द आकाशात सूक्ष्म लहरींच्या स्वरूपात अस्तित्वात राहतात - ते नष्ट होत नाहीत. आधुनिक विज्ञानाच्या द्वारे प्राचीन काळातील संभाषणे - उदा. कृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता - ध्वनिमुद्रित करणे शक्य आहे का, यावर प्रयोग होत आहेत. शब्दांच्या आश्रयाने वेदांपासून आजतागायत अगणित ग्रंथांची निर्मिती झालेली आहे. त्यात अर्थांसह शब्दांचा समन्वय होतो. मानवी मनातील भावना शब्दांत व्यक्त करण्याची क्षमता नसती, तर त्या अव्यक्तच राहिल्या असत्या. व्यास, वाल्मीकी, वसिष्ठ, कालिदासादि कवी, नाटककार यांच्या साहित्यकृती प्रसिद्ध झाल्या नसत्या, तर आज आपण केवढ्या ज्ञानाला, आनंदाला मुकलो असतो! 

अशा शब्दभांडाराला एकत्र करणे, हे कोशाचे मुख्य कार्य आहे. ते अत्यंत चिकाटीचे, दीर्घ काळ चालणारे, बुद्धीला कस लावणारे असे प्रचंड कार्य आहे. एका शब्दाचे अनेक अर्थ असतात आणि समानार्थी शब्द अनेक असतात. अभ्यासकांना ते उपयुक्त ठरतात. अमरसिंहाने तेच मौलिक काम केले. हा सर्व ग्रंथ पाठ करण्याची आवश्यकता नाही; परंतु आपल्या गरजेनुसार त्याचा वापर करता येतो. प्रत्येक प्रकरणात कुठे, काय, कशा प्रकारे शब्द विशद केलेले आहेत, हे मात्र आपल्याला ठाऊक असले पाहिजे. या ग्रंथावर अनेक विद्वानांनी पुढे अनेक भाषांमध्ये टीका - विवरण, सुलभीकरण, समालोचन इत्यादी - लिहिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना जी उपयुक्त वाटेल, तिचा वापर संदर्भासाठी करावा.

‘अमरकोश’ हा अमर भाषा संस्कृतचा महाशब्दकोश आहे, असे म्हणतात. सर्व जगभर त्याचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत. सुरुवातीला आवश्यकतेमुळे वैदिक शब्दकोश निर्माण झाला. त्याला ‘निघंटु’ म्हणतात. प्रत्येक शब्द हा अर्थवाचक असतो. ‘निघंटु’वर जे भाष्य यास्काचार्यांनी केले, त्याला निरुक्त म्हणतात. हळूहळू, सर्वसामान्य लोकांना लौकिक शब्दांचे ज्ञान व्हावे, यासाठी सर्वसमाशेक कोश तयार करणे, ही गरज निर्माण झाली. असे २५-३० कोश प्राचीन काळात तयार झाले. ते सगळे आज उपलब्ध नाहीत. त्यातील सर्वाधिक पसंती आणि प्रसार अमरकोशाचाच झाला. अमरकोशाला ‘देवकोश’, ‘त्रिकांड’ आणि ‘नामलिंगानुशासन’ या नावानेही ओळखले जाते.

या ग्रंथात एकूण तीन कांडे (खंड) आहेत. पहिल्यात मंगलाचरण करून दहा प्रकरणे लिहिली आहेत. दुसऱ्या खंडात १० आणि तिसऱ्यात पाच प्रकरणे आहेत. एकूण श्लोणक अनुक्रमे २७८, ७३४ आणि ४८२ असे एकूण १४९४ आहेत. त्याशिवाय चक्रसूची, क्षेपकश्लोकपंक्ती संख्या आणि परिशिष्टे आहेत. प्रत्येक खंडात विषयानुसार निरनिराळे वर्ग केले आहेत. उदा. स्वर्गवर्ग, शब्दादिवर्ग, नाट्यवर्ग, भूमिवर्ग, मनुष्यवर्ग, संकीर्णवर्ग, लिंगादिसंग्रहवर्ग इत्यादी. त्यातील काही निवडक शब्दांचे समानार्थी शब्द आता पाहू.

स्वर्ग : नाक, त्रिदिव, त्रिदशालय, सुश्लोचक, द्यौ, त्रिविष्टप
देव : अमर, निर्जर, त्रिदश, विबुध, सुर, सुपर्वा, सुमन, त्रिदिवेश, दिवौक.
दैत्य : असुर, दैतेय, दनुज, इंद्रारि, दानव, शुक्रशिष्य, दितिसुत, पूर्वदेव, सुरद्विष
बुद्ध : सर्वज्ञ, सुगत, धर्मराज, तथागत, समन्तभद्र, भगवान, मारजित, लोकजित, जिन, षडभिज्ञ, दशबल, विनायक, मुनींद्र, श्रीधन, शास्ता.
आकाश : द्यौ, व्योम, अभ्रम, पुष्कर, अंबर, नभ, अंतरिक्ष, गगन, अनंत, विष्णुपद, विहाय.
दिशा : दिक्, काष्ठा, आशा, हरित्
सायंकाल : दिनांत, सायम्, संध्या, पितृप्रसू
बुद्धी : मनीषा, धिषणा, धी:, प्रज्ञा, मति, प्रेक्षा, उपलब्धी, चित्, संवित्, प्रतिपद्, ज्ञप्ति, चेतना.
वचन (बोलणे) : ब्राह्मी, भारती, भाषा, गो, वाक्, वाणी, सरस्वती, व्याहार, उक्ती, वचन, भाषित.
नृत्य : तांडव, नटनम्, नाट्यम्, लास्य, नर्तन.
बीळ (खड्डा) : कुहर, सुषिर, विवर, छिद्र, रंध्र, निर्व्ययन, वषा, शुषि.
समुद्र : अब्धि, पारावार, अकूपार, सरित्यति, उदधि, सिंधु, सरस्वान, सागर, अर्णव, रत्नाकर, जलनिधी.
पृथ्वी : भू, भूमी, अचला, अनंता, रसा, विश्वंभरा, स्थिरा, धरा, धरित्री, धरणी, काश्यपी, क्षिति, सर्वसहा, वसुमती, वसुधा, उर्वी, वसुंधरा, पृथिवी, क्षमा, अवनी, मेदिनी, मही
दगड : पाषाण, प्रस्तर, ग्रावा, अश्म, शिष्ठा, दृषद
मनुष्य : मानुष, मर्त्य, मनुज, मानव, नर
ज्ञानी : प्रवीण, निपुण, अभिज्ञ, निष्णात, शिक्षित, वैज्ञानिक, कृतमुख, कुशल, कृतार्थ.
संवित : ज्ञान, संभाषा, नाम, तोषण, आकार, प्रतिज्ञा.
आशीर्वाद : स्वस्ति, कल्याण, पुण्य, मंगल
अतिशय : बलवत्, सुष्ठु, कियुत, सु, अतीव, अति
प्राक् : पूर्व दिशेला, पूर्वेकडून, पूर्व दिशा, पूर्वकाळात, पूर्वेकडील देशात.

वरील शब्द केवळ उदाहरणादाखल दिलेले आहेत. जिज्ञासूंनी मूळ ग्रंथ अवश्य बघावा.
समानार्थी शब्दांशिवाय कालमानबोधक आणि तुलामानबोधक ही दोन महत्त्वाची कोष्टके (चक्रे) त्यात दिली आहेत. या विषयांचा आपल्याकडे किती सूक्ष्म अभ्यास झालेला होता, हे त्यावरून कळेल.

कालमानचक्र :
१) पापणी लवण्यास लागणारा काळ = एक निमिष (१/२७ विपळ) = २/१३५ सेकंद
२) १८ निमिष = एक काष्ठा = ४/१५ सेकंद
३) ३० काष्ठा = एक कला = ८ सेकंद
४) ३० कला = एक क्षण (१० पळ) = ४ मिनिटे
५) १२ क्षण = एक मुहूर्त (२ घटी) = ४८ मिनिटे
६) ३० मुहूर्त = एक अहोरात्र (माणसाची) = २४ तास
७) १२ मास = एक वर्ष (माणसाचे) = एक अहोरात्र (देवांचे)
८) १२००० देव वर्ष = ४३२०००० मनुष्य वर्षे = चार युगे

याप्रमाणे ब्रह्मदेवाचा एक दिवस, एक महिना, एक वर्ष असे कालमान दिले आहे. ब्रह्मदेवाचे आयुष्य १०० वर्षे आहे. पंचांगानुसार त्यातील ५० वर्षे होऊन गेली आहेत. आधुनिक कालगणनेनुसार सृष्टीच्या निर्मितीला अंदाजे १३५० कोटी वर्षे होऊन गेली. आपल्या सूर्यमालिकेला (पृथ्वी आदि ग्रहांसह) ४५० कोटी वर्षे झाली आहेत. हा काल अपरिमित आहे. त्यापुढे आपले आयुष्य म्हणजे केवढे क्षणभंगुर आहे, हे लक्षात येते.

तुलामानचक्र :
१) एक परमाणू - १/३० त्रसरेणु
२) ३० परमाणू - १ त्रसरेणू 
३) सहा त्रसरेणू - एक मरीचि
४) सहा मरीचि - एक राजिका
५) दोन शूक्त - एक पळ
६) दोन पळ - एक प्रसृति
७) दोन प्रस्थ - एक आढक 
८) चार आढक - एक द्रोण
९) २००० पळे - एक भार
१०) १०० पळे - एक तुला 

हे मापन आता प्रचारात नाही. परंतु त्यामुळे त्याचे महत्त्व कमी होत नाही. अमरकोशाच्या अंतर्गत ही माहिती आलेली आहे. या कोशानंतर १७व्या शतकापर्यंत आवश्यकतेनुसार आणखी ६० कोश निर्माण झालेले आहेत. ते मोठ्या ग्रंथालयांमध्ये उपलब्ध असतात. 

भारतात ज्ञानाची गंगा अशीच वाहत आली आहे. आपण त्यात नित्यनेमाने स्नान केले पाहिजे.

रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

(अमरकोश ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search