पुणे : विलोभनीय भावमुद्रा, ताल आणि मुद्रा यांचा समन्वय साधणाऱ्या ‘दिशा- द राईट पाथ’ या शास्त्रीय नृत्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाने भारतीय विद्या भवनचे वातावरण तालमय झाले.
भारतीय विद्या भवन व इन्फोसिस फाउंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत आणि नृत्ययात्री आर्ट मुव्हमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नृत्यांगना नेहा आपटे आणि अंजली हरिहरन यांनी भरतनाटयम् प्रकारातील सोलो नृत्य सादर केले.

‘विद्या भवन’च्या सरदार महादेव बळवंत नातू सभागृहात हा कार्यक्रम १६ जून रोजी सायंकाळी रंगला. ‘विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन आकांक्षा शिंदे यांनी केले. या वेळी ‘नृत्ययात्री’च्या संस्थापक संचालक मेघना साबडे उपस्थित होत्या.
अंजली हरिहरन यांनी अंबुजं कृष्णा यांची ‘लाथांगी’ रागावर आधारित ‘आडम पाडनाई’ रचना (आदी ताल), कीबोर्ड आर्टिस्ट पी. आर. वेंकटासुब्रमणीनं यांची ‘वर्णमं’ रागमालिकामधील तालावरील ‘वनावर पन्नीन्धीडुं’ रचना, रंगणेश्वर यांची रचना असलेले ‘रुसली राधा, रुसला माधव’ (आदी ताल), सिथाराम शर्मा यांची ‘नलिनकांती’ रागावर आधारित ‘तिल्लाना’ रचना सादर केली.
नेहा आपटे यांनी ‘नृत्यांजली’, ‘अलारिपू’, ‘शिवानंद लहरी’ (आदी ताल), ‘जावली’ (समयामीध्ये रारा), ‘कृती’ (अर्धनारीश्वरम), ‘स्वरलय’ यांचे सादरीकरण केले.